Thursday, December 12, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखप. पू. श्री गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प, गोळवली

प. पू. श्री गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्प, गोळवली

सेवाव्रती: शिबानी जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी  यांचे मूळ गाव कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली. या  गावामध्ये कार्यरूपाने गुरुजींच्या स्मृती राखल्या जाव्यात असं संघाचे ज्येष्ठ अखिल भारतीय कार्यकर्ते मोरोपंत पिंगळे यांच्या मनात आलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली  १९९६ मध्ये गोळवली गावामध्ये ‘प. पू. श्री गोळवलकर गुरुजी स्मृती विकास प्रकल्प’ हा रा. स्व. संघाच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सुरू करण्यात आला आणि योजना, प्रारूप, आराखडा तयार करायला सुरुवात झाली. २००२ पासून कार्याला गती आली. इतक्या मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेचे सरसंघचालक असलेले प. पू.गोळवलकर गुरुजी देशभरात कार्य करत होते, त्यांच्या गावाला स्वयंपूर्ण आणि विकसित करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं वाटूनच गावाला स्वयंपूर्ण आणि विकसित करण्यासाठी हा प्रकल्प सुरू झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणच्या दक्षिणेला ३५ कि.मी. वर हे गाव आहे. गावाची लोकसंख्या  सुमारे २३०० म्हणजे तसं छोट्या वस्तीचं गाव. गोळवली गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून  त्यानुसार प्रकल्पाची रचना केली गेली. गावाचा विकास म्हणजे गावातल्या स्त्री-पुरुष लहान-मोठे सर्वांची प्रगती करणे तसेच गावात सुविधा उपलब्ध करून देणे त्यामुळे केवळ शेतीवर अवलंबून न राहता पूरक व्यवसायही करावा तसेच आपले संस्कार, परंपरा यांची जोपासना व्हावी, तसेच शेतकऱ्यांना  गोपालनाचे महत्त्व व उपयुक्तता अनुभवता यावी या हेतूने संस्थेतर्फे काही प्रकल्प सुरू झाले. उदा.आपल्या संस्कृतीमध्ये गोमातेचे धार्मिक आणि उपयुक्ततेच्या दृष्टीने महत्त्व आहे, ते लक्षात घेऊन देशी गाईंचे संगोपन केले जाते.

लक्ष्मी गो सेवा केंद्रामध्ये गोपालन केले जाते. इथे गोमातेपासून मिळणाऱ्या सर्व वस्तूंचा उपयोग केला जातो. गोमूत्रापासून अर्क काढला जातो. गोमूत्र व गोमयाचा उपयोग करून सुकेश शांपू, धूपकांडी, गो-संमार्जन (फ्लोअर क्लिनर) गांडूळ खत, कंपोस्ट खत, गोबर गॅस यांची निर्मिती केली जाते. हे करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते. त्यामुळे गावात रोजगार उपलब्ध झाला आहे. गाईचा केवळ वापर करून घेतला जात नाही तर तिचा सन्मानही राखला जातो.  ज्या गाईमुळे आपल्याला इतक्या गोष्टी मिळतात त्या गाईच्या  सामूहिक गो पूजनाचे कार्यक्रम संपन्न होतात.

गाव सक्षम व्हायचं असेल तर गावातील महिला सक्षम होणं आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन महिलांसाठी उपक्रम राबवले जातात. सध्या पापड, मिरगुंड यांचे उत्पादन सुरू आहे. फळांच्या मोसमानुसार फळप्रक्रिया करणेही सुरू असते. यातून महिलांना प्रशिक्षण, हाताला काम तसेच दर्जेदार उत्पादन मिळतात. दरवर्षी वेगवेगळ्या बचत गटातील साधारणपणे १०० ते १५० महिलांना या प्रकल्पातून प्रशिक्षण दिलं जातं तसेच त्यानंतर त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही प्रयत्न केले जातात. गोळवली व शेजारचे गाव धामणी ही तशी आतल्या बाजूला असलेली छोटी गावे, त्यामुळे सुरुवातीला तिथे कोणीही निवासी डॉक्टर नव्हता. इथल्या नागरिकांना चोवीस तास आरोग्य सेवा गावात उपलब्ध नव्हती. ती व्हावी यासाठी  २००८ पासून वैद्यकीय केंद्र सुरू केले आहे. सध्या डॉ. प्रकाश रत्नपारखी सेवाभावानी वैद्यकीय सेवा पुरवत होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र डॉक्टर रत्नपारखी यांच्या वृद्धत्वामुळे दैनिक दवाखाना सुरू नसून काही डॉक्टरांच्या मदतीने गावागावात जाऊन आरोग्यविषयक प्रबोधन, व्याख्यान आयोजित केली  जात आहेत. बाहेरून  डॉक्टर तसेच इतर तज्ज्ञ डॉक्टर येऊन मार्गदर्शन करत आहेत.

