नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. आसाममध्ये निवडणुकीआधी प्रचारात गुंतलेले राजकीय पक्ष आपल्या विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यातच आता आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींचे भविष्य अंधारात असून २०२६ पर्यंत काँग्रेस राहणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.
सोमवारी विश्वनाथमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा अर्थ राहुल गांधींना मत देणे. भाजपला मत देण्याचा अर्थ नरेंद्र मोदींना मत देणे. जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रेम करतात आणि मानतात भारत हा विश्वगुरू बनावा ते या निवडणुकीत भाजपला मतदान करतील. जे लोक राहुल गांधींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात त्यांना माहीत आहे की त्यांचे भविष्य अंधारात आहे.
२०२६ पर्यंत आसाममध्ये काँग्रेस पक्ष नसणार
गेल्या दीड महिन्यात तुम्ही काँग्रेस पक्षाची घसरण पाहिली कारण अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती धरले. माझ्या मते २०२६ पर्यंत आसाममध्ये कोणताही काँग्रेस पक्ष राहणार नाही.
चांगले नेते भाजपात सामील होत आहेत
लोकसभा निवडणुकीपर्यंत चांगले नेते भाजपात सामील होत राहतील आणि लोकसभा निवडणुकीनंतरही सामील होण्याची प्रक्रिया सुरू राहील.