आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट
मुंबई : ‘डॉ. स्वप्ना पाटकर यांनी ४ मार्च २०२४ रोजी कोर्टात एक अॅप्लिकेशन केलं होतं. ज्याच्यात अत्यंत गंभीर बाबींचा उल्लेख केला असून त्यांचा थेट संबंध खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी आहे. हे अॅप्लिकेशन देण्याचं कारण म्हणजे संजय राऊत यांनी गायब केलेला पाटकर प्रकरणातील साक्षीदार’, असा गौप्यस्फोट भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. आज पत्रकार परिषदेत ते अॅप्लिकेशन सादर करत नितेश राणे यांनी हा मोठा खुलासा केला आहे.
स्वप्ना पाटकर यांनी अॅप्लिकेशमध्ये उल्लेख केलेला व्यंकटेश मरिअप्पन उप्पर हा स्टार सिक्युरिटी स्टाफमधील एकजण आहे. त्याच्याविरोधात वकोला पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला डॉ. स्वप्ना पाटकर यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. जेव्हा स्वप्ना पाटकर यांनी याविरोधात तक्रार केली तेव्हा त्याला पकडण्यात आलं आणि त्याच्या बॅगमध्ये स्वप्ना यांच्याविषयीचे फोटोज, चॅट्स आढळून आले.
व्यंकटेशची केस ही अशा पॉइंटला आली होती की त्याची क्रॉस एक्झामिनेशन होणार होती. मात्र, गेले चार ते पाच दिवस तो कोर्टामध्ये हजर राहत नाही आहे. स्वप्ना यांनी अॅप्लिकेशनमध्ये सरळ लिहिलं आहे की संजय राऊत यांनी व्यंकटेशला गायब केलं आहे. त्यामुळे स्वप्ना यांनी अॅप्लिकेशनमध्ये स्पष्ट मागणी केली आहे की, त्याच्याविरोधात नॉन बॅलेबल वॉरंट काढा. तसेच स्वप्ना यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की, यालाही संजय राऊतने मारुन टाकला असेल. व्यंकटेशचाही मनसुख हिरेन, दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत होण्याची शक्यता आहे. म्हणून व्यंकटेशच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकारने घ्यावी, असं अॅप्लिकेशनमध्ये म्हटलं आहे, असं नितेश राणे म्हणाले.
…तर उद्याची पत्रकार परिषद व्यंकटेशला बाजूला बसवून करा!
संजय राजाराम राऊत कायदा आणि सुव्यवस्था, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं गृहखातं, मटका, जुगार राज्यामध्ये कसा सुरु आहे, महिलांवर कसा अत्याचार होतो आहे, गुंडांचं कसं राज्य आहे, याविषयी बोलतो. पण या सगळ्यावरुन सगळ्यात मोठा गुंड मैत्री बंगल्यात राहतो हे स्पष्ट झालं आहे. या संजय राऊतने आता उत्तर द्यावं की स्वप्ना पाटकरच्या अॅप्लिकेशन प्रमाणे व्यंकटेश उप्परचं नेमकं काय झालं? तो कुठे आहे? जिवंत आहे की मेला आहे? या सगळ्याची माहिती संजय राऊतने द्यावी, असं नितेश राणे म्हणाले. तसंच हे सगळं खोटं असेल तर उद्याची पत्रकार परिषद संजय राऊतने व्यंकटेशला बाजूला बसवून करावी म्हणजे तो जिवंत असल्याची खात्री मिळेल, असं आव्हान नितेश राणे यांनी दिलं आहे.