राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून राज्यात मनसे (MNS) महायुतीत (Mahayuti) सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीदरबारी जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर मनसेला लोकसभेकरता महायुतीत सामील केलं जाणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. यासंबंधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मनसेला सादर केलेला दोन जागांचा प्रस्ताव अमित शाह यांनी फेटाळून लावला आहे. केवळ एकच जागा देणं शक्य होईल, असं भाजपकडून मनसेसाठी स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवाय त्या एका जागेवर लढण्याकरता महायुतीतील एखाद्या पक्षाचं चिन्ह वापरावं लागेल, मनसेचं रेल्वे इंजिन वापरता येणार नाही, अशी अट ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला होता. राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहांनी मात्र फेटाळला आहे. केवळ एक जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितलं. तसेच, राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं? या बद्दलही विचारणा केली. त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असंही अमित शाह राज ठाकरेंना म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती नको
विधानसभा देखील एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप तेव्हा ठरवू असंही अमित शाह म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभा निवडणुकांसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते अमित शाहांनी राज ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं काय झालं?
राज ठाकरे दिल्लीत अमित शहांना भेटले त्यापूर्वी त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली होती. आता नेमकं कसं पुढे जायचं याबाबत फडणवीसांसोबतच्या बैठकीत जवळपास निश्चित झालं होतं. हे सर्व ठरल्यानंतरच राज ठाकरे दिल्लीला गेले. तिथे अमित शहांसोबत युतीबाबत आणि आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली. सुरुवातीला मनसेनं तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील बैठकीतच राज ठाकरेंना तीन जागांसाठी स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर अमित शहांसोबतच्या बैठकीतही राज ठाकरेंचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. तर एक जागा देणं शक्य असल्याचं अमित शहांनी सांगितलं.