मुंबई : होळी खेळताना नोटांवर लागलेल्या रंगामुळे काही दुकानदार ती नोट स्वीकारण्यास नकार देतात. त्यामुळे रंगीत नोटा चालणार नाहीत, याची भीती लोकांना वाटत असते. जर तुमच्याकडेही रंगीत नोटा असतील किंवा कोणतीही नोट फाटली असेल तर तुम्ही बँकेत जाऊन सहज बदलून घेऊ शकता. कोणतीही बँक या नोटा बदलून घेण्यास नकार देऊ शकत नाही. मात्र, नोटांबाबत काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमच्या नव्या नोटा रद्द होऊ शकतात.
३ जुलै २०१७ रोजी रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक जारी केले होते. कोणत्या नोटा बँका स्वीकारू शकतात आणि कोणत्या स्वीकारू शकत नाही याबद्दल हे परिपत्रक होते. परिपत्रकानुसार, कोणत्याही नोटेवर राजकीय घोषवाक्य लिहिलेले असल्यास ती नोट चालणार नाही. कोणतीही बँक ती स्वीकारणार नाही. आरबीआयने आपल्या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे की अशा नोटा कायदेशीर निविदा राहणार नाहीत. याचा अर्थ देशातील कोणतीही बँक अशा नोटा स्वीकारणार नाही.
रंगीत नोटांबाबत काय आहे नियम?
- व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेल्या एका मेसेज मध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील बँका रंगीत नोटा स्वीकारत नसल्याचे सांगण्यात येत होते. यावर रिझर्व्ह बँकेने म्हटले होते की, कोणतीही बँक या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही. मात्र, यासोबतच त्यांनी लोकांना नोटा घाण करू नका, अशा सूचना दिल्या होत्या.
- बँकांनी जाणूनबुजून फाडलेल्या नोटा स्वीकारू नयेत, असे या परिपत्रकात म्हटले आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की, जाणूनबुजून फाटलेल्या नोटा ओळखणे अवघड असले तरी फाटलेल्या नोटांची नीट तपासणी केली तर ओळखता येतात.
- तुमच्याकडे असलेली नोट घाण झाली असेल किंवा फाटली असेल, पण त्यावर सर्व महत्त्वाची माहिती दिसत असेल, तर बँका अशा नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत.
याबाबत आरबीआयने बँकांना निर्देश दिले आहेत. आरबीआयने बँकांना फाटलेल्या नोटा बदलून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांनीही त्यांच्या शाखांमध्ये या सुविधेबाबतचे पोस्टर लावावेत अशी सूचनाही आरबीआयने केली आहे.