आजचे विद्यार्थी हे भविष्यातील नागरिक आहेत. हे नागरिक सुजाण, संस्कारपूर्ण व्हावेत यासाठी बालसंस्कार केंद्र चालवलं जातं. गोळवली व धामणीतील प्राथमिक शाळांना केंद्र धरून एक उपक्रम चालवला जातो.  शाळा निवडून त्या शाळेत तासाभराचा कार्यक्रम होतो, विद्यार्थ्यांवर संस्कार होण्यासाठी या कार्यक्रमाचा चांगला उपयोग होत आहे. समर्थ गावातील उत्साही तरुणांनी पुढाकार घेऊन अद्ययावत व्यायाम शाळा सुरू केली आहे. प्रकल्पाची नवी इमारत झाल्यानंतर ही व्यायामशाळा नवीन इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली आहे. व्यायामशाळा सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रांमध्ये सुरू आहे. आधुनिक जगतात संगणकाशिवाय तंत्रज्ञान  उपयोगी नाही हे लक्षात घेऊन इथल्या विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण वर्ग चालवले गेले.

गोळवली इथल्या प्रकल्पस्थानी संगणक प्रशिक्षण केंद्राचे  १८ मार्च २०१८ पासून २०२२ पर्यंत  या वर्गामध्ये एम.एस.सी.आय.टी.चे विविध कोर्स घेतले गेले होते. समाज जीवनामध्ये सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांनाही खूप महत्त्व असते. त्यामुळे प्रकल्पामध्ये नियमित काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विजया एकादशीचे (माघ वद्य एकादशी) दिवशी पू. गुरुजींची जयंती व ज्येष्ठ शुद्ध पंचमीला पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जातो. जयंतीचा कार्यक्रम विजया एकादशीपूर्वी ५-६ दिवस सुरू होतो, परिसरातील विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिला यांच्यासाठी स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम योजिले जातात. सूर्यनमस्कार, समूहगान, वक्तृत्व स्पर्धा, गमतीचे खेळ, रांगोळी स्पर्धा, विशेष वैद्यकीय शिबिरे असे अनेक उपक्रम योजले जातात. विजया एकादशीला मुख्य कार्यक्रम असतो. जिल्ह्यातून अनेक स्वयंसेवक यावेळी उपस्थित असतात. ज्येष्ठ शुद्ध पंचमीला पुण्यस्मरण करताना वृक्षारोपण केले जाते. याच दिवशी  जिल्ह्याच्या राष्ट्रीय सेवा समिती या शिखर संस्थेच्या सर्व सेवा प्रकल्पावर कार्यरत असणारे कार्यकर्ते, कर्मचारी, समितीचे पदाधिकारी यांचा स्नेहमेळावा व एकत्रित भोजन असाही कार्यक्रम होतो.

गोळवली इथे एक चांगलं सभागृहही आहे. त्याचा उपयोग अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना तसेच संघाच्या कार्यक्रमांना होतो. प्रकल्प पाहण्यासाठी रोज कोणीतरी इथे येत असत. जानेवारी २०१५ मध्ये लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रकल्पाला भेट दिली होती. जून २०१५ मध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री  पीयूष गोयल यांनी प्रकल्पाला भेट दिली. केंद्र सरकारने प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेण्याची योजना आखली होती. त्यात आदर्श सांसद ग्राम योजनेखाली हे गाव पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलं. त्याचाही फायदा गावाच्या विकासासाठी खूपच झाला.  प्रकल्पस्थानी खासदार निधीतून वास्तू उभारण्यात आली. त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी होत असतो. या नवीन इमारतीत फुड प्रोसेसिंग युनिट आणि व्यायामशाळा हलवण्यात आली आहे.

प.पू.सरसंघचालक मोहन भागवत यांनीही प्रकल्पाला भेट दिली आहे आणि त्यानिमित्ताने  त्यांचे प्रत्यक्ष मोलाचे मार्गदर्शन इथल्या कार्यकर्त्यांना लाभू शकले. मा.सरकार्यवाह भैया जोशी यांनीही प्रकल्प स्थानी भेट दिली आहे. अशा विविध योजनांमुळे गावाचे अनेक फायदे झाले आहेत. शेतकरी वर्गातील गोपालनाचे औदासिन्य कमी होऊन गोपालनाची आवड निर्माण झाली. प्रकल्पाच्या गोशाळेमध्ये गाईंची संख्या वाढली आहे. अशाप्रकारे वाढलेली गाई-वासरे शेतकऱ्यांना विनामूल्य दिली जातात. २००८ ते २०२० या काळात १०० गाई दिल्या. त्यामुळे प्रकल्पस्थानी स्थानिक लोकांना कायम रोजगार मिळाला आहे. प्रकल्पामुळे गावाला एक उपयुक्त केंद्र मिळालं आहे, अशी भावना इथले ग्रामपंचायत सदस्य, शासकीय अधिकारी नेहमीच व्यक्त करतात.

ग्रामसभा, महिला सबलीकरण संबंधीचे वर्ग, फिरती विज्ञान प्रयोगशाळा, प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, सरकारी अधिकारी वर्गाचे कार्यक्रम इत्यादी प्रकल्पाच्या सभागृहात संपन्न होतात. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावे यासाठी प्रकल्पस्थानी प्रो. कबड्डीच्या धर्तीवर कबड्डीचे सामने झाले होते. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्ताने योग प्रशिक्षण दिलं जातं. नवीन इमारतीमध्ये व्यायाम शाळा झाल्याने प्रकल्प  युवकांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. त्याशिवाय प्रकल्पाची सुव्यवस्थित गोशाळा, सतत होणारे समाजोपयोगी उपक्रम, २४ तास उपलब्ध असणारी आरोग्य सेवा आणि प्रकल्पावरील पूर्णवेळ कार्यकर्ते व डॉक्टर यांचा आधार यामुळे हा प्रकल्प  गावाचं भूषणच ठरत आहे.

संघ कार्यकर्ते जिथे गरज असेल तिथे नेहमीच झोकून देत असतात. या प्रकल्पावरही श्री. व सौ. देशपांडे सर्व व्यवस्था पाहतात. याशिवाय अन्य व्यवस्थांसाठी  स्थानिक काम करणारी माणसे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतूनच रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय सेवा समितीची ३१ वर्षांपूर्वी निर्मिती झाली. भारतीय तत्त्वावर नितांत श्रद्धा असलेली विशुद्ध चारित्र्यवान व त्यागमय पिढी निर्माण करणे त्यासाठी पुरक कार्य करणे व त्याच दृष्टिकोनातून संघकामाच्या अनेक आयामांना सहाय्यभूत होतील असे काही उपक्रम ही समिती रत्नागिरी जिल्ह्यात समाजसेवेचे व्रत घेऊन राबवत आहे.

राष्ट्रीय सेवा समिती या शिखर संस्थेखाली विविध सेवाकार्य केंद्र जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत. त्यापैकीच हे गोळवली इथले प्रकल्प कार्य चालते. त्याशिवाय समितीतर्फे रत्नागिरी शहरातील झाडगांव येथे  मुलांसाठी आदर्श वसतिगृह तसेच रत्नागिरी येथे मुलींसाठी सन्मित्र वसतिगृह  चालवले जाते. बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या वतीने विविध योग अभ्यासाचे उपक्रम घेतले जात आहेत. योग तसेच सूर्यनमस्कार वर्ग, उंची संवर्धन, विविध प्रकारच्या शुद्धीक्रियासारखे आयोजन या योग केंद्रात करण्यात येते.  राजापूर शहरात मध्यवर्ती कार्यालय उभे आहे.

गोळवली इथल्या प्रकल्पाच्या माध्यमातून गोळवलीच्या आसपासच्या १० गावांमध्ये आरोग्य, संस्कार, गोपालन, सेंद्रिय या आयामांवर कार्य चालतं. याच कार्याचा विस्तार करून जवळपासच्या २५ गावांमध्ये प्रकल्पाचं काम पोहोचवण्याचा  विचार आहे. प.पू.द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे गाव असलेल्या गोळवली गावाचा त्यांच्या कार्याला साजेसा विकास करण्यासाठी हा प्रकल्प कायमच जोमान, धडाडीने काम करत आहे.
joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -