मनमोहक अनोखा अगदी गोलमटोल गोंडस बाळासारखा दिसणारा हा फळ कबुतर. डोक्यावरील गुलाबी भरीव पंखांमुळे एखाद्या रंगीत, सुंदर, रसरशीत फळासारखा. म्हणूनच त्याला “गुलाबी मुकुटधारी फळ कबुतर” असे म्हणतात. झाडांवरून पडलेली फळे, फुले, बिया खातात. साहजिकच यांच्या शरीराचे रंगसुद्धा या फळांसारखेच होतात. त्यांना ‘फ्रुट डव’ असेही म्हणतात.
निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
गुलाबी मुकुटधारी फळ कबुतर म्हणजे नक्की काय? पडला ना प्रश्न तुम्हाला? तर ज्याच्या डोक्यावर रॉयल गुलाबी रंगाचा मुकुट आहे असा श्रीमंती, सुंदर, आकर्षक, असामान्य, दुर्मीळ असा कबुतर. यांच्या डोक्यावरील गुलाबी मोहोळ कधी जांभळट सुद्धा दिसतो. त्यामुळे “जम्बु कबुतर” असे सुद्धा म्हणतात.
डोक्यावर मुकुटासारखे गुलाबी गडद रंगाचे पंख, सततच शरीर फुगवून बसल्यामुळे छातीवर आकाशी पिवळट भुरकट उलगडलेले अर्ध गोलाकार पंख, त्याखाली पोटाकडील केशरी, गुलाबी, पिवळसर पंखांचा भरीव भाग. पाठीवर अतिशय सुंदर मन मोहक हिरवट लांबट गोलाकार टोकाला पिवळट छटा असणारे पंख, छोटीशी शेपूट, लालसर पाय, फळ खात असल्यामुळे नाजूकशी काळपट राखाडी नरम चोच, जेमतेम नऊ इंचांचा असून त्यांचे वजन ९० ग्रॅमच्या आसपास असते. असा एकंदरीत मनमोहक अनोखा अगदी गोलमटोल गोंडस बाळासारखा दिसणारा हा फळ कबुतर. डोक्यावरील गुलाबी भरीव पंखांमुळे एखाद्या रंगीत, सुंदर, रसरशीत फळासारखा. म्हणूनच त्याला “गुलाबी मुकुटधारी फळ कबुतर” असे म्हणतात. या प्रजातीतील माद्या पिवळसर, हिरवट कमी आकर्षक असतात. ही कबुतरं थायलंड, मलेशिया, दक्षिण पूर्व आशिया, सिंगापूर येथे आढळतात.
कबुतरांच्या अनेक प्रजाती आहेत. ब्रॅण्डेड फ्रूट, द ब्लॅक ब्रॅण्डेड, गुलाबी डोक्याचा, फ्लेम ब्रेस्टेड पिवळ्या छातीचा, स्कार्लेट ब्रेस्टेड, अलंकृत, वालेस, अनेक रंगांचा, ख्रिसमस, जांभळ्या टोपीवाला, पलाऊ, मारियाना अशा अनेक प्रजाती आहेत. त्यातीलच ही एक जम्बो फळ कबुतर म्हणजेच गुलाबी मुकुटदारी फळ कबुतर. ही कबुतरं थायलंड, मलेशिया, दक्षिण पूर्व आशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया उत्तरी पूर्व देश येथे आढळतात. नॉब, बील्ड, मकाटिया, ब्लॅक नेप्ड सारखी फळ कबुतर शहरातही दिसतात.
हे पक्षी मँगोव, वर्षावने, तराईमध्येसुद्धा राहतात. हे अतिशय गर्द झाडीत राहिल्यामुळे आणि हिरवेगार पंख असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला दिसत सुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांचे संरक्षण होते. उंच झाडावरील लाल-गुलाबी फळे यांचा आस्वाद बेमुराद घेतात. झाडांवरून पडलेली फळे, फुले, बिया खातात. साहजिकच यांच्या शरीराचे रंग सुद्धा या फळांसारखेच होतात. ही कबुतरं झाडांच्या पानांवरचे पाणी किंवा दवाचे पाणी पितात. जमिनीवरचे पाणी शक्यतो पीत नाहीत. त्यांच्या आहार-विहारामुळे हे इतके सुंदर अगदी ताज्या फळांसारखे दिसतात. ही निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. ही अतिशय लाजाळू, झुंडीत राहणारी, बहुतेक जोड्यांमध्ये वावरणारी, एखाद्या मोठ्या झाडांवर बसून फळ खाणारी, घरटी बांधणारी अशी कबुतरं. प्रजनन काळ नोव्हेंबर, फेब्रुवारी आणि जुलै असतो. हे पावसाळ्यात झाडांवर घरटी बांधतात. बऱ्याचदा यांचा प्रजनन काळ हा बदलत सुद्धा असतो. काड्या, रेशीम, गवत यांनी ते उंच झाडावर आणि गर्द पानांमध्ये घरटी बांधतात. एक किंवा दोन अंडीच देतात. इतर पक्षी पाणी पिताना चोचीत पाणी घेऊन मग मान उंचावून पाणी घशापर्यंत नेतात; परंतु ही कबुतरं अगदी नाकापर्यंत पूर्ण तोच पाण्यात घालतात.
सर्व पक्ष्यांचे निरीक्षण करताना एक गोष्ट लक्षात येते की, एकच प्रजाती असली तरी त्यांची अनेक रूपे दिसतात. सर्व पक्षी दिसायला सारखेच. आपल्याकडे कसं असतं की, भारतीय, चिनी, अमेरिकन, आफ्रिकन यांच्या रूपात फरक असतोच ना? पण यांच्या मिश्रणाने तयार झालेला थोडाफार फरक त्या मानवात असतोच. तसेच पक्ष्यांचे पण असते. म्हणून त्यांच्या प्रजातीमध्ये त्यांना आपण विविध नावे देतो. या पक्ष्यांची शारीरिक ठेवण कधी शेपूट कमी-जास्त असते तर कधी गुलाबी जांभळे तपकिरी भुरकट काळ्या रंगाचे मिश्रण असते, कधी मोठे डोके छाती तर कधी लहान, बहुतेक करून ही कबुतरं दिसायला सारखीच दिसतात. पण यांच्या आवाजात आणि शारीरिक ठेवणीत थोडाफार फरक असतो. काहींचा आवाज शिट्टी मारल्यासारखा असतो. हे ‘फ्रुट डव’ हुं, हुं अशा आवाजात एकमेकांना साद घालतात.
माझ्या या कलाकृतीमध्ये मी तीन फ्रुट डव दाखवलेले आहेत. काळ्या पार्श्वभूमीमुळे हे पक्षी अतिशय सुंदर दिसतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशनमध्ये एकमेकांना चिकटून, अंग फुगवून डहाळीवर बसलेले असल्यामुळे जणू काही त्यांना थंडी वाजत आहे असे वाटते. त्यांचे डोळे आणि त्यांची स्थिती अशी दर्शवते की ते विश्रांती घेत आहेत. पण तरीही ते थोडे त्रासिक वाटतात. काय बरं असेल कारण? या कलाकृतीतील एक गुणवत्ता अशी आहे की पक्षी न बोलताही खूप बोलतात आणि हे आपल्याला जाणवते.मानवाने अचानक केलेल्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास आणि या परिस्थितीतून दुसरा निवारा शोधू न शकण्याची व्यथा ही त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते. जर तुम्ही नीट निरीक्षण केले, तर हे भाव तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत दिसतात. या पक्ष्यांच्या डोळ्यांतच सारे भाव दडलेले असतात. त्यांचा आनंद, सुख-दुःख सारे काही त्यांच्या नजरेतून आपल्याला जाणवते. त्यांची शारीरिक कृती मानवाच्या लवकर लक्षात येत नाही. कलाकृती पाहताना आपण काही क्षणांसाठी तरी त्यांच्या विश्वात हरवून जातो. मी या कलाकृती करताना आपल्यातील आनंद द्विगुणीत करावा या उद्देशाने या कलाकृती बनविल्या आहेत.
प्रत्येक पक्ष्याचे आध्यात्मिक महत्त्व आहे. पांढऱ्या कबुतरांना शुद्धता आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. तसेच माझ्या मते, या रंगीबेरंगी फळ कबुतरांना त्यांच्या रंगानुसार प्रतीक मानले जावे. कारण, प्रत्येकाचा ओरा हा त्याच्या शरीर शास्त्रानुसार प्रबळ असतो आणि तोच आजूबाजूला ही त्याचे ऊर्जात्मक रूप प्रदान करीत असतो. म्हणजेच या गुलाबी आणि हिरव्या रंगमिश्रित फळ कबुतर ही प्रेम, शुद्धता, आपुलकी, दया, उत्कर्ष यांची ऊर्जा देणारी कबुतरं आहेत.
या फळ कबुतरांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे फळ खाताना त्याच्या ज्या बिया असतात, त्याने बीज प्रसार करणे. ज्यामुळे फळांची अनेक झाडे लागली जातात आणि त्याचा उपयोग हा सर्वच सजीव सृष्टीला होत राहतो. आता ही दुर्मीळ प्रजाती नामशेष होत चालली आहे. याला कारणही आपणच आहोत. मुळात आपण वृक्षतोड करीत आहोत त्यामुळे यांना झाडावरील फळही खायला मिळत नाहीत. प्रदूषणामुळे वनराई सुद्धा आता राहिली नाही. बरं हे पक्षी स्थलांतरितसुद्धा होत नाहीत त्यामुळे अन्न न मिळाल्यास यांचा मृत्यू हा निश्चित आहे. ध्वनी, वायू आणि जल प्रदूषणामुळे यांना होणारे आजार हे सुद्धा वाढत आहेत. मग ही प्रजाती विलुप्त होणार नाही, तर काय होईल? खरं तर निसर्गातील सौंदर्य वाढवणाऱ्या, संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्या या पक्ष्यांना नामशेष करण्याचा आपल्याला अधिकारच नाही तरीही आपण तो विडाच उचललेला आहे.