काही गाणी तर अशी असतात की, असे वाटते की आपल्या मूडसाठीच जणू रचली असावीत. प्रत्येक वयात नि प्रसंगात गाणी आपली साथसोबत करतात. शाळेची सहल असो वा नातेवाइकांचे गेट-टुगेदर, गाण्यांच्या भेंड्या हमखास असतात! अशा तऱ्हेने ही गाणी आपले मन दुसऱ्या माणसाला जाणवून देण्याचे काम करतात नि आपले समग्र जीवन समृद्ध करतात!
प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
एका कवितेच्या कार्यक्रमात गेले होते. तिथे एक गृहस्थ आले होते. कवितेचे रसिक या नात्याने मी त्यांना ओळखत होते. कार्यक्रम संपल्यावर मी निघताना त्यांनी विचारले, “तुम्हाला फार घाई आहे का?” मी म्हटलं, “नाही.”
“मग चला तर, खूप चांगला कार्यक्रम आहे.”
मी विचारले, “कोणता?”
तर म्हणाले, “गाण्याचा कार्यक्रम आहे. इथे बाजूलाच हॉल आहे, दोन मिनिटांच्या अंतरावर. दोन-तीन तासांचा कार्यक्रम आहे. तुम्ही केव्हाही निघू शकता.”
त्यांच्यासोबत दोन-तीन कवीही होते. त्यांना नाही म्हणणे जड गेले. मनात म्हटले, इथपर्यंत आलोच आहोत, तर अजून दहा-पंधरा मिनिटांनी काय फरक पडतो? चला, त्या माणसाला तरी आनंद देऊया, म्हणून त्या कार्यक्रमाला गेले.
हॉल अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला होता. एक मुलगा आणि मुलगी छान सूत्रसंचालन करत होते. पाच-सहा गायक हिंदी आणि मराठी गाणी गात होते. तिकडे गायकांनी गाणी सुरू केली की इकडे इतर सर्व लोक त्यांच्यासोबत गुणगुणायचे. मग एक धडकत-फडकत असे गाणे सुरू झाले.
“शोला जो भडके… दिल मेरा धडके…”
ते ऐकून चक्क दहा-पाच माणसांनी नाचायला सुरुवात केली. तो व्हीडिओ शूट करणारा, गाणं कमी आणि डान्स जास्त शूट करू लागला. आम्ही रसिकसुद्धा नाचातच जास्त रमलो. मी गंमत बघत होते. गाणं-नाच आणि एकंदरीतच संपूर्ण उल्हासमय अशा कार्यक्रमाचा सर्वजण आनंद घेत होते. जगभराचे ताण जणू त्या सुरांमध्ये विरघळून गेले होते. मी खरं तर दहा मिनिटांसाठी गेले होते. पण चक्क तास-दीड तास थांबले. विचार करत होते, आपल्या आयुष्यात नेमकं गाणं केव्हा आलं…? हो म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात गाणं येतच! “अडगुलं-मडगुलं”, “लिंबोणीच्या झाडामागे…” अशी तस्सम गाणी म्हणून प्रत्येकाची आई आपल्या मुलाला झोपवते. मग शाळेच्या प्रवेशाच्या वेळीसुद्धा आपल्याला कोणते तरी गाणे म्हणून दाखवावे लागते. आपण ते अगदी तोंडपाठ म्हणून दाखवतो. कधी कधी त्या गाण्याच्या निगडित अॅक्टिंगसुद्धा करून दाखवतो आणि मग आपल्याला शाळेत प्रवेश मिळतो.मला खूप लहानपणीच्या गोष्टी आठवतायेत. आकाशवाणीवर लागणारी गाणी ऐकत ऐकत शाळेचा युनिफॉर्म घालणे, सकाळचे दूध पिणे चालू असायचे. सकाळच्या वेळेस जी गाणी कानावर पडायची, त्यात “उठी गोविंदा उठी गोपाळा”, “पहाट झाली…” अशा भूपाळ्या किंवा तत्सम गाणे असायचे. दुपारी जेवणाच्या वेळेससुद्धा कोणती तरी गाणी चालू असायची. त्याची शिफारस कोण कोण करायचे त्यांचीही नाव घेतली जायची, त्यात अगदी हमखास एक नाव असायचे, झुंबरीतलैयासे गोपाल, माशुका, राहुल… आजपर्यंत हे झुमरीतलैया भारताच्या नकाशावर कुठे आहे, हे मात्र कळले नाही. पण नेमका भाताचा घास तोंडात घालावा आणि ओळी ऐकू याव्यात, “कोण गेले कुणासाठी रक्त ओकून…” आणि मग ताईला जोरात ओरडून सांगायचे, “आधी तो रेडिओ बंद कर!”
पण काही असो. तरुण झाल्यावरसुद्धा कोणतेही प्रेमाचे गाणे ऐकल्यावर कोणत्या तरी मुलाचा चेहरा किंवा सिनेमातला हिरो मात्र डोळ्यांसमोर निश्चितपणे यायचाय आणि गालातल्या गालात लाजरे हसूसुद्धा फुलायचे. शाळेची सहल असो वा नातेवाइकांचे गेट-टुगेदर गाण्यांच्या भेंड्या हमखास असायच्याच! मला आठवते, एकदा या वर्तमानपत्रामध्ये ‘भेंड्या’ लिहून पाठवायच्या होत्या. मग काय एक गाणे, त्याचं शेवटचं अक्षर घेऊन त्यांच्या आद्याक्षराने सुरू होणारे दुसरं गाणे अशा तऱ्हेने मी भेंड्या लिहून पाठवल्या होत्या. माझ्या फोटोसहित चक्क त्या छापूनही आल्या होत्या, तेव्हा झालेला आनंद आजही माझ्या स्मरणात आहे.
काही गाणी तर अशी असतात की, असे वाटते की आपल्या मूडसाठीच जणू रचली असावी.
माझी एक मैत्रीण शाळेत दोन-तीन दिवस आली नव्हती, तर तिला शाळेचा अभ्यास हवा होता. पण मला त्या वयात, त्या क्षणी तिला माझ्या वह्या द्यायच्या नव्हत्या. मला आठवत नाही की मी त्याच्यात काही लिहिलेले होते म्हणून की मीच नेहमी का द्यायच्या? या विचाराने. इतक्यात रेडिओवर गाणे सुरू झाले –
“एक एहसान कर… अपने मेहमान पर,
अपने मेहमान पर एक एहसान कर…”
मग काय, मी दप्तरातून वह्या काढल्या आणि तिला दिल्या. आता हा लेख वाचताना तुम्हालाही अशी कितीतरी गाणी आठवतच असतीलच की ज्या गाण्यांनी आपल्याला त्या क्षणांची सोबत केली होती. आता जाता जाता एक गाणे आणि त्याची गंमत सांगते. माझ्या लहानपणी ‘सातच्या आत घरात’ ही गोष्ट पाळावीच लागायची. खेळणे असो, फिरायला जाणे असो, भाजी आणणे असो… काहीही. हे सगळे सातच्या आत उरकावे लागायचे. एकदा मी घरात आले आणि गाणे सुरू होते,
“या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या!”
ते गाणे ऐकले आणि आईचे डोळे पाणावले.
ती म्हणाली, “मला खूप वाटतं गं तू अजून खूप खेळावं म्हणून… पण तुझ्या बाबांना नाही आवडणार, आजीला तर नाहीच नाही… म्हणून तुला घरी बोलावलं!”
तर अशा तऱ्हेने कधी कधी आपले मन दुसऱ्या माणसाला जाणवून देण्याचे काम किती व्यवस्थित ही गाणी करतात! आपले समग्र जीवन समृद्ध करणाऱ्या या गाण्यांचे कितीही कितीही आभार मानले तरी ते फिटणारच नाहीत म्हणून आपल्या मित्रांसाठी हे गाणं लक्षात ठेवा. –
“कभी अलविदा ना कहना
कभी अलविदा ना कहना!”
pratibha.saraph@ gmail.com