गावाकडची ओढ...

  311

रवींद्र तांबे

बारावीची परीक्षा संपली असून दहावीची परीक्षा २६ मार्च रोजी संपेल. त्यामुळे कधी एकदा परीक्षा संपते आणि गावी जातो असे शहरात असलेल्या मुलांचे झाले आहे. बऱ्याच वेळा वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक पाहून चाकरमानी गावच्या गाडीचे बुकिंग करतात. तिकीट दर कमी आणि आरामदायी प्रवास यामुळे चाकरमानी लोक रेल्वेला जास्त पसंती देतात. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठी लालपरीने जाणे लोक टाळत असतात. याचा परिणाम म्हणून काही महामार्गांवरील लालपरी बंद करण्याची वेळ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर आली आहे. तीस वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टीत गावी जायचे झाले, तर दोन ते तीन दिवस बस डेपोत लाईन लावून तिकीट घेतले जात असे. आता तर घर बसल्या बुकिंग, फक्त सीट उपलब्ध असायला हवी. असे असले तरी सध्या रेल्वेने जास्त प्रमाणात लोक जाणे-येणे करीत असतात.


गावात शिक्षण घेतले तरी उपजीविकेचे साधन नसल्यामुळे नागरिक शहरात रोजीरोटीसाठी जात असतात. कामधंदा करून जे काही मिळेल त्यातून पहिली मनीऑर्डर गावी करतात. सध्या बँकिंग सेवा झाल्यामुळे मनीऑर्डरने पैसे पाठवत नाहीत. चाकरमानी सणासुदीच्या वेळी अधिक पैसे पाठवतात. शक्य असेल तर एकटे जाऊन येतात. मात्र, खरी ओढ असते ती म्हणजे उन्हाळी सुट्टीत मुलांना घेऊन गावी जाण्याची. तेव्हा कधी एकदा वार्षिक परीक्षा होते आणि गावी जातो असे प्रत्येक चाकरमान्यांच्या मुलांचे झाले आहे. त्यात गावी जाताना घरातील मंडळींना नवीन कपडे, शेजाऱ्याला टी शर्ट किंवा मागील वर्षी सांगितलेली एखादी वस्तू न विसरता घेऊन जाणे होते. त्यामुळे मुलांची परीक्षा जरी चालू असली तरी चाकरमान्यांची खरेदी सध्या जोरात सुरू आहे.


काही जण कामामध्ये सुट्टी मिळत नसेल, तर आपल्या मुलांची वार्षिक परीक्षा संपली की गावी सोडून पुन्हा आपल्या कामावर रुजू होतात. त्यानंतर मुलांना घेऊन येण्यासाठी चाकरमानी गावी जात असतात. तेव्हा गाव सोडून जे लोक शहरात उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत त्यांना आता आपल्या गावाची ओढ लागली आहे. काही लोक अधूनमधून गावी जात असतात. सुख-दुःखाच्या प्रसंगात चाकरमानी जरी आर्थिक मदत करतात. तसेच अधूनमधून गावी जाऊन त्यांच्याशी दोन शब्द बोलून यायला त्यांना आनंद वाटतो. जर त्यांना गावी जायला शक्य झाले नसेल, तर आपल्या मुलांना एक दिवस का असेना त्यांना बघून यायला पाठवितात. इतका जीव गावच्या लोकांवर चाकरमान्यांचा असतो. त्यामुळे गाव सोडून शहरात पोटापाण्यासाठी आलेल्या व्यक्तीची ओळख चाकरमानी अशी आहे. तेव्हा परीक्षा केव्हा संपते आणि आपले वडील गावी केव्हा एकदा घेऊन जातात असे बच्चे कंपनीला झाले आहे. यात दहावी आणि बारावीची मुले अधिक खूश असतात. कारण केव्हा एकदा परीक्षा संपते आणि गावी जातो असे त्यांना झाले आहे. वर्षभर अभ्यास आणि चारबाय चारच्या बंदिस्त खोलीत राहून वैतागून गेलेली मुले केव्हा एकदा गावच्या मोकळ्या सहवासात जातो असे त्यांना झाले आहे. त्यात गावची काका-काकी, त्यांची मुले व वाडीतील मुले वर्षानंतर भेटणार म्हणून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.


यात कोकण विभागातील मुलांची खूपच मजा असते. जगप्रसिद्ध हापूस आंबा खायला मिळतो. त्यानंतर बाहेरून काटेरी अंग असणाऱ्या फणसाच्या गऱ्यावर ताव मारता येतो. त्यात करवंदे, जांभूळ, काजूच्या रसदार बोंडा आणि मळ्यात केलेल्या भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा आवडीने खायला मिळतात. कोकणात चाकरमानी वर्षाने येणार म्हणून वर्षाचा कोंबडा ठेवला जातो. तेव्हा संध्याकाळच्या वेळेला कोंबडी-वडे केले जातात. सकाळच्या नाष्ट्याला घावणे आणि नारळाचा रस असल्याने मुले आवडीने खातात. त्याचप्रमाणे एकवेळ शेजारी सुद्धा जेवायला बोलावतात. गावच्या लाल मातीचा सुगंध आणि झाडांची सावली यामुळे मुलांना ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.


गावात लालपरीने प्रवास करता येतो. तसेच गावच्या बैलांनाही जवळून पाहायला मिळते. काकांच्या नकळत त्याला आपल्या पिशवीतील बिस्कीट खायला देणे ही वेगळीच मजा मुलांना मिळते. दुपारी काकांबरोबर आंघोळीला धरणावर जाणे, धरणातील अडविलेल्या पाण्यात उड्या मारणे, पाण्यात डुंबायची यात वेगळीच मजा असते. त्यानंतर पकडा पकडीचे खेळ पाण्यात खेळायला मिळतात, ते सुद्धा पोहून पकडायचे. हा आनंदच जीवनाला नवी दिशा देत असतो. काकीबरोबर सुकी लाकडे आणण्यासाठी रानात जाणे त्यात अचानक ससा किंवा रान डुकराचे दर्शन होणे हा क्षण जीवनात क्वचित वेळा येतो. त्यामुळे मुंबईला मुले आल्यानंतर काही दिवस करमत जरी नसले तरी नंतर गावातील आलेल्या अनुभवामुळे जोमाने अभ्यासाला लागतात. ते सुद्धा आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करू या जिद्दीने. त्यामुळे आता चाकरमान्यांप्रमाणे त्यांच्या मुलांनाही आपल्या गावची ओढ लागली आहे.

Comments
Add Comment

लिहित्या हातांना बळ देणाऱ्यांचा सन्मान!

डॉ. संजय कळमकर संशोधन, बालसाहित्य निर्मिती आणि अध्यापन या तीनही क्षेत्रांमध्ये लीलया संचार करताना इतरांना

‘एसटी’सुद्धा खासगीकरणाकडे?

मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले. गेल्या ४५ वर्षांत फक्त ८

झाडे लावा, झाडे वाचवा

रवींद्र तांबे मनुष्याला आपले जीवन जगण्यासाठी मूलभूत गरजा दिल्या आहेत. त्यामुळे जे काय मनुष्याचे अस्तित्व आहे

‘फिनटेक’ उद्योग आणि नव्या उद्योग संधी

उदय पिंगळे ‘फिनटेक’ हा शब्द यापूर्वी बऱ्याचदा वाचनात अथवा कानावर अनेकदा आला असेल. हा शब्द फायनान्स आणि

कोकणात ‘कोकण सुवास’चा दरवळ...!

माझे कोकण : संतोष वायंगणकर कोकणात सध्या भातशेतीचा हंगाम सुरू आहे. पूर्वी कोकणातील सर्वच गावातून भातशेती मोठ्या

हुंडाबळी एक लज्जास्पद विकृती...

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे मुलींकडून हुंडा का मागितला जातो? याची मानसशास्त्रीय कारणे लक्षात घेणे