Thursday, July 25, 2024

होळी…

प्रासंगिक : वर्षा हांडे-यादव

होळी रे होळी
पुरणाची पोळी
कोणी म्हणे रंगपंचमी
कोणी म्हणे धुळवड
विविध रंगांची खेळी
तेजस्वी प्रकाशित होळी…

आपल्या देशात विविध सण साजरे केले जातात. त्यापैकी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा होळी हा भारतातील एक मुख्य व प्राचीन सण आहे. सत्याचा असत्यावर मिळवलेला विजय व वाईटाचा चांगल्यावर मिळवलेला विजय हे या सणाचे महत्त्व आहे. वादविवाद, राग, द्वेष विसरून सगळेजण होलिकादहनाला एकत्र येतात. होळी या सणाला होळी पूर्णिमा असेही संबोधले जाते. या उत्सवाला होलिकादहन, होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दौलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. होळी बंहुभाव व सामाजिक बांधिलकी वाढवण्यासाठीही असते.

शेतकरी वर्गात होळी सणाचे खास महत्त्व आहे. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी ते प्रार्थना करतात. या दिवसांत गव्हाचे पीक तयार होते. होळी सणामागची पौराणिक कथा अशी आहे की, या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद याची राजा हिरण्यकश्यप व त्याची बहीण होलिका यांच्या कटुनीतीतून सुटका केली. त्या दिवशी होलिकाने तिला दिलेल्या वरदानाचा दुरुपयोग केला. त्यामुळे तिचे दहन झाले. भक्त प्रल्हादाला अग्नी काहीच करू शकला नाही. त्या दिवसापासून हा सण होलिकादहन म्हणून साजरा होऊ लागला.

होळी सणाविषयी वैज्ञानिक कारण असे मानले जाते की, हिवाळा संपून उन्हाळा चालू झालेला असतो, उन्हामुळे उन्हाच्या कडाक्याने जमीन भाजून निघते व सभोवती पानांचा कुजलेला कचरा तयार झालेला असतो. तसेच पालापाचोळा जमा झालेला असतो. हा कचरा आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यामुळे या पालापाचोळ्याची होळी करून उष्णता देणाऱ्या अग्नीला प्रणाम करून वसंत ऋतूचे स्वागत करावे. या होळी सणाचे शास्त्रीय महत्त्व म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे ती प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे, अशी अपेक्षा असते.

या सणाला पुरणपोळी, आमटी-भात, भजी, कुर्डया, पापड्या यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर नारळ फोडून होळीचे दहन केले जाते. पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते, तर दुसऱ्या दिवशी शहरी भागात रंगपंचमी साजरी केली जाते.
होळी साजरी करताना बरेचदा वृक्षतोड होत असते. या पार्श्वभूमीवर होळीची संख्या कमी करणे, लहान होळी करणे, प्रतिकात्मक होळी करणे म्हणजेच भ्रष्टाचार, अपप्रवृत्ती, वृक्षतोड इत्यादींबाबतची प्रतिकात्मक होळी साजरी करणे रासायनिक रंगाचे दुष्परिणाम समजावणे नैसर्गिक रंग प्रत्यक्ष कसे तयार होतात, त्याचा अनुभव देणे. यांसारख्या गोष्टी प्रत्येकाने घराघरांतून आपल्या मुलांना समजावणे आवश्यक आहे.

होळी करू दुर्गुणाची
नका प्रदूषण करू
होळी करू व्यसनांची
नका वृक्षतोड करू…

 

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -