Friday, December 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजभाविकांचे श्रद्धास्थान डहाणूची श्रीमहालक्ष्मी

भाविकांचे श्रद्धास्थान डहाणूची श्रीमहालक्ष्मी

डहाणूची महालक्ष्मी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारी आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे. या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर अत्यंत सुंदर, आकर्षक असून या देवीवर महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांची आस्था आहे.

कोकणी बाणा : सतीश पाटणकर

ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची नवसाला पावणारी महालक्ष्मी महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनची परंपरा आजही चालू आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा पुजारी आदिवासी समाजातील आहे. या लोकात ही देवी कोळवणची महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव करण्याची इच्छा झाली. गुजरातमधील सुपीकता, धार्मिकता पाहण्यासाठी घनदाट जंगल, दऱ्या, डोंगर पार करत महालक्ष्मी देवी प्रवासाला निघाली. त्यामुळे त्या भागातील राक्षस दैत्यांची झोप उडाली. महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून राक्षसांचे डोळे क्रोधाने लाल झाले. महालक्ष्मीने अवतार घेत राक्षस दैत्यांना त्रिशुळाने ठार केले. राक्षसाबरोबर झालेल्या युद्धात देवी दमली. तिला विश्रांतीची गरज भासू लागली. विश्रांतीसाठी तिची नजर जवळ असलेल्या मुसा डोंगरावर गेली. हेच डोंगराचे शिखर आपल्याला विश्रांतीसाठी योग्य आहे, असे तिने ठरविले. महालक्ष्मी देवीचे वास्तव रानशेतच्या डोंगरावर दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचे आहे, अशी आख्यायिका आहे.

श्री महालक्ष्मी मंदिर, डहाणू हे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी एक आहे. याची स्थापना जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी इ.स. १३०६ मध्ये केली होती. डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत श्री महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे. या ठिकाणी वेवळवेडे स्थानी परंपरागत पंधरा दिवस महालक्ष्मीची यात्रा भरत असते. या वेवळवेडे स्थानास बिवळवेढे, विवलवेढे नावांनी उच्चारले जाते. प्रसिद्ध सप्तशृंगी शक्तिपीठाप्रमाणे येथेही शिखरावर ध्वज रोवणे हे दिव्य समजले जाते. श्री देवीच्या डोंगरावरील मूळ स्थानावर चढून पूजन करण्याचा व चौदाशे फूट उंचावर ध्वज लावण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौणिमेच्या मध्यरात्री केला जातो. हे मंदिर अत्यंत सुंदर, आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांची आस्था आहे.

वंशपरंपरेने डहाणूतील वाघाडी या गावातील सातवी कुटुंबाकडे मंदिर व्यवस्थापन व पूजेचा हक्क आहे. मातेचे एक मंदिर गडावर आहे, तर दुसरे मंदिर पायथ्याशी आहे. या गड पायथ्याशी महामार्गालगत असलेल्या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षे जुना आहे. डोंगरावरील देवीचे मूळ वास्तव असलेले मंदिर मात्र आता सुंदररीत्या बांधले गेले आहे. मंदिराचा गाभारा सजवला गेला आहे. या मंदिराचा गाभारा पश्चिमाभिमुख आहे. मूर्ती गाभाऱ्यांत असून देवीचा मुखवटा दर्शनी आहे. तो दोन फूट उंचीचा लांबट चेहऱ्याचा आहे. मस्तकावर चांदीचा मुकुट आणि कुंडले आहेत. मागील बाजूस भव्य पाषाण असून याच पाषाणाचा दर्शनी मुखवटा कोरून काढला आहे. मुखवट्याला सोने-चांदी अलंकारांनी सजवले असून मुखवट्यासमोर सिंह आणि जय-विजय यांच्या चांदीच्या मूर्ती आहेत. बाजूला सभा मंडप, यज्ञकुंड, दीपमाळा त्यांच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. समोर देवीचा ध्वज लावण्यासाठी उंच लाकडी खांब उभा आहे.

देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून १८ किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चारोटी नाक्यापासून आठ किलोमीटर असलेल्या वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिर पायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. एक हजार फूट उंच शिखरामुळे देवीचा डोंगर सहज दिसतो. या उंच ठिकाणी पाण्याचा झरा व कुंड आहे. येथील पाणी कधीच कमी होत नाही. या मंदिरात जाण्यासाठी खूप परिश्रम पडत असल्याने डोंगराच्या पायथ्याशी मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर हायवेवर चारोटी नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. इथे नेहमी गर्दी असते. मात्र यात्रेच्या वेळी भाविक वरच्या मंदिरात जातात.

या देवीची यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून म्हणजेच हनुमान जयंतीपासून पुढे १५ दिवस चालते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून या जत्रेसाठी भाविक येतात. पौणिर्मेच्या मध्यरात्री १२ वाजता सातवी कुटुंबातील प्रमुख पुजारी ध्वज, पूजेचं साहित्य, देवीची ओटी भरण्याचं साहित्य घेऊन पायथ्याशी असलेल्या मंदिरातून एकटाच निघतो. ध्वज लावण्याचं ठिकाण पायथ्यापासून १४०० फूट उंच शिखरावर आहे. तिथे पोहोचल्यावर तो तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. मग यात्रा सुरू होते.

दरवर्षी सुगीला शेतात पीक आल्यावर ते पीक वाहून श्री महालक्ष्मी देवीची पूजा केली जाते. त्यामागील भावना म्हणजे आलेले पीक हे देवीचाच प्रसाद असून जर तो देवीला वाहिला, तर घरात आणि शेतात समृद्धी आणि भरभराट येते. सर्वपित्री अमावास्येला येथे आदिवासी समाजाची जत्रा भरते. चैत्रात चैत्र नवरात्रीला देवीच्या मंदिरावर नवीन झेंडा चढवला जातो. महालक्ष्मीच्या मंदिरात शेतातील पहिल्या पिकापासून महालक्ष्मीची पूजा केली जाते. पितृ आमावस्याच्या दिवशी येथे आदिवासी मेळा भरतो. येथील सर्व शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या भात, बाजरी, काकडी, कोबी यांसह विविध प्रकारच्या भाज्या व फळे अर्पण करून मातेची पूजा करतात. शेतातील पीक आईला अर्पण केल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी येते, अशी त्यांची श्रद्धा आहे.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -