हलकं-फुलकं – राजश्री वटे
llश्रीll
प्रिय बालपणास,
तुला पत्र लिहिते आहे… पहिल्यांदाच…
आज मी एक प्रौढा आहे, विचारांनी प्रगल्भ आहे असा माझा समज आहे. माझ्या जीवनातील तुझे अस्तित्व धुसर, पुसटसं होऊन गेले आहे.
जवळजवळ बारा वर्षे आपण सोबत होतो नाही कां? एक तप… तू माझ्याजवळ असताना किती निरागस होतो आपण!
खूप गमती केल्या, कोणी काही नावे ठेवेल याचा विचार करण्याची अक्कल तरी कुठे होती आपल्याला! मस्ती करायची, खूप खेळायचं व वेळ मिळाला की, अभ्यास करायचा. काय काय केलं हे आठवलं की, मात्र हसायला येतं, रस्त्यावर खेळणं, खेळ भांडी, लंगडी, लगोरी, सुरकाडी, होळीसाठी शेणाच्या गवऱ्या थापणं, दिवाळीचा किल्ला करायला हाताने माती कालवणे, आकाशकंदील बनवणे… पण त्या अल्लड वयात कशाचीच फिकीर नव्हती. चिंचा, बोरं बिनधास्त खायचं… ढाँ ढाँ खोकलायचं अन् फिदी फिदी हसायचं, रूप तरी किती बावळं… तेल लावून घट्ट दोन वेण्या, त्यावर फडफडणारं रिबनचं फूल, गुडघ्यापर्यंत फ्रॉक असं अजागळ ध्यान… तरुणींच्या अदा चोरून न्याहाळायच्या अन् आरशात बघून मुरकायचं… मज्जा यायची!
माझ्यातील बालपण संपून तारुण्याचं आगमन झालं, मन खूप आनंदलंं, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलू लागलं. यात तुझी संगत सुटत गेली हे सुद्धा कळलं नाही! जे बालपणी करायला मोठे रागवायचे ते नखरे करायला मिळणार म्हणून मन मोहरून गेले होते. सिनेमा पाहिल्यावर नट्यांची नक्कल करून बघणं, त्या प्रेमगीतात स्वत:ला ठेऊन बघणं, सगळंच कसं आगळं-वेगळं! मंतरलेले दिवस होते ते… स्वत:च्या तरुणपणाचा नटून थटून, मिरवून, लाजून अन् चिडूनसुद्धा आस्वाद घेणं जमायला लागलं होतं.
या सगळ्यावर मनापासून खूश होते, सप्तरंगाच्या धनुष्यावर स्वार होते. मन कसं बेफिकीर, बेधूंद भासत होतं. जग फक्त स्वत:भोवतीच आहे असं वाटत असे! त्या मैत्रिणी, गुलुगुलू गोष्टी, खिदळणं ते म्हणजेच जगणं! व्वा!! जसं तारुण्याचं आगमन झालं, त्या बहरात, त्या नशेत, तुझं हळूहळू माझ्यापासून दूर होणं, मला जाणवलंच नाही.
एक दिवस लग्न होऊन, माप ओलांडून नवरी झाले, वीस-पंचवीस वर्षे मुलं-बाळं, संसार, सासर, माहेर या सगळ्यांत कुठे हरवून गेली कळलंच नाही. बाळाचं बालपण पाहण्यात इतके रमले की, तुझी पुसटशी आठवणही आली नाही. खूप दूर निघून आली होती तुझ्यापासून, आज बाळाचं बालपण, तरुणपण पाहताना गेल्या दिवसांची तुलना करते, त्यांच्या सहवासात मन तरुण करते. त्यांचा अल्लडपणा ‘जाने दो यार’ म्हणून दुर्लक्षित करते.
आज तुझी खूप आठवण आली. या वयात असतात तसं कर्तव्याची, संसाराची जबाबदारी आहे. दागदागिने, साड्या यांचं देखील एक प्रकारचं ओझंच म्हणायचं, सगळं झुगारून टाकावसं वाटतंय. पुन्हा मोकळा-ढाकळा गबाळा फ्रॉक घालून सगळ्या बंधनातून बालपणात शिरावसं वाटतंय! आयुष्याच्या पायऱ्या चढताना मागे वळून पाहिले, तेव्हा पहिल्या पायरीवरचं तुझं अस्तित्व दिसले, ते इतकं निरागस होते की, त्याला राग, लोभ, अहंकार, मत्सर याचा स्पर्शही नव्हता.
हे बालपणा… एकदा तरी मिठीत घेशील ना रे… घेणारच तू… तुझ्यासारखं निरागस, निस्वार्थ व्हायचं आहे… जमेल ना रे…
– एक प्रौढा!