
मुंबई : शिरुर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील () यांचा २६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश आता निश्चित झाला आहे. त्यामुळे शिरुरमध्ये पूर्वीचे प्रतिस्पर्धी आढळराव आणि कोल्हे यांच्यात थेट लढत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शिवाजीरावांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील आणि काही पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांची बैठक झाली. २६ मार्च रोजी संध्याकाळी फार मोठा पक्ष प्रवेशाचा सोहळा शिवाजीराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा करण्याचं सुनील तटकरे यांनी निश्चित केले आहे.
दरम्यान, शिवाजीराव पहिली निवडणूक ३० हजार मतांनी जिंकले. दुसरी १ लाख ८० हजारांनी तर तिसरी निवडणूक ३ लाख ३० हजारांनी जिंकले होते. त्यानंतर आता चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी अपेक्षा असल्याचे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले.
शिवाजीराव पाटील यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनातून राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. त्यावर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, "आपदधर्म म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला असेल तरीसुद्ध शिंदे, अजितदादा आणि फडणवीस यांनी मिळून याबाबत निर्णय घेतला असेल. शिवाजीराव पाटलांनी खूप चांगलं काम मतदारसंघात केलेलं आहे. त्यामुळं ते पुढच्या काळात निवडून येतील, पण त्यामुळं आजच्या घडीला गैरसमज पसरता कामा नये".