काय आहे कारण?
नवी दिल्ली : बँकांचे व्यवहार (Transactions of banks) करण्याकरता भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) एक मोठा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आणि रविवार असताना देखील बँका सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सरकारला सर्व व्यवहारांचा हिशेब ठेवण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आरबीआयने (RBI) हा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबतचे परिपत्रक जारी केलं आहे. यामध्ये रविवारी बँका सुरु ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ३१ मार्चला आर्थिक वर्ष (Financial Year) संपणार आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांना भरपूर काम असणार आहे. त्यामुळे ३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत बँकांचे कामकाज चालणार आहे. मात्र, यादिवशी रात्री उशीरापर्यंत बँकांचे सार्वजनिक व्यवहार होणार नाहीत.
१ एप्रिलला बँका राहणार बंद
३१ मार्चला रात्री उशीरापर्यंत कर्मचारी बँकांमध्ये काम करणार आहेत. कारण, संपूर्ण आर्थिक व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय बँकांचं कामकाज पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे १ एप्रिलच्या दिवशी सोमवारी सर्व बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय देखील आरबीआयने घेतला आहे. याबाबतची माहिती आरबीआयच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.