गडचिरोली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना गडचिरोतील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसला गेल्या काही दिवसांपासून एका मागे एक धक्के बसत असल्यामुळे काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव तथा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा देत त्यांनी नुकताच सायंकाळी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, आज दुपारी डॉ. नामदेव उसेंडी यांनी निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, ”मी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या पदावर कार्यरत होतो. नेमणूकीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी काँग्रेस पक्षाचा संघटन करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या माध्यमातून आदिवासींना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मी गडचिरोली जिल्ह्याचा स्थानिक उमेदवार म्हणून पक्षाकडे गडचिरोली – चिमुर या लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मागितली होती. स्थानिक व राज्य पातळीवरचं माझं काम पाहून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू स्थानिक व राज्य पातळीच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने षडयंत्र करुन या लोकसभा क्षेत्राच्या बाहेरील व्यक्तीला गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राची उमेदवारी दिली” असे सांगितले.
”घटनेच्या तरतुदीनुसार गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे स्थानिक आदिवासींची लोकसंख्या गृहीत धरुन या भागातील प्रश्न व समस्या लोकसभेत मांडून सोडविले जातील, हा उद्देश होता. अशी संकल्पना दृष्टीस ठेऊन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्र आदिवासीसाठी आरक्षित ठेवण्यात आलेला होता. या संकल्पनेला छेद देवून प्रदेश पातळीवरील नेत्यांनी आपसी गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा बळी घेऊन गडचिरोली जिल्ह्याबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने स्थानिक नेतृत्वावर अन्याय झालेला आहे. माझ्या सारख्या पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत करण्याऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसचे स्थानिक व राज्यपातळीवरील नेतृत्व गटबाजीने ग्रस्त असल्यामुळे न्याय देवू शकत नसेल, तर या क्षेत्रातील लोकांना न्याय कसा मिळेल? या बाबीचा विचार करुन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे”, असदेखील त्यांनी दुपारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.