Wednesday, September 17, 2025

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे दिल्लीत अमित शहांशी मनोमिलन

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे दिल्लीत अमित शहांशी मनोमिलन

महायुतीत मनसेच्या सहभागाची चर्चा, मुंबईत घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली : महाराष्ट्र निर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दुपारी साडेबारानंतर अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. राज ठाकरे यांनी बैठकीबाबत काहीही सांगण्यास नकार दिला असला तरी, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मनसे’ सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातील घोषणा मुंबईमध्ये केली जाऊ शकते. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत आणखी एक गडी सहभागी होण्याची चिन्हं आहेत.

२०१९ मध्ये राज ठाकरे यांच्या मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती. मात्र, त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रभर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपविरोधात जोरदार प्रचार केला होता. राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हीडिओ’ हे विधान कमालीचे चर्चेत होते. मात्र, पाच वर्षांनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली असून राज ठाकरे यांनीही राजकीय भूमिका बदलली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला मदत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी जे. पी. नड्डा, विनोद तावडे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा उपस्थित होते. अर्धा तास चाललेल्या बैठकीनंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे रवाना झाले.

मुंबईमध्ये राज ठाकरे यांची प्रदेश भाजपच्या नेत्यांनी भेट घेतली होती. त्यानंतर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास राज ठाकरे त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह दिल्लीत येऊन दाखल झाले. राज ठाकरे प्रमुख्याने महाराष्ट्र व मराठी माणसाचे राजकारण करत असल्याने ते फार क्वचित दिल्लीत येऊ राजकीय भेटीगाठी घेतात. यावेळी ते भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून दिल्लीत आले एवढेच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेळ देईपर्यंत दिल्लीत मुक्काम करून राहिले. सोमवारी रात्री पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य करणारे राज ठाकरे यांनी ‘या म्हणून सांगितले म्हणून आलो’, असे पत्रकारांना सांगितले होते. ठाकरे सोमवारी रात्रीच शहांची भेट घेणार होते. मात्र, शहांच्या भरगच्च पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे दोन्ही नेत्यांची भेट मंगळवारी दुपारी साडेबारानंतर झाली. राज ठाकरे यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हेही होते. शहा व ठाकरे यांची भेट अत्यंत सकारात्मक झाल्याचे सांगितले. या भेटीनंतर राज ठाकरे थेट मुंबईला निघून गेले.

महाविकासातील प्रामुख्याने शिवसेना- उद्धव ठाकरे गटाच्या मतांच्या विभागणीसाठी मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी काही भागांमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचा लाभ मिळू शकतो, असे गणित भाजपने मांडले आहे. मुंबईमध्ये शिवसेना-ठाकरे गटाच्या मराठी मतांची विभागणी करण्याचा भाजपचा हेतू असल्याचे मानले जात आहे. त्यासाठी भाजपने राज ठाकरे यांची मनधरणी केल्याचे सांगितले जाते.

Comments
Add Comment