- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
प्रत्येक जीवाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याची काळजी आणि परिपूर्ति ही परमेश्वरच करत असतो. त्याकरिता परमेश्वराची तीन रूपे कार्यरत आहेत. उत्पत्ती (जीवाला जन्मास घालण्याचे कार्य) भगवान ब्रह्मदेव, स्थिती (जीवाचे पालन, भरण व पोषण) ह्याचे कार्य भगवान विष्णू आणि लय (जीवन संपूर्ण झाल्यावर त्या जीवाचा लय) हे कार्य भगवान शिव सांभाळतात.
ह्या सोबतच जीवनात सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांचा समतोल साधणे, तसेच षड-रिपुंच्या प्रभावापासून साधकास दूर ठेवणे तसेच धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त व्हावे याकरिता आवश्यक मार्गदर्शन करण्याचे अत्यंत मौलिक कार्य सद्गुरू करत असतात. तद्वतच शिष्यावर होणारे आघात आणि संकटांचे परिमार्जन देखील सद्गुरू नित्य करीत असतात. पण हे सर्व सुचारूपणे घडून येण्याकरिता सद्गुरुभक्ती, सद्गुरूंवर श्रद्धा आणि निष्ठा ही असावी लागेल.
संत कवी दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामधील अध्याय १६ मधील ओवी क्रमांक १७ मध्ये पुढीलप्रमाणे गुरू कसा असावा ह्याचे अत्यंत कमी शब्दात वर्णन केले आहे.
गुरू असावा महाज्ञानी । चातुर्य-शास्त्र-चिंतामणी।
गुरू असावा परमगुणी । भक्तिपथातें दावितां ॥१७॥
ही ओवी जरी भागाबाईच्या तोंडी दाखविली असली, तरी दासगणू महाराजांनी सद्गुरूंची लक्षणे साधक भक्तांना सोपी करून सांगितली आहेत. ह्याच अध्यायात ‘मोक्ष गुरू’ याबद्दल देखील उल्लेख आला आहे.
सद्गुरू हे जीवनात सदैव मार्गदर्शन तर करतातच, पण त्याही पलीकडे जाऊन मोक्षप्राप्तीचा सोपान उघडून देऊ शकतात. इथे थोडक्यात असे बघावे लागेल की, मोक्षप्राप्ती हाच गुरू करण्यामागील उद्देश आहे काय? किंवा असावा काय?, ह्याबद्दल थोडे विवेचन करूया.
इथे एक प्रश्न उपस्थित होतो की, खरंच मोक्ष एवढा सोपा आहे काय?…
प्रश्न अतिशय गहन आहे. मोक्षप्राप्ती होऊ शकेलही, पण हे साधण्याकरिता साधकाला अनेक पायऱ्या चढून जाव्या लागत असाव्या बहुतेक.
समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सांंगितल्याप्रमाणे नवविधा भक्तीचा अंगीकार करून हळूहळू एकेक पायरी चढण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरू आहेतच सांभाळून मार्गदर्शन करण्याकरिता. हे जर शक्य होत नसेल, तर सिद्ध साधक संतांनी ह्या प्रश्नाचे उत्तर सामान्य जनांकरिता अतिशय सोपे करून सांगितले आहे.
संत तुकाराम महाराज म्हणतात :
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।२।।
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ।। २।।
न लगे मुक्ती आणि संपदा।
संत संग देई सदा।।
तुका म्हणे गर्भवासी।
सुखे घालावे आम्हासी।। २।।
ह्या अभंगात तुकाराम महाराज देवाला आळवणी करतात की हे पांडुरंगा, परमेश्वरा, जर तू मला काही देणारच असशील तर हेच दान दे की, आयुष्यात क्षणभर देखील मला तुझा विसर पडू नये (नित्य भगवद् स्मरण). सदैव तुझे गुण आवडीने गाण्याची स्फूर्ती मला मिळावी. धन, दौलत, संपत्ती वा मुक्ती ह्यांपैकी मला काहीच नको. मात्र तुझ्या भक्तीत, नामस्मरणात दंग असणाऱ्या संतांचा संग मला नेहमी मिळावा आणि हे सर्व जर तू मला नेहमी (अक्षय्य) देणार असशील तर वारंवार मला जन्माला घाल. पण कसे?
तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी।
ह्याचा अर्थ तुकाराम महाराजांनी परमेश्वराला सुखाची मागणी केलेली आहे काय? तर ह्याचे उत्तर नाही असेच आहे. कारण तुकाराम महाराजांना अगदी सुरुवातीपासूनच पांडुरंगाची आत्यंतिक ओढ लागलेली होती आणि पांडुरंगाचे दर्शन, नामस्मरण (सेवा) हेच तर त्यांचे सर्व सुख होते.
तुका म्हणे माझे
हेचि सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने।
तुकाराम महाराज ह्यांच्या थोरवीचे वर्णन करणे एवढे सोपे नाही. सदेह वैकुंठ गमन करणाऱ्या महान श्रेष्ठ संताबद्दल म्या पामराने काय भाष्य करावे बरे?
परमेश्वरप्राप्तीचा नामस्मरण हाच अत्यंत सोपा मार्ग सर्व संतांनी सांगितला आहे. संत श्री प्रल्हाद महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि अनेक सिद्ध संतांनी नामस्मरण हाच परमेश्वरप्राप्तीचा साधा, सोपा आणि सरळ मार्ग असल्याचे सांगितले आहे. म्हणून जेवढे शक्य असेल तेवढे नाम घेणे हेच आपले ध्येय ठरवून घ्यावे आणि हेच परमेश्वराच्या सान्निध राहण्याचे सर्वोत्तम साधन आहे.
(क्रमश:)