Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सविठाबाई : एक चिंतनशील चरित्रनाट्य

विठाबाई : एक चिंतनशील चरित्रनाट्य

भालचंद्र कुबल – पाचवा वेद

मुंबई विद्यापीठाच्या थिएटर ऑफ मास्टर आर्ट्स या नाट्यप्रशिक्षण विभागाला २० वर्षे पूर्ण होतील. ऑगस्ट २००३ मध्ये या स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाची सुरुवात पद्मश्री वामन केंद्रे यांच्या पुढाकाराने झाली. मुंबई विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम मनोरंजन व नाट्य क्षेत्रात करिअर करण्यास आलेल्या अनेक रंगकर्मींसाठी उत्साहवर्धक बाब होती आणि त्याला प्रतिसाददेखील तसाच लाभत गेला. अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना जगभरातील तसेच देशातील विविध भाषांमधली नाटके अभ्यासासाठी तथा पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जातात. त्याचाच एक भाग म्हणून दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना घेऊन नाट्यसृष्टीतील अनुभव प्राप्त दिग्दर्शकाच्या सहाय्याने दर वर्षी एका नाट्याकृतीचे सादरीकरण केले जाते. शक्यतो हिंदी-मराठी भाषांमधली ही नाट्यकृती मुंबई विद्यापीठातील नाट्यगृहात सादर होते.

बाहेरील प्रेक्षकवर्ग या नाट्याकृतींस प्रचंड प्रतिसाद देत असतो. अॅकॅडमी आॅफ थिएटर आर्ट्सने आजपर्यंत साठ पेक्षा अधिक नाटकांची निर्मिती केली असून, त्यात प्रामुख्याने वामन केंद्रे दिग्दर्शित ‘मध्यम व्यायोग’, ‘वेधपश्य’, ‘मोहनदास’, जयदेव हट्टंगडी दिग्दर्शित पोस्टर, विजय केंकरे दिग्दर्शित ‘जनशत्रू’व ‘विरासत’, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘मुखवटे’, ‘हृदय’, मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘खेळ’,‘अजिंठा’ व ‘अंधायुग’ आणि मंगेश बनसोड दिग्दर्शित ‘लोटन’, ‘मी लाडाची मैना तुमची’, ‘निशाणी डावा आंगठा’ अशी एकाहून एक सरस नाटके सादर केली आहेत. या निर्मिती प्रक्रियेत द्वितीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना भाग घेणे अनिवार्य असते. याच अभ्यासक्रमांतर्गत यंदाही प्रा. डाॅ. मंगेश बनसोड यांनी संजय जीवने लिखित ‘विठाबाई’ हे लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनपट मांडणारे अनोखे चरित्रनाट्य विद्यापीठातील मुक्ताकाश रंगमंचावर सादर होत आहे.

विठाबाई हे तमाशापटावर कोरले गेलेले महत्त्वाचे नाव. वयाच्या १३व्या वयापासून विठाबाईंनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यास सुरुवात केली. भाऊ खुडे नारायणगावकरांचे पूर्ण कुटुंब तमाशा, व्यवसाय म्हणून करत असे. गावोगावी जाऊन सादर केल्या जाणाऱ्या या लोककलेचे बाळकडू त्यांना जन्मतःच मिळाल्याने पुढे पायात चाळ बांधून लावणीवर हुकूमत गाजवणे सोपे गेले. बोलका व देखणा चेहरा, गळ्यात गाणे आणि अंगात लय असलेली ही नृत्यांगना पुढे लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखली जाऊ लागली. प्रेक्षकांनी बहाल केलेली ही पदवी विठाबाईंनी सार्थ ठरवली.

लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या आठव्या वर्षापासून त्या शाहीर आळतेकर आणि मामा वरेरकर यांच्या कलापथकात काम करीत. कलापथकात काम करता करता त्यांनी महाराष्ट्रभर आणि दिल्लीत अनेक कार्यक्रम केले. तमाशा फडात काम करत असताना त्यांनी जेवढे ऐश्वर्य भोगले, तेवढेच दुःख आयुष्याच्या उत्तरार्धात भोगले. १९४८ साली म्हणजेच वयाच्या १३व्या वर्षी त्या आपल्या वडिलांच्या फडात सामील झाल्या. केशर आणि मनोरमा या त्यांच्या दोन्ही बहिणी गाणे गात आणि विठाबाई नृत्य करीत. पुढे ‘विठा भाऊ मांग नारायणगावकर’ हा स्वतःच्या वडिलांचे नाव अधोरेखित करणारा फड त्यांनी स्थापन केला. १९५० ते १९८० हा त्यांच्या फडाचा सुवर्णकाळ होता. विठाबाईंनी छोटा जवान, कलगीतुरा, उमज पडेल, तर सर्वसाक्षी आदी चित्रपटात आपले नृत्य सामर्थ्यही दाखवले. भारत-चीन युद्धात भारतीय जवानांसाठी कार्यक्रम करून देशसेवेचे महत्कार्य देखील त्यांच्या हातून घडले; परंतु वाढत्या वयाचा परिणाम म्हणा किंवा अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या फडाची लोकप्रियता कमी होत गेली व १९९० साली विठाबाईंना आपला फड बंद करावा लागला व त्यांनी निवृत्ती स्विकारली.

हा त्यांच्या जीवनाचा आलेख दाखवणारा नाट्यपट डाॅ. मंगेश बनसोड या कुशल दिग्दर्शकाने अत्यंत प्रभावीपणे ‘विठाबाई’ या नाटकातून मांडला आहे. वृद्धपकाळी विठाबाई आपले पूर्वायुष्य प्रेक्षकांपुढे मांडतात, त्यातील महत्त्वाचे प्रसंग आपल्यासमोर सादर होतात. नाटकाची सुरुवातसुद्धा गणाने होऊन त्यात बतावणीची पेरणी बनसोडानी अत्यंत कल्पकतेने गुंफली आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाची बातमी कळताच अस्वस्थ झालेली विठा आणि त्यावरील तिच्या प्रतिक्रियेचा प्रसंग, तर हेलावून टाकणारा आहे. फ्लॅशबॅकमध्ये जाऊन प्रसंग सादर करण्याची दिग्दर्शकीय प्रसंग व पात्र रचनेचा फाॅर्म मराठी रंगभूमीसाठी नवीन नाही. मात्र भूमिकांची खांदेपालट करताना त्यातील नाट्यसूत्र कुठेही विचलित झालेले नाही, हे बनसोड सरांच्या दिग्दर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल. विठाबाईंच्या गाजलेल्या लावण्या सादर करून मनोरंजनाचा बाजदेखील नाटकाची जमेची बाजू म्हणता येईल. या पूर्वी बनसोड सरांची ‘मी लाडाची मैना तुमची’ व ‘निशाणी डावा आंगठा’ ही दोन नाटके पाहावयास मिळाली होती; परंतु ‘विठाबाई’ हे नाटक या दोन्ही नाटकांपेक्षा सरसच म्हणावे लागेल.

नाटकाला आशुतोष वाघमारे या तरुण दिग्दर्शकाचे संगीत आणि छाया खुटेगावकर यांनी विद्यार्थ्यांकडून करवून घेतलेली नृत्ये टाळी मिळवून जातात आणि सर्वात दखल घ्यावी, असे विख्यात नेपथ्यकार जयंत देशमुख यानी साकारलेले नेपथ्य. जयंत देशमुख आज हिंदी चित्रपटसृष्टीत नेपथ्यक्षेत्रात नावाजलेले एक नाव, या नाटकाशी जोडले गेलेय ही बाब मराठी नाट्यसृष्टीसाठी अभिमानास्पद आहे.

तरुण विठा-प्राची भोगले, म्हातारी विठा-अंकिता सावंत व ऋतुजा डिगे, लहान विठा-अर्चना शर्मा, प्रार्थना अशोक व उत्कर्षा साने यांचा नामोल्लेख करणेही तितकेच जरुरीचे आहे. उलेश खंदारे यांची रंगभूषा आणि अमृता तोडरमल यांची वेशभूषा नाटकाचे सौंदर्य वाढवतात. काळाच्या पडद्याआड आणि रसिकांच्या विस्मृतीत गेलेली अशी अनेक व्यक्तिमत्त्वे मराठी रंगभूमीने नाट्यसृष्टीला दिली. त्यांचे पुनःस्मरण वेळोवेळी करणे आणि नव्या पिढीला त्यांचे योगदान कळावे यासाठी ‘विठाबाई’ सारख्या चरित्रनाट्याची अत्यंत गरज आहे. मुंबई विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमाचे संचालक योगेश सोमण यांनी अशा नाटकाला दिलेले उत्तेजन हे निश्चितच अभिनंदनीय आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -