महायुतीत सामील होणार का? स्पष्टच सांगितलं…
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीत (Mahayuti) सामील होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच राज ठाकरेंच्या भाजपच्या मुख्य नेत्यांशी होत असलेल्या सततच्या भेटीगाठींमुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात होणारी ही एक मोठी उलथापालथ ठरु शकते. दरम्यान, काल राज ठाकरे अचानक चार्टर्ड विमानाने दिल्लीसाठी रवाना झाल्याने महायुतीला नवा भिडू मिळणार का याची चर्चा रंगली आहे.
दिल्लीमध्ये भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते दिल्लीत पोहोचले होते. त्यातच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेही दिल्लीत दाखल झाल्याने लवकरच भाजप-मनसे युतीचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. राज ठाकरेंनी दिल्ली दरबारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र नेमकी काय चर्चा करण्यात आली हे अद्याप कळू शकलेलं नाही.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या दिल्लीवारीवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला या असा निरोप होता. मला काहीच माहित नाही. मी फक्त भेटायला आलो आहे’, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे बैठकीनंतर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. मनसे महायुतीत सामील होणार का, यावर मात्र अद्याप कोणत्याही नेत्याकडून अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेलं नाही.