Thursday, September 18, 2025

वंचितच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून

वंचितच्या निर्णयावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने महाविकास आघाडीकडून जागावाटपावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीकडून येणारे प्रस्ताव आणि अटी व शर्थींमुळे हैराण झालेल्या महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) अखेर वंचित बहुजन आघाडीशिवाय (Vanchit Bahujan Aghadi) जागावाटपाचा फॉर्म्युला (MVA) जवळपास निश्चित केला आहे. त्यामुळे वंचितकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास लवकरच महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित होऊन जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने जागावाटपावर जवळपास शिकामोर्तब केले आहे. त्यानुसार आता महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट राज्यात २२ जागा लढवणार असून शरद पवार गट १० जागांवर, तर काँग्रेस १६ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

त्यामुळे ठाकरे गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडली जाऊ शकते. महाविकास आघाडी राजू शेट्टी यांना बाहेरून पाठिंबा देईल, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे, सांगली जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीकडे तब्बल १७ जागांचा प्रस्ताव आल्याने तो अशक्यप्राय असल्याने तो अमान्य करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाशिवाय अन्य कोणताही नविन प्रस्ताव महाविकास आघाडी देणार नसून वंचितने निर्णय घेतल्यानंतर जागा कोणत्या द्यायच्या याचा पुढील विचार केला जाईल, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमत केले आहे.

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने अजूनही चर्चेचे दरवाजे खुले ठेवले असले, तरी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका पाहता महाविकास आघाडीत ते खरंच येत आहेत की न येण्यासाठी कारणांची मालिका उपस्थित करत आहेत? अशी सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने निर्णय घेऊन आम्हाला कळवावे, त्यानंतरच आम्ही सकारात्मक चर्चा करू, अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाने घेतली आहे. त्यामुळे आता वंचित काय निर्णय घेणार यावर महाविकास आघाडीचे जागावाटप अवलंबून असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा