Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाजहोळी - तेजतत्त्वाची आराधना

होळी – तेजतत्त्वाची आराधना

होळी, धुळवड, रंगपंचमी हे सगळे दिवस रंगांमध्ये न्हाऊन निघणारे… जणू आयुष्याला चिकटणारे…! निसर्गाप्रमाणेच माणूसही अनेक रंग मिरवत असतो. त्याच्या कृतीतून, उक्तीतून, विचारांमधून ते प्रकटत असतात. मात्र कोणत्याही हिशेबाशिवाय, निर्व्याज मनाने आणि मनातील मळभ दूर काढत येणाऱ्या प्रकाशवाटांचा मार्ग सुकर करण्यासाठी होळीच्या निमित्ताने ते अंगावर माखले जातात, तेव्हा अधिक खुमासदार दिसतात…

होळी विशेष : ऊर्मिला राजोपाध्ये

होळी… आपल्या संस्कृतीतील एक सुंदर आणि मराठी कालगणनेनुसार वर्षाखेरीस येणारा एक महत्त्वपूर्ण सण. हा सण जीवनातील अनेक पैलूंना स्पर्श करून जातो. एकीकडे प्रत्येक माणूसच जगण्यात सप्तरंग शोधत असतो. सर्व रंग स्वत:मध्ये, आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सामावून घेण्याची, त्यात माखून निघण्याची आंतरिक इच्छा प्रत्येकालाच असते. कोणाला ती साधते, तर कोणाला साधत नाही हा भाग वेगळा, पण बाहेरचा निसर्ग वसंतागमनाचे सोहळे साजरे करत असताना, झाडाझाडांवर फुलोरा दाटत असताना ते रंग आपल्याही तनूवर, वृत्तीवर लेऊन घेण्याचा एक बाह्य उपचार साजरा करणारा सण म्हणजेच होळी आणि रंगपंचमी. तसे पाहायला गेले, तर दररोजच भावभावनांचे वेगवेगळे रंग घेऊन आपण वावरत असतो. त्यातील काही आतपर्यंत झिरपलेले असतात, स्वभावात सामावलेले-समरस झालेले असतात, तर काहीचे वरपांगी लेपन झालेले असते. वेळ येईल, तसा स्वभावातील प्रत्येक रंग समोर येत आपला परिचय देत असतो. पण होळी आणि रंगपंचमी मात्र सगळे काही उघड उघड दाखवण्याची मुभा देऊन जाते. संस्कृतीची, अभिव्यक्तीची, अनावृत्त होण्याची ही ‘सुसंस्कारित’ सोय करून ठेवल्यामुळे भावनांचे विरजण होते आणि नागाने कात टाकून नव्या तकाकीने जळजळत सिद्ध व्हावे तसे तन-मन आगामी वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होते. त्यामुळेच परंपरेप्रमाणेच वाढत्या मानसिक आंदोलनांच्या आजच्या काळात या सणाचे सादरीकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, असे म्हणावे लागेल.

व्यक्त होणे ही मूळ प्रेरणा असली तरी बरेचदा परिस्थितीमुळे ती दाबून टाकणे क्रमप्राप्त ठरते. आपले आर्थिक, सामाजिक, नैतिक, भौतिक आदी प्रकारचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाला एखाद्या रंगाचा बुरखा घालून जगण्याखेरीज पर्याय नसतो. ही अगतिकता काळानुरूप वाढत गेल्यामुळेच आचार आणि व्यवहारातील पूर्वीचा मोकळेढाकळेपणा हळूहळू हरपत गेला आणि एक प्रकारचे अस्तरातले जगणे आपण कवटाळू लागलो. मात्र त्यामुळे वाफ कोंडण्याचे प्रमाणही वाढले, कारण आयुष्याच्या धकाधकीत, जगण्याचा संघर्ष वाढत असताना हेे सूत्र काही संपले नाही. पूर्वी चार शिव्या हासडून, ओरडाओरडा करून, रुसून-फुगून वा अन्य प्रकारे नाराजी व्यक्त करत ही कोंडी अनायसे फुटत असे. मात्र सध्याच्या तथाकथित ‘सोफॅस्टिकेडेड’ जगण्याला ही संकल्पना रुचत नाही आणि परवडतही नाही. त्यामुळेच या ना त्या प्रकारे प्रत्येक दिवशी साजरा होत असला तरी होळीला ‘शिमगा’ गरजेचाच वाटतो. बदलत्या काळाने शिमग्याचे संदर्भही बदलवून टाकले आहेत ते असे.

देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या उपचारानिशी होळी साजरी होते. आपल्याकडे होळी अग्निदेवता म्हणून पूजली जाते. अग्नी हे तेजतत्त्वाचं प्रतीक आहे. तेजतत्त्वाचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे ते प्रिय आणि अप्रिय अशा सगळ्यांनाच आपल्याजवळ घेते आणि त्यातून एक नवे तेज उत्पन्न होते. अज्ञान नाहिसे होणे आणि ज्ञानाचा स्वच्छ प्रकाश मिळणे याचा हा उत्सव असतो. त्यालाच आपण होळी पार्णिमा म्हणतो. पौर्णिमा या शब्दाचा अाध्यात्मिक अर्थ खूप वेगळा आहे. चंद्र ही मनाची देवता मानतात. मनाच्या धारणा शुद्ध असतील तितकी प्रज्ञा काम करते. मनाचा नितळपणा प्रतिभेचा धर्म ठरतो. हाच नितळपणा आणण्यासाठी होळीच्या निमित्ताने आपण स्वच्छता करतो.

परिसरातले, मनातले सूक्ष्म दोष नाहिसे होणे आणि नव्या वाटा चोखाळणे हा होलिकोत्सवाचा उद्देश आहे. एका अर्थाने हे देवीचे तेजस रूप आहे. आदिवासी लोकांमध्ये हा उत्सव महत्त्वाचा मानतात. त्यांच्या दृष्टीने ती दिवाळीच असते. वृक्षाचा भला मोठा दांडा आणायचा, त्याभोवती गोवऱ्या, लाकडे लावायची, त्याचे पूजन करायचे आणि रात्रभर होळीची गाणी म्हणायची… एका अर्थाने तो भावनांना वाट मोकळी करून देण्याचाच एक मार्ग असतो. अत्यंत बेहोशपणे नाचायचे, गायचे; परंतु शेवटी मात्र वसुंधरेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची… होळी पौर्णिमेच्या दिवशी साखरेचे हार आणि कंकण तयार करतात. ते होळीला त्याचबरोबर लहान मुलांनाही घालतात. आपल्या जगण्यात अधिक गोडवा येऊ दे आणि अवघे जगणेच सृष्टीचे गाणे होऊ दे, असा याचा अर्थ काढता येतो.

कोकणातला शिमगा अत्यंत महत्त्वाचा असतो. विविध वाद्ये, झांजा घेऊन गावीगावी फिरत सर्वजण गाणी म्हणतात. या काळात होळीचे वेगळे वारे वाहत असतात. ऊन काहीसे वाढलेले असते. नद्या क्षीण झालेल्या असतात. या सगळ्या वातावरणामध्ये होळी पेटवणे म्हणजे पर्यावरण शुद्ध राखणे असते. इथे एक लोकसंकेत अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे होळीसाठी कुठलेही झाड कापायचे नाही. कापलेल्या झाडाने सिद्ध केलेली होळी पावत नाही, असे म्हणतात. वाळक्या, पडलेल्या फांद्या आणि पाचोळा गोळा करून होळी पेटवायची असते. त्यासाठी वृक्षांची कत्तल करायची नाही. होळीच्या संकल्पात याचा विशेष उल्लेख आहे, कारण वृक्ष माणसांच्या जगण्याचा आधार आहेत. वृक्ष तोडून कोणतेही साजरीकरण करायचे नसते हे आधीची पिढी जाणत होती पण आता त्याचा विसर पडलेला दिसतो. त्यामुळे या विचाराची उजळणी करायला हवी.

होळी हा सामाजिक संदेश देणारा सण आहे. त्याचबरोबर तो तनामनातील उत्साह द्विगुणीत करणाराही सण आहे. होळी पौर्णिमेत विविध रंगांची उधळण होते. धुळवडीच्या निमित्ताने रंग खेळले जातात. होळी पाच दिवस ठेवायची असते. पौर्णिमा ते रंगपंचमीपर्यंत हा सण साजरा होतो. काही ठिकाणी होळी महत्त्वाची असते, तर काही ठिकाणी रंगपंचमी. पण तसे बघायला गेले तर त्या मानाने भारतात धुळवड जास्त खेळली जाते. अलीकडे महाराष्ट्रात दोन्हींचाही आनंद लुटला जातो. या सगळ्यात पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत पाच दिवस गोकुळ-वृंदावनात होळी खेळली जाते, ती खास असते. इथे मोठमोठ्या हौदांमध्ये रंग तयार केले जातात. ते फुलांचे असतात. त्यात कोणतेही रासायनिक रंग नसतात. अशी होळी आणि त्या होळीची काही पद्यही प्रसिद्ध आहेत. आजही अनेक गायक आपल्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून होरी गातात. या सगळ्याचा भावार्थ एकच… तो म्हणजे आपण सगळे एक आहोत; या सृष्टीची लेकरे आहोत. आपण सृष्टीला सांभाळले तरच ती आपल्याला निरोगी ठेवेल. यासाठी पुन्हा एकदा निसर्गाला साकडे घालायचे असते. मी काय करतो आहे, यापेक्षा माझे करणे समाजासाठी कितपत उपयुक्त ठरणार, ही भावना इथे महत्त्वाची असते. ती वाढीस लागली, तर माणूस माणसासारखा वागेल, त्याच्या जगण्यातल्या किती तरी समस्या तोच सोडवेल.

मात्र आज तसे घडताना दिसत नाही. आजची वृत्ती सेल्फीची आहे. या सेल्फीमुळे आपण अधिक ‘सेल्फिश’ झालो आहोत. मला काय त्याचे, ही वृत्ती वाढत आहे. त्यामुळेच होळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येऊन एकत्वाची, एकतेची प्रार्थना करणे गरजेचे आहे. आपण सारे तेजाचे उपासक आहोत. आपल्याला पुढच्या तेजाच्या वाटा दिसाव्यात आणि त्यातून तेजाची सुंदर लेणी खोदावीत हेच होळी पौर्णिमेचे प्रयोजन आहे. मनाच्या सर्व नकारात्मक भावना होळीला अर्पण करायच्या आणि शुद्ध भावनेतून प्रार्थना करायची. यासाठी होळी पौर्णिमेचे स्मरण महत्त्वाचे वाटते.

होळीच्या निमित्ताने बोंब ठोकली जाते. तिलाच ‘शिमगा करणे’ असे म्हणतात. हिंदीबहुल भागात होळीच्या निमित्ताने हास्य कविता संमेलने होतात. एका अर्थाने ते व्यंग टिपण असते. त्यामध्ये कधी उपहास असतो, कधी उपरोध असतो तर कधी मिश्कील भाष्य असते. हे इतके मार्मिक असते की, उद्देशून केलेले असते, त्यालाही आवडून जाते. एकंदरच मनातील मलिनता बाहेर काढत तोंड गोड करायचे आणि विनोद, व्यंग यातून एक वेगळा आनंद घ्यायचा ही पद्धत आपल्या उत्तुंग संस्कृतीचा परिचय देणारी आहे, यात शंका नाही. मळभ दूर झाल्यानंतर सामाजिक वातावरण निरोगी होण्यास मदत होते. मने स्वच्छ होतात आणि मानवी व्यवहार सुलभ होतो. स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र मनाने नववर्षाला सामोरे जाताना आपल्याला आणखी काही नवे करण्याचा मार्ग सुचतो आणि यामुळेच नव्या प्रकाशपर्वाला आरंभ होतो. चला तर, आपणही नवपर्वाच्या स्वागताला सज्ज होऊ या. आनंदाने होळी साजरी करत, विखार दूर करत सद्विचारांना वाट मोकळी करून देऊ या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -