Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजलोका सांगे ब्रह्मज्ञान...

लोका सांगे ब्रह्मज्ञान…

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

“असा कसा रं… सोडून गेलास माझ्या राजा?” गावात फिरताना एका साधूचे पाय हा आक्रोश ऐकून क्षणभर थांबले. आवाज जवळच्या झोपडीतून येत होता. काहीतरी अशुभ घडलं होतं. झोपडीबाहेर माणसांची गर्दी जमली होती. नक्कीच कुणीतरी…

साधूचे पाय त्या झोपडीच्या दिशेनं वळले. वाकून त्यांनी आत प्रवेश केला. आत अत्यंत हृदयद्रावक दृश्य होतं. आठ-दहा वर्षं वयाच्या एका लहान मुलाच्या प्रेताला कवटाळून एक स्त्री विलाप करीत होती. ती बहुधा त्या मुलाची आई असावी. साधूमहाराजांनी तिच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला आणि विचारलं, “काय झालं माई?”

त्या स्त्रीचा बांध पुन्हा फुटला. “काय सांगू महाराज, माजा संज्या… काल रातच्याला निजला आनी सकाळच्याला उठलाच नायी बगा. काय करू रं माज्या देवा…”

गांव तसं आडवळणालाच होतं. भोवती दाट झाडी होती. त्या झाडीतला एखादा साप वगैरे चावून त्या लहानग्याचा बळी गेला असावा. झोपडीबाहेर पुरुष मंडळी पुढची तयारी करून खोळंबली होती. आत मात्र त्या मुलाची आई त्या मुलाच्या कलेवराला घट्ट कवटाळून बसली होती. जमलेल्या इतर बायाबापड्या तिला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या, पण ती माऊली तर पुत्रवियोगानं जणू वेडी झाली होती. ती म्हणत होती, “त्याच्याबरोबर मलासुद्धा जाळा. मी आता एकटी जगून काय करणार?