
अध्यक्षपदाची निवडणूक व्लादिमीर पुतिन यांनी जिंकली
मॉस्को : रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पुतिन (Putin) हे पाचव्यांदा विराजमान होणार आहेत. व्लादिमीर पुतिन यांनी रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ८८ टक्के मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे सलग पाचव्यांना पुतिन हे रशियाची सूत्रं हाती घेणार आहेत.
व्लादिमीर पुतिन यांना ८७.९७ टक्के मतांनी विजय मिळवला. १९९९ पासून रशियात पुतिनराज सुरू आहे. बोरिस येल्तसिन यांनी १९९९ मध्ये त्यांच्याकडे सत्तेची सूत्र सोपवली होती. तेव्हापासून पुतिन एकही निवडणूक हरलेले नाहीत.
शुक्रवारी सुरु झालेलं मतदान तीन दिवस चाललं. त्यानंतर लागलेल्या निकालात पुतिन यांनी ८८ टक्के मतं मिळवत विजय मिळवला. पुतिन यांचे कट्टर विरोधक ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला. त्यांचे इतर टीकाकार तुरुंगात आहेत. ७१ वर्षीय पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली, ज्यांना क्रेमलिनचे जवळचे मानले जाते. तिघांनीही त्यांच्या २४ वर्षांच्या राजवटीवर किंवा दोन वर्षांपूर्वी युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाई सुरू करण्याच्या निर्णयावर टीका करणं टाळलं होतं.
दरम्यान, पुतिन यांच्या विरोधकांनी मतदान केंद्रांवर निदर्शनं केली होती. जी निवडणूक झाली ती निष्पक्षपाती आणि स्वतंत्र नव्हती असं अमेरिकेने म्हटलं आहे. मात्र आता पुतिन यांच्या विजयानंतर त्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ हा निश्चित झाला आहे. या विजयामुळे पुतिन यांनी दीर्घकाळ सत्तेवर राहण्याचा जोसेफ स्टॅलिन यांचा रेकॉर्ड मोडला आहे. रशियाच्या इतिहासात मागच्या दोनशे वर्षात दीर्घकाळासाठी राष्ट्राध्यक्ष राहण्याचा रेकॉर्ड हा पुतिन यांच्या नावे झाला आहे.
रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाईन मतदान केलं. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. व्लादिमीर पुतिन यांनी पहिलं मतदान केलं, त्यानंतर मतदानाला सुरुवात झाली. पुतिन यांच्याविरोधात शुक्रवार आणि शनिवारी अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली आणि मतपत्रिका खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.