दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
आई होणं एक सुखद भावना असते. ती एका गोंडस बाळाची आई झाली होती. बाळासाठी तिने नोकरी सोडली. बाळ काहीसं मोठं झाल्यानंतर तिला कामाची ओढ वाटू लागली. आपलं शिक्षण, कौशल्य वाया जाईल काय याची भिती वाटू लागली. तिने दुसरी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. पण बाळाकडे आणि नोकरीकडे समान लक्ष देता येईल, अशी तिला नोकरी मिळत नव्हती. आपल्या सारखीच कितीतरी उच्चशिक्षित महिलांची स्थिती आहे हे तिला जाणवलं आणि त्यातूनच निर्माण झाली ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’ नावाची महिलांना रोजगार देणारी वेबसाइट.
एक गुणसंपन्न सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली संकरी सुधार एका आयटी मेजरमध्ये काम करत होती. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात तिला एक मूल झाले. तिच्या कंपनीने तिला पाठिंबा दिला असला, तरी काम आणि मातृत्व यामुळे सुधारला निराश, थकवा यांचा सामना करता आला नाही. सी-सेक्शन पद्धतीने तिची प्रसूती झाली होती. त्यानंतर तिला काहीसं डिप्रेशन आलं होतं.
आठ वर्षे तंत्रज्ञ म्हणून काम सोडल्यानंतर सुधारने घरच्या जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. तथापि, काही गोष्टी बिघडल्या. जेव्हा तिने नोकरी सोडून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला वाटले की, सर्व काही ठीक होईल. पण काही न करता आपण आपली क्षमता वाया घालवतोय या भावनेने प्रत्येक दिवस जायचा. तिला एक विचित्र न्यूनतेची भावना जाणवायला लागली. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सुधारने पदवी घेतलेली आहे. तिने मग स्वत:ला साजेशी अशी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. नोकरी पण करता येईल आणि बाळाचं संगोपन करता येईल असा लवचिक पर्याय शोधण्यास तिने सुरुवात केली; परंतु अनेक कंपन्या तिला कामावर घेण्यास नकार दिला. तिने फ्रीलान्सिंग वेबसाइट्सद्वारे देखील शोध घेतला; परंतु तेथे प्रचंड स्पर्धा होती. तिची चिडचिड व्हायला लागली. दरम्यान एका वृत्तपत्रात एक लेख तिच्या वाचनात आला. ज्यात म्हटले होते की, जगात जास्त शिकलेल्या गृहिणींची संख्या भारतात आहे. तिला जाणवले की, बऱ्याच स्त्रिया अशाच परिस्थितीत आहेत. त्यांच्या पात्रतेचा काही उपयोग नाही का? असा प्रश्न पडतो.
अनेकजण आपल्या देशातील नोकरीच्या उपलब्धतेविषयी बोलतात. नोकरीच्या संसाधनांविषयी बोलतात, कामचुकार लोकांविषयी आपले मत मांडतात; परंतु अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या नोकरीसाठी पात्र आहेत आणि कठोर परिश्रम करण्यास त्या इच्छुक आहेत. जर त्यांना कंपन्यांनी वेळ आणि ठिकाणाची लवचिकता दिली, तर त्यांना कार्य कुशल महिला मिळू शकतात. या विचारातूनच ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’ची पार्श्वभूमी निर्माण झाली. ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झालेल्या, ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’ने आजपर्यंत ६०० हून अधिक महिलांना संधी उपलब्ध करून दिली आहे आणि २,५०० महिलांना पुन्हा कामावर येण्यासाठी सक्षम केले आहे. या प्लॅटफॉर्मवर २६,००० हून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. तसेच सुधारने ६०० कंपन्यांसोबत करार केले आहेत. यामध्ये बहुतेक स्टार्टअप आणि लघू मध्यम उद्योग आहेत.
सुरुवातीला सुधारला लिंक्डइनचा वापर करून काही लीड्स मिळाल्या.
तिथे तिने तिचा वैयक्तिक ब्रँड तयार केला होता. तथापि, कंपन्यांचा महिलांप्रती वेगवेगळा दृष्टिकोन तिला अनुभवयास मिळाला. काहींना असे वाटले की ते केवळ महिलांसाठीचे व्यासपीठ असल्याने आणि महिला नोकऱ्या शोधत असल्याने त्यांना खूप कमी पगार आपण देऊ शकतो. सुधारकडे आलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो कंटेंट रायटर शोधत आहे आणि महिन्याला ५,००० रुपये देईल. इतर काही कंपन्या सेल्स आणि विमा एजंटच्या शोधात होते. पण एक गोष्ट सुधारची सुरुवातीपासूनच स्पष्ट होती. तिच्या प्लॅटफॉर्मवर डेटा प्रोसेसिंग, रिसेलिंग किंवा इन्शुरन्स खरेदी यासारख्या नोकऱ्यांना ती स्थान देणार नव्हती. कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, कस्टमर सर्व्हिस रोल्स आणि ॲडमिन ऑपरेशन्स यासारख्या क्षेत्रातील नोकऱ्यांना ती स्थान देणार होती.
सुधारची वेबसाइट फ्रीलान्सिंग आणि पूर्णवेळ असे दोन्ही पर्याय ऑफर करते पण ते पुन्हा स्त्रीच्या आवडीवर अवलंबून असते. जर ती तिचा वेळ ८-९ तास देऊ शकत असेल, तर तिच्या अर्जावर वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. सुधारचं असं निरिक्षण आहे की, बहुतेक कंपन्या अधिक महिलांची भरती करण्यासाठी परत येतात. लिंक्डइन व्यतिरिक्त, ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’ फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियाचा सुद्धा वापर करते. या माध्यमातून महिला नोकऱ्या शोधत असतात. ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’ची प्रक्रिया सोपी आहे. स्वारस्य असलेल्या महिला त्यांच्या बायोडाटासह या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात, त्यांचे अनुभव आणि इतर तपशील आणि करिअरमध्ये घेतलेल्या ब्रेकची कारणे लिहू शकतात. डेटावर अवलंबून आणि जशी गरज असेल व आवश्यक कौशल्य जुळेल, तेव्हा कंपनी त्यांना संपर्क करते.
‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’सारखे प्लॅटफॉर्म महिलांना केवळ नोकऱ्या शोधण्यातच मदत करत नाहीत तर त्यांना त्यांचा आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करण्यास सक्षम बनवतात. अशीच एक गृहिणी भाग्यश्री, तिने अभियांत्रिकीची पदवी घेतलेली. कॉलेजनंतर लग्नाच्या कौटुंबिक दबावामुळे तिला शिक्षण सोडावे लागले. सात वर्षांनंतर, तिला स्वत:चं काहीतरी करायचं होतं. तिने शिकवणीसाठी प्रयत्न केले पण वेळेवर पैसे न मिळाल्याने तिचा उत्साह कमी झाला. “मला ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’बद्दल माहिती मिळाली आणि प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली. मी काय शोधत आहे याची मला खात्री नव्हती; परंतु माझ्या पात्रता आणि अपेक्षांशी जुळणारी नोकरी शोधण्यात मला मदत करण्यासाठी टीमने प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली. त्यांनी एका क्लायंटसोबत मुलाखतीची व्यवस्था केली आणि मला माझ्या करिअरला सुरवातीपासून सुरुवात करण्याची संधी मिळाली,” असं भाग्यश्री म्हणते. चेन्नईस्थित एका आयटी कंपनीने या प्लॅटफॉर्मवरून तीन महिलांना इंटर्न म्हणून ठेवले आहे. काही कालावधीनंतर या महिलांना, ते पूर्णवेळ कर्मचारी म्हणून सामावून घेणार आहेत.
सुधारला अधिकाधिक महिला आणि कंपन्यांना ‘ओव्हरक्वालिफाईड हाऊसवाईव्हज’च्या व्यासपीठावर आणायचे आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करायचे आहे. यामुळे अधिक महिलांची नियुक्ती करता येईल आणि एक स्वयंपूर्ण परिसंस्था तयार करायची आहे. सुधारसारख्या ‘लेडी बॉस’ अशा प्रकारे गरज ही शोधाची जननी असते हे वाक्य खरं करून दाखवतात. आज हजारो कार्यकुशल महिलांना घरबसल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत आहे.
[email protected]