युवा वर्गः लोकशाहीचे भाग्यविधाते

Share

डॉ. श्रीरंजन आवटे

देशात परिवर्तन घडवायचे असेल तर युवा वर्गाचे मत निर्णायक असते, हे लक्षात घेऊनच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवा वर्गाला संबोधित केले. ‘मेरा पहला वोट, देश के लिए’ हे अभियान निवडणूक आयोगाने सुरू केले. त्याचा दाखला देत प्रधानमंत्री मोदींनी युवा वर्गाने मतदान प्रक्रियेत सामील व्हावे, यासाठी आवाहन केले. देशाच्या युवा वर्गाविषयी आपल्याला अभिमान आहे आणि देशात परिवर्तन व्हावे म्हणून युवा वर्गाने मतदान केले पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.

निवडणूक आयोगाने सुरू केलेली ही मोहीम महत्त्वाची आहे. शिक्षण मंत्रालयही ही मोहीम युवा वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गाणी, पथनाट्ये, व्हीडिओ अशा विविध माध्यमांतून युवा वर्गाला मतदानासाठी साद घातली जात आहे. निवडणूक आयोगाने दोन योजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या विशेष उल्लेखनीय आहेत. पहिली विशेष योजना आहे ती युवा वर्गाच्या आगाऊ नोंदणीची (ॲडव्हान्स रजिस्ट्रेशन) व्यवस्था. ज्यांचे वय १६-१७ आहे त्यांचीही आधीच नोंदणी करण्याचा उपक्रम आयोगाने हाती घेतला होता जेणेकरून वय वर्षे १८ पूर्ण होताच आयोग त्यांना सूचित करून त्यांच्या नोंदणीवर शिक्कामोर्तब करेल. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्याचे आयोगाचे लक्ष्य होते.

दुसरी विशेष योजना निवडणूक आयोगाने राबवली ती निवडणुकीय साक्षरता मंडळ (इलेक्टोरल लिटरसी क्लब) स्थापन करण्याची. अशी मंडळं शाळा आणि महाविद्यालयात स्थापन केली गेली. १४ ते १७ वयोगटातील शाळेतील विद्यार्थी तर १८ ते २१ वयोगटातील महाविद्यालयातले विद्यार्थी यांना निवडणूक प्रक्रिया समजावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता. या वयोगटाला निवडणूक साक्षर करण्यासाठी निवडणूक आयोगाने पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. यामध्ये प्रत्यक्ष कृतीतून शिकता येईल असे उपक्रम आखले गेले. तसेच निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी म्हणून ६ गेम्स तयार केले. अशा उपक्रमांमधून नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांना जागरूक करण्याचा आयोगाचा हा लक्षवेधी उपक्रम आहे.

हा सगळा खटाटोप निवडणुकीत युवा मतदारांचा सहभाग वाढावा म्हणून केला जात आहे. कोणत्याही देशातील लोकशाहीसाठी मुक्त आणि खुल्या वातावरणात निवडणुका पार पडणे जरूरीचे असते. या निवडणुकांमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग असतो तेव्हाच प्रातिनिधिक लोकशाहीचा प्रवास सहभागी लोकशाहीकडे होऊ शकतो. या प्रवासात युवा वर्ग सर्वांत महत्त्वाचा कारण वेगळा विचार करण्याची क्षमता युवा वर्गात असते. कोणत्याही काळाचे कर्णधारपद युवा वर्गाकडे असते. भारताच्या इतिहासातले मोठे बदल हे युवा वर्गाने घडवले आहेत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी ब्रिटिश सरकारच्या जुलमी शासनाच्या विरोधात एल्गार पुकारला होता. १९७० च्या दशकात इंदिरा गांधी यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात तरुणांनीच आंदोलन केले होते. जुलुमशाही असो की एकाधिकारशाही, तरुणच त्याला विरोध करू शकतात आणि परिवर्तन आणू शकतात, हे लक्षात घेतले पाहिजे.

त्यामुळेच युवा वर्गाने मतदानाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. देशाची दिशा आणि दशा काय असणार हे ठरवण्याचा अधिकार मतदानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मिळतो. युवा वर्गाने ड्रायविंग सीटवर बसले पाहिजे कारण त्यातून देशाचे तरुण कोणत्या दिशेने जाणार याचा सुकाणू त्यांच्या हाती येतो. मतदान हे जसे कर्तव्य आहे तसेच ते जबाबदारीचे काम आहे. मतदान करणे म्हणजे निवड करणे. ‘अ’ उमेदवार चांगला की ‘ब’ उमेदवार चांगला एवढी ती मर्यादित निवड नसते. देशातल्या लोकशाहीचा व्यापक पातळीवर विचार करून मतदान करणे हे जबाबदारीचे काम आहे. त्यासाठी विवेकी विचार करणे जरूरीचे. विवेकी विचारांमधूनच चांगल्या-वाईटाची पारख करता येते. ती करता येण्यासाठी सजग असण्याची आवश्यकता असते.

आजच्या सोशल मीडियाच्या काळात व्हाॅटस्ॲपवर माहितीचा पूर येतो मात्र ती माहिती योग्य आहे की नाही, हे तपासून घेतले पाहिजे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने माहिती तपासून घेण्यासाठी एक कक्ष स्थापन केला आहे. अल्टन्यूज, बूमफॅक्टचेक अशा काही संकेतस्थळांवरही आपल्याला योग्य माहिती मिळू शकते. आपल्याला हव्या त्या पक्षाला, उमेदवाराला आपण मतदान करू शकतो मात्र आपले मत हे अफवांवर नव्हे तर तथ्यांवर आणि सत्यावर आधारित असायला हवे.

यासाठीच ‘मेरा पहला वोट देश के लिए’ या घोषणेवर आधारित एक गाणे भारत सरकारने प्रसिद्ध केले आहे. या गाण्यात म्हटले आहे मतदान म्हणजे स्वातंत्र्याचा पुरस्कार आणि लोकशाहीचा पहिला संस्कार. त्यामुळे भारतात लोकशाही टिकवायची असेल तर युवा वर्गाने मतदान केले पाहिजे. यंदा पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवा वर्गाची संख्या एक कोटी ८५ लाख इतकी आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. शिवाय सध्या भारताचे सरासरी वय २५ ते ३० च्या दरम्यान आहे. त्यामुळे युवा वर्गाचे मत निर्णायक असणार आहे. अठराव्या लोकसभा निवडणुकीत अठरा वर्षे पूर्ण असलेल्या प्रत्येकाने मतदान केले पाहिजे.

अठरा हे मतदानाचे वय करण्याचा निर्णय राजीव गांधी प्रधानमंत्री असताना १९८८ साली ६१ वी घटनादुरुस्ती करून घेण्यात आला. याचे मोल खूप अधिक आहे. त्यामुळे आता देशाचे भविष्य बदलण्याची संधी युवा वर्गाच्या हातात आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना युवा वर्गाने स्वातंत्र्याचे अमृत पिऊन लोकशाहीला संजीवनी दिली पाहिजे. युवा वर्गाने मोठ्या प्रमाणावर योग्य मतदान केले तरच ते नव्या भारताचे भाग्यविधाते ठरू शकतात. त्यासाठी भविष्याची निवड विवेकी पद्धतीने केली पाहिजे.
poetshriranjan@gmail.com

Recent Posts

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

2 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

3 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

3 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

4 hours ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

4 hours ago