मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरूवारी दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या लोकसभेसाठी ५७ नावे ठरवण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार, नांदेड, अमरावती, पुणे, सोलापूर, लातूर आणि कोल्हापूर या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
पुणे येथून काँग्रेसने आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले आहे. नंदुरबार येथून गोवल के पडवी यांना रिंगणात उतरवले आहे तर नांदेड येथून वसंतराव चव्हाण, अमरावती येथून बलवंत वानखेडे, लातूर येथून शिवाजीराव काळगे, तर कोल्हापूर येथून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर येथून प्रणिती शिंदे यांना निवडणुकीचे तिकीट देण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच बिगुल वाजले. सात टप्प्यात देशात ही निवडणूक पार पडत आहे. संपूर्ण देशात १९ एप्रिलपासून मतदानाला सुरूवात होईल. सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर ४ जूनला मतमोजणी होणार आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदान होत आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली होती. मात्र त्यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नव्हता.