अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील बाल्टिमोरमधील एक मोठा पूल मंगळवारी पहाटे एक जहाज आदळल्याने कोसळला आणि त्यामुळे अनेक वाहने पाण्यात गेली. 'फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज' नावाच्या या पुलावर एक मोठे जहाज आदळल्याच्या वृत्तानंतर काही लोक पाण्यात बुडाले असल्याची शक्यता आहे. पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध सुरु असल्याचे बाल्टिमोर अग्निशमन विभागाने सांगितले आहे.
त्यातचं या घटनेचा एक व्हिडिओ Xवर व्हायरल होत आहे. Xवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जहाज पुलाच्या प्रमुख स्तंभांपैकी एकाला धडकत असल्याचे दिसले, ज्यामुळे २.६ किलोमीटर पुलाचा बराचसा भाग पत्त्याप्रमाणे कोसळला. त्याचसोबत अनेक वाहनंदेखील पॅटापस्को नदीत पडली. जहाजाला आग लागल्याचे दिसले कारण पुलाचा काही भाग त्यावर कोसळल्याचे दिसले त्यामुळे हवेत काळ्या धूराचे लोट परसले.
बाल्टिमोरचे महापौर ब्रँडन एम स्कॉट यांनी सांगितले की, 'आपत्कालीन कर्मचारी घटनास्थळी आहेत आणि बचावाचे प्रयत्न सुरू आहेत. १९७७ मध्ये बांधलेला, हा पूल पॅटापस्को नदीवर आहे, ही एक महत्त्वाची नदी आहे जी बाल्टिमोर बंदरासह अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर शिपिंगचे केंद्र आहे.'