मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल. कणखर आणि धाडसी गृहमंत्र्यांनी मोदींच्या नेतृत्वात कलम ३७० हटवले. जे स्वप्नवत वाटत होते. शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला यांना आवडत होते. म्हणून शेपटीवर जास्त प्रेम आहे. वेळेप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीत लोटांगण घालणारे आणि मेहुण्याला नोटीस आली म्हणून घाम फुटणारे हे कोण आहेत? खुर्चीसाठी, सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रिपदासाठी कोणी शेपूट घातली हे जनतेला माहिती असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताना उबाठांवर घणाघाती टीका केली.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
तसेच राज ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे. यापुढेही चर्चा होईल. योग्य वेळी योग्य तो निर्णय होईल. समविचारी पक्षांची युती आणि सरकारच्या कामावर विश्वास ठेवून अनेकजण आमच्यासोबत येतायेत. लोकसभा निवडणुकीसाठी आजची बैठक महत्त्वाची होती. राज्यात ४८ जागा आहेत. त्यात ४५ हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांना ताकद द्यायची आहे त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
दरम्यान, महाविकास आघाडीत सगळा तिढा आहे. कुणीही कुणासोबत नाही. इंडिया आघाडी बिखुरली आहे. उद्धव ठाकरेंना घरी बसण्याची सवय आहे. त्यामुळे जनता त्यांना घरीच बसवेल, असा टोलाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.