Thursday, July 18, 2024
Homeक्रीडाIPL 2024चेन्नईची रॉयल सुरुवात

चेन्नईची रॉयल सुरुवात

६ विकेट राखून बंगळूरुवर सरशी; ऋतुराजच्या नेतृत्वाखाली १७व्या हंगामात विजयी सलामी

चेन्नई (वृत्तसंस्था) : मुस्तफिझुर रहेमानची प्रभावी गोलंदाजी आणि त्यानंतर साघिंक फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला पराभवाचे पाणी पाजत आयपीएलच्या १७ व्या हंगामाची सुरुवात रॉयल केली. नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईचा पहिलावहिला विजय ठरला. ६ विकेट राखून चेन्नईने या सामन्यात बाजी मारली.

युवा फलंदाज रचिन रविंद्रने फटकेबाजी करत प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या धावांना सुरुवातीला चांगलीच गती दिली. यश दयालने कर्णधार ऋतुराज गायकवाडला ग्रीन करवी झेलबाद करत बंगळूरुच्या गोटात आनंद पसरवला. त्यानंतर सेट झालेला रचिन आणि अनुभवी अजिंक्य रहाणे या जोडीने चेन्नईचे धाव फलक हलते ठेवले. संघाची धावसंख्या ७१ असताना रचिनने अजिंक्यची साथ सोडली. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या साथीने अवघ्या १५ चेंडूंत ३७ धावा तुडवल्या.

त्यानंतर डॅरेल मिचेलच्या साथीने चेन्नईची धावसंख्या पुढे नेणाऱ्या अजिंक्यला फार काळ मैदानात थांबता आले नाही. १९ चेंडूंत २७ धावांची भर घालत अजिंक्य माघारी परतला. त्यानंतर मिचेल २२ धावा करून तंबूत परतला. या दोन्ही विकेट ग्रीननेच बंगळूरुला मिळवून दिल्या. संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आपसूकच शिवम दुबे आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा यांच्या खांद्यावर आली. त्यांनी ती समर्थपणे पेलली. या दोघांनीही नाबाद फलंदाजी करत चेन्नईला विजय मिळवून दिला. दुबेने नाबाद ३४ आणि जडेजाने नाबाद २५ धावा केल्या. १८.४ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात चेन्नईने विजयी लक्ष्य गाठले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवा आणि संघाचा चौथा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला. कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि स्टार फलंदाज विराट कोहली या सलामीवीरांनी बरी सुरुवात केली. कोहलीने संयम बाळगला असला तरी डु प्लेसीसने फटकेबाजी केली. विस्फोटक फलंदाज करत असलेल्या डु प्लेसीसला गळाला अटकवत मुस्तफिझुर रहेमानने चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. ३५ धावांच्या खेळीत डु प्लेसीसने ८ चौकार लगावले. त्याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर रजत पाटीदारला भोपळाही फोडू न देता रहेमानने चेन्नईला दुसरे यश मिळवून दिले. पुढच्याच षटकात विस्फोटक फलंदाज ग्लेन मक्सवेल दीपक चहरचा शिकार झाला. त्यामुळे चांगल्या सुरुवातीनंतरही ४२ धावांवर ३ फलंदाज बाद अशा संकटात बंगळूरुचा संघ सापडला.

नवा फलंदाज कॅमेरॉन ग्रीनने काही काळ संयम दाखवला. दुसरीकडे धावांचा वेग वाढविण्याच्या प्रयत्नात विराट आपली विकेट गमावून बसला. विराटने २१ धावा जोडल्या होत्या. येथे मुस्तफिझुर रहेमान चेन्नईसाठी धावून आला. ग्रीनलाही फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने १८ धावा जमवल्या. त्यानंतर अनुज रावत आणि अनुभवी दिनेश कार्तिक यांनी अपेक्षित कामगिरी करत अडचणीत सापडलेल्या बंगळूरुला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. या डावात हीच जोडी बंगळूरुसाठी सर्वात यशस्वी ठरली. अनुज रावतने अप्रतिम फटकेबाजी केली. डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो धावबाद झाला आणि अवघ्या २ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. दिनेश कार्तिकने नाबाद ३८ धावा केल्या. चेन्नईच्या मुस्तफिझुर रहेमानने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ मोहरे टिपले. निर्धारीत २० षटकांत बंगळूरुने ६ विकेट गमावून १७३ धावा फटकवल्या.

‘विराट’ विक्रम

पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. तो भारताकडून टी २० क्रिकेटमध्ये १२००० धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहेत. तर जागतिक स्तरावरील तो सहावा फलंदाज ठरला. विराट कोहलीने अजून एक मोठा माईल स्टोन गाठला. त्याने चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध १००० आयपीएल धावा पूर्ण केल्या. यापूर्वी चेन्नईविरूद्ध १००० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम हा शिखर धवनच्या नावावर होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -