मुंबई : मुंबईतील सांताक्रुझ पूर्व येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाची त्याच्या जन्मदात्या वडिलांनीच हत्या केली आहे. दिनेश कुमार गुप्ता असे आरोपी वडिलांचे नाव असून त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. हे व्यसन सोडवण्यासाठी मुलगा खटाटोप करत होता. वडिलांचे व्यसन सुटण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या मुलाचा त्याच्या पित्यानेच खून केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
गुप्ता हे मुळत: उत्तर प्रदेशातील आहेत. मात्र काम मिळवण्यासाठी ते मुंबईत येऊन इथेच स्थायिक झाले. मुंबईतील वाकोला परिसरात दोन मुलं आणि पत्नीसह राहतात. दिनेश कुमार हे वारंवार दारू पिऊन घरी आल्यावर शिवीगाळ करत असत. याच कारणामुळे त्यांचा मुलगा अलोक व त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. अलोकला त्यांची दारू पिण्याची सवय अजिबात आवडत नव्हती. वडिलांचे व्यसन आणि घराची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यामुळे अलोकने पार्ट टाइम जॉब करण्यास सुरुवात केली.
रविवारी संध्याकाळी दिनेश कुमार संध्याकाळी घरी परतला ते दारूच्या नशेतच. त्यानंतर त्याचे व अलोकचे कडाक्याचे भांडण झाले. भांडण सुरू असताना रागाच्या भरात दिनेशने एक चाकू आणला आणि अलोकच्या पोटात वार केले. या हल्ल्यात अलोक गंभीर जखमी झाला होता. अलोकची बहिण प्रिती आणि शेजाऱी त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून धावत आले. अलोकला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्यांनी लगेचच त्याला रुग्णालयात दाखल केले.
अलोकला देसाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले गेले. अलोकच्या मृत्यूनंतर शेजाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. दिनेश कुमारविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याची मुलगी प्रिती हिनेच तक्रार दाखल केली होती. तर, वाकोला पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. तर, गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकूही ताब्यात घेण्यात आला आहे.