
आता अंतराळ मोहिमा होणार किफायतशीर
बंगळुरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोतील (ISRO) शास्त्रज्ञ आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर उंचच उंच भरारी घेत आहेत. अत्यंत कमी खर्चात त्यांनी 'चांद्रयान-३' मोहिम (Chandrayaan-3 Mission) यशस्वी करुन दाखवली. त्यानंतर आता पुन्हा एक मोठं यश इस्रोने आपल्या नावावर केलं आहे. इस्रोच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन टेक्नॉलॉजीची (Reusable Launch Vehicle Technology) चाचणी यशस्वी झाली आहे. या वाहनाचे नाव पुष्पक (Pushpak) असे आहे. यामुळे पुढील अंतराळ मोहिमा कमी खर्चात करण्यास मदत होणार आहे.
इस्रोचे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक आज सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले. RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने, पुन्हा वापरण्यायोग्य लॉन्च व्हेईकल (RLV) टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.
रियूजेबल वाहनाच्या पहिल्या दोन चाचण्याही यशस्वी
इस्रोने यापूर्वीही दोन वेळा पुन्हा वापरता येण्याजोगे (रियूजेबल) प्रक्षेपण वाहन यशस्वीरित्या लँड केलं आहे. गेल्या वर्षी, इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या टेस्टिंग दरम्यान, RLV हे हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरमधून सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. चाचणी दरम्यान, RLV धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरले. RLV ने ब्रेक पॅराशूट, लँडिंग गियर ब्रेक आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टमच्या मदतीने यशस्वी लँडिंग केले. पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या यशस्वी लँडिंगने नेव्हिगेशन, कंट्रोल सिस्टम, लँडिंग गियर आणि डिलेरेशन सिस्टम यांसारख्या इस्रोने विकसित केलेल्या टेक्नॉलॉजीच्या यशाचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.
'हे' आहे खास वैशिष्ट्य
- पुष्पक हे पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण करणारे विमान आहे. पंख असलेल्या विमानासारखे दिसणारे हे विमान आहे. ६.५ मीटर लांबीच्या या विमानाचे वजन १.७५ टन आहे.
- आज या विमानाच्या रोबोटिक लँडिंग क्षमतेची चाचणी घेण्यात आली.
- अंतराळात प्रवेश किफायतशीर करण्यासाठी हे खूप प्रभावी पाऊल आहे.
- हे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन आहे, ज्याचा वरचा भाग सर्वात महागड्या उपकरणांनी सुसज्ज आहे.
- याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे अंतराळातील उपग्रहाला नंतर इंधन भरण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी परत आणण्यातही मदत करेल.
RLV-LEX-02 Experiment: 🇮🇳ISRO nails it again!🎯
Pushpak (RLV-TD), the winged vehicle, landed autonomously with precision on the runway after being released from an off-nominal position. 🚁@IAF_MCC pic.twitter.com/IHNoSOUdRx — ISRO (@isro) March 22, 2024
अंतराळ मोहिमा स्वस्त होतील
या संदर्भात इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, भारतात पुष्पक प्रक्षेपण वाहन बनवणे हे भारताच्या अंतराळ मोहिमेला किफायतशीर बनवण्यासाठी एक मोठं आणि आव्हानात्मक पाऊल होतं. मात्र, पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन बनून, हे वाहन मोहिमेच्या यशानंतर पृथ्वीवर परत सुरक्षितपणे उतरण्यास सक्षम असेल तसेच देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल असणार आहे असंही ते म्हणाले.