Saturday, July 5, 2025

मुंबई इंडियन्स टीम अलिबागच्या रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल

मुंबई इंडियन्स टीम अलिबागच्या रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल

अलिबाग : आयपीएलचा रणसंग्राम २२ मार्चपासून सुरू होत असून, या स्पर्धेत आयपीएलमधील महत्वपूर्ण संघ मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. मुंबई इंडियन्स संघाला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबाग येथील रेडीसन रिसॉर्टमध्ये मंगळवारी दाखल झाला आहे. दोन दिवस हा संघ रिसॉर्टमध्ये राहणार असल्याने तेथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


गेटवे येथे बसने मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी (दि.१९) सकाळी दाखल झाला. त्यानंतर सर्व ताफा जलवाहतुकीने पीएनपी कॅटमरानने मांडवा येथे दाखल झाला. त्यानंतर बसने हा संघ अलिबाग जवळील गोंधळपाडा येथील रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल झाला आहे.


यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. एक दिवस मुंबई इंडियन्स संघ अलिबागमध्ये रिसॉर्टला राहणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि. २०) हा संघ झिराड येथील एका खासगी फार्म हाऊसवर राहण्यास जाणार आहे.


या टीममध्ये हार्दिक पांड्या, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, ल्युक वूड आदींसह प्रशिक्षक असा ५२ जणांचा समावेश आहे.


मुंबई इंडियन्स टीम रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल होताच रिसॉर्टमधील पर्यटकांची त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपड सुरू होती, तर पीयुष चावला याच्यासोबत बच्चे कंपनीने फोटो काढले.

Comments
Add Comment