Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘टीनएजर्सच्या मेंदूतील केमिकल गोंधळ’

‘टीनएजर्सच्या मेंदूतील केमिकल गोंधळ’

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू

मुलं वयात आली की, ते इतके वेगळंच, कधीकधी चक्क वेड्यासारखा हट्ट करत, तर कधी अतिआक्रमकपणे वागतात. मग असं वाटतं की, कुकरमधली कोंडलेली हवा कशी बाहेर पडते, कुकरची शिट्टी झाली की, तशी मुलं आपला राग, हट्ट व्यक्त करतात. कधी जेवणावर बहिष्कार, तर कधी अबोला धरून स्वतःच्या बेडरूममध्ये बंद करून घेतात. माझ्या डोक्याला शॉट देऊ नका, असं म्हणत तुम्ही बोलत असताना चक्क कानात बोटं घालून बसतात. बाहेरचा राग तुम्ही माझ्यावर काढता आहात हे कळतंय मला, असं म्हणतात. तर तू सारखं माझ्याबद्दल निगेटिव्हच बोलणार आहेस का? प्रत्येक गोष्ट का पुन्हा-पुन्हा सांगतेस. मी काय लहान बाळ आहे का? Please give me my space. सारखी अभ्यास अभ्यास काय करतेस, दुसरं काही करू नको का? मागे नको लागूस. मला वाटेल तेव्हा करेन नाही, तर करणारच नाही. आता इमोशनल अत्याचार नको करूस. जरा चिल कर.

अबब काय ही भाषा, काय हे बोलणं, किती हा उद्धटपणा. आमच्या वेळी नव्हतं असं. काय बिशाद होती आई-वडिलांसमोर असं बोलण्याची. असं मनात आलंच न तुमच्या. पण त्याचा काही उपयोग नाही. आपल्या वेळेसही टीनएजर्सच्या मेंदूत असा केमिकल गोंधळ होताच. फक्त घरातील कडक शिस्त, वातावरण, संस्कार यामुळे आपलं मत मांडण्याची हिंमत आपण करत नव्हतो. माध्यमातून मिळणारं एक्स्पोजर नसल्याने त्या बाबतीत अज्ञानातील इनोसन्स होता. म्हणूनच एखादा अपवाद वगळता सगळे सुतासारखे सरळ होते. आताची वाट मात्र नागमोडी विळखा घालणारी आहे म्हणूनच पालकांनो दोघांनीही लढाईचा पवित्रा घेऊन दोन हात करायचेच हा आविर्भाव फार उपयोगाचा ठरत नाही. मुलं मोठी करणं खायचं काम नव्हे. चार पावलं नाहीतर चक्क दहा पावले मागे जावं लागतंय. तर हरकत नाही. हा वेडेपणा फार काळ टिकत नाही. मुलं हळूहळू शहाणी होतात. पण हे असं वागण्यामागे कारणं तरी काय असतात हे जाणून घ्यायलाच हवं. माझ्या मुलाच्या मेंदूत नेमकं चाललं तरी काय असावं? असा प्रश्न बहुतेक वेळा पालकांच्या मनात एकदा तरी येतोच. मुलांची सरसर वाढणारी उंची, त्यांच्या बुटांचा भराभर वाढणारा साईज, मुलींचा सुडौल होऊ पाहणारा बांधा हे अचानक होणारे बदल जसे तुम्हाला काळजीत टाकतात तसेच टीनएजर्सनाही गोंधळवून सोडतात.
आता जरा माहीत करून घेऊ या हे नेमकं का होतं, काय होतं?

 •  पौगंडावस्था teenage हा वाढीचा एक गुंतागुंतीचा काळ असतो.

११ ते १९ या वयात फक्त बाहेरून दिसण्यातच नव्हे तर आतूनही बदल होत असतात. इथे जम्पिंग सुरू असतं. ही मुलं एका अवघड आणि झपाट्याने घडून येणाऱ्या, झटका बसेल अशा बदलाला सामोरं जात असतात. या वयात त्यांच्यात आकलन पातळीवरील कौशल्यं (cognitive skills) तसंच स्पर्धात्मकता (competences) येत असते. मुलं कितीही उंच दिसायला लागली, मुली कितीही मोठ्या दिसायला लागल्या तरी ते अजूनही डेव्हलपमेंट पिरियडमध्ये असतात. लहानपणी पहिल्या तीन वर्षांत आणि त्यानंतर टीनएजमध्ये दुसऱ्यांदा neuronal sprouting म्हणजेच मेंदूकडून पेशींचे संदेश नेणाऱ्या वाहिलेला नवनवीन कोंब फुटतात जणू.

 •  तुमच्या टीनएज मुलाचा मेंदू मॅसीव्ह कन्स्ट्रक्शनच्या स्थितीत असतो. सहा वर्षांपर्यंत त्यांच्या वाढीचा वेग जबरदस्त असतो. ॲडल्ट माणसाच्या जवळजवळ ९०-९५% इतका. उरलेली ५% वाढ मुलं जेव्हा १३ वर्षांची होतात तेव्हा होते ती थेट २० वर्षांपर्यंत होत राहते. ह्या काळात विचार करणे आणि त्यानुसार कृती करणे यात मुलांमध्ये जबरदस्त कायापालट होतो. मुलांच्या मेंदूतील जे कनेक्शन्स विचार करताना आणि कृती करताना ते वापरत नाहीत त्यांची छाटणी होते आणि त्याचवेळेस इतर कनेक्शन्स मजबूत होतात. अशा पद्धतीने मेंदू अधिक कार्यक्षम होत असतो.
 •  या वयात मुलांमध्ये नवीन विचारकौशल्ये निर्माण होतात. मुलांच्या मेंदूतील गोष्टींमध्ये वाढ होते. जसे की मुळात असलेल्या न्यूराॅनमध्ये नवीन लिंक एस्टॅब्लिश होतात. मुलं जास्त इंटरकनेक्टेड होतात त्यांच्या प्रोसेसिंग पॉवर्समध्ये वाढ होते. जर आपण मुलांना वेळ आणि माहिती मिळवण्याची संधी दिली तर मुलं अधिक विचार करू शकतील. या वयात ज्याला heat of the moment म्हणता येईल त्यापद्धतीने भावनांच्या आहारी जाऊन मुलं निर्णय घेतात. याचं कारण काय तर त्यांच्या limbic system (a group of sub cortical structure)वर हे अवलंबून असतं. ही ब्रेनची इमोशनल सीट असते. ती जागा उतावळेपण, भावनाशीलता, आक्रमकता, इनस्टिंक्टिव्ह वर्तन यांच्याशी जोडलेली असते. एकीकडे मुलं भिंतीवर पंच मारतात. खूप जोरात ड्राइव्ह करतात. काही सांगायला गेलं, विचारायला गेलं की मला सगळं नीट समजतं, असं उत्तर देतात. दुसरीकडे मोठ्या माणसासारखे निर्णय घेणारी मुलं पाहून मुलांची ही ड्युएलिटी खूप कन्फ्यूजड करते.
 •  टीनएजर्सचे टॅन्ट्रम. थोडक्यात नौटंकी

जेव्हा सामाजिक जागी वागणं किंवा अमूर्त प्रश्नांचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येतं की, खरं म्हणजे या वयातील मुलं खूप इनक्रेडिबल कौशल्यांचा संच मिळवत असतात. पण अनुभव नसल्याने त्यांना हे वापरता येत नाही मग पालकांवरच ते प्रयोग करतात. कशी तर या वयातली बरीचशी मुलं सेल्फ एक्सप्रेशनचा प्रकार म्हणून आई-वडिलांशी भांडतात. आई-वडिलांचा मेंदू हा स्थिर आणि ॲडल्ट असल्याने पालकांनी मुलांना समजून घ्यायला हवं असतं. ह्यावेळी मुलांची एकाच वेळेस सामाजिक, भावनिक आणि आकलन पातळीवर तयार होणाऱ्या ॲबिलिटीशी जुळवून घेण्याची धडपड सुरू असते. मुलांना पालकांच्या सहकार्याची अपेक्षा असते.

 •  तीव्र स्वरूपातील भावना-(intensive emotions)

लिम्बिक सिस्टीममधील महत्त्वाचा बदल म्हणजे तारुण्य असतं. यात थोडं असं समजून घ्या की ब्रेनचा जो पार्ट केवळ हृदयाचे ठोके, शुगर लेव्हलला नियंत्रित करतो, आठवणी, भावनांचे फॉर्मेशन करतो. त्याचा हार्मोनल बदलामुळे विकास होत असतो. यामुळे मुलं प्रचंड राग, कमालीची भीती, अति आक्रमकता, अति एक्साईटमेंट, लैंगिक आकर्षण अशा तीव्र स्वरूपाच्या भावना व्यक्त करत असतात. या काळात मुलं पालक, शिक्षक यांना चुकीचं समजतात. मात्र ॲडोलेस्न्सच्या काही काळानंतर लिम्बिक सिस्टीमवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण येते.

 •  पीअर प्रेशर (peer pressure)

टीनएजर्स या वयात अमूर्त गोष्टींचा विचार करण्यात बेटर होतात. पण सोशल ॲनक्झायटीमध्ये मात्र वाढ होते. ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगमुळे स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहणं त्यांना शक्य होतं. या कौशल्याचा उपयोग ते इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील याचे चिंतन करण्यासाठी करतात. या मुलांच्या मेंदूसाठी सगळ्यात मोठं रिवॉर्ड काय असतं ठाऊक आहे, तर पीअर ग्रुपकडून ॲप्रुव्हल. म्हणूनच टीन्स अवतीभवती असताना ही मुलं सगळ्यात जास्त रिस्क घेतात. तसंच मित्रमैत्रिणींमुळे जुळवून घेण्याचं, ग्रुप प्लानिंगचं कौशल्यही ते आत्मसात करतात.

 •  मेजरिंग रिस्क (measuring risk)

मोठी माणसं जितका धोका पत्करतात तसाच टीनएजर्सनाही रिस्कचा हायर डोस हवा असतो. त्यांच्या मेंदूचा एक्सलेटर ह्या काळात खूप जोरात पळतो. ब्रेकचा नंबर नंतर लागतो. टीन्सच्या ब्रेनला रिवॉर्ड हवं असतं. म्हणून मुलं धोकादायक वागण्याला सहज बळी पडतात. ड्रग्ज ट्राय करणं, मारामारी, भांडण, धोकादायक पाण्यात उडी घेणं हे सारं यामुळेच ते करतात. मिडल ॲडोलेसन्स अर्थात १७ वर्षांनंतर मेंदू मुलांच्या इम्पलसिव्हवर कंट्रोल येतो. स्वतःची अशी हुकूमत, सत्ता याचा विचार ते करायला लागतात.

 •  टीनएजर्सचा मेंदू हा ताण आणि चिंता याबाबत सहज बळी पडतो. आजकालच्या पालकांना जाणवत असतं की, टीनएजमधली त्यांची मुलं ही खूप जास्त ताणतणावातून जात असतात. त्यांना वाटतं की त्यांचं बरं चाललंय. ते सगळं नीट हॅन्डल करताहेत. खरं म्हणजे मुलांच्या शरीर आणि मनावर हा तीव्र ताण असतो. ज्याला ते अन्डरएस्टिमेट करतात. ८३% मुलांना शाळेचा ताण, तर ६९% मुलांना काॅलेजचा स्ट्रेस, घरच्या आर्थिक परिस्थितीचा ताण ६५% मुलांना, तर ३५% मुलं ताणामुळे रात्री जागी असतात. टीनएजर्सचा ब्रेन हा ॲडल्टसच्या ब्रेनपेक्षा खूप जास्त प्रमाणात ॲन्क्शस असतो. कारण त्याच भागाच्या रॅपिड डेव्हलपमेंटमुळे या वयोगटातील मुलांची भावनिक एक्स्प्रेशन हॅन्डल केली जातात. म्हणूनच मुलं जरी म्हणत असली की मी स्ट्रेस हॅन्डल करू शकतो तरी टोकाच्या परिस्थितीत त्यांचा ब्रेन ताण आणि चिंता ट्रिगर करतो हे विसरू नका.
 •  या मुलांच्या मेंदूला खरंच खूप झोपेची गरज असते. पण प्रत्यक्षात हे टीनएजर्स रात्री खूप उशिरापर्यंत जागे राहतात. पण दिवसा भरपूर झोपतात. कारण शरीराचं विशिष्ट वेळेस झोपणे आणि जागं होणे याचे जे चक्र असते तेही बदलतं. त्यात स्क्रीन टाईम मुले त्यांचे झोपेचे तासही कमी होत आहेत. त्यातून मग चिंता आणि निराशा येते. अतिटोकाचे निर्णय, कटुता, मूडीनेस, अनक्लिअर डिसीजन्स घेतले जातात. खरं म्हणजे पुरेशी झोप मिळाली की त्याचा फायदा एकाग्रता, स्मरण, सूक्ष्म विचार, सृजनशीलतेला होतो.
 •  FOMO is REAL for teenagers

Forgot अर्थात त्यांना जर कोणी आमंत्रण द्यायला, बोलवायला विसरलं तर ते प्रचंड हर्ट होतात. विशेषतः मुली. ते खूप जास्त पेनफुल असतं त्यांच्यासाठी कारण त्यामागे असतं fear of missing out. आपल्याला पीअर ग्रुपकडून ॲक्सेप्ट करण्याला टन ऑफ इमपॉर्टन्स असतं. ग्रुपमध्ये ॲड करणं, त्या ग्रुपचा पार्ट असणं हे त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं.

 •  हे अटेन्शन सीकर आणि सेल्फ सेंटर्ड होतात ते या काळातच. तारुण्यात होणाऱ्या बदलांमुळे मेंदूवर खूप मोठा परिणाम होत असतो. Oxytocin सारखे रिसेप्टर्स, ज्यामुळे नातं निर्माण करणारे हार्मोन्स मुलांना खूप सेन्सेटिव्ह बनवतात. मुलांना आई-वडिलांविषयी कम्प्लेंट असल्या तरी त्यांचा सपोर्ट हवा असतो.

आपली मुलं टीनएजमध्ये खूप आश्चर्यचकित करणारी, काळजी करायला लावणारी, संताप आणणारी, निराशा, उद्वेग, फ्रस्ट्रेटेड वाटणारी वागत असली तरी त्यांच्या मेंदूतील केमिकल बदल समजून घेऊन थोडं सांभाळण्यातच शहाणपण आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -