तामिळनाडू : तामिळनाडू येथील इरोडचे लोकसभा खासदार ए.गणेशमूर्ती यांनी तिकीट मिळाले नाही म्हणून रविवारी थेट विष प्राशन केल्याचे उघडकीस आले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
एमडीएमके नेत्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, डीएमके पक्षाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिल्याने ते मानसिक दडपणाखाली होते. त्यातून नैराश्य आल्याने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. ए. गणेशमूर्ती हे ७६ वर्षांचे आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत ए.गणेशमूर्ती यांनी आपल्या एआयएडीएमके प्रतिस्पर्धी जी. मणिमारन यांना दोन लाख १० हजार मतांनी हरविले होते. या निवडणूकीत एमडीएमकेचे संस्थापक वायको यांनी त्यांचा मुलगा दुरई वायको यांच्या उमेदवारीला प्राधान्य दिले. आणि एमडीएमकेला इरोड ऐवजी तिरुची सीट मिळावी यासाठी प्रयत्न केला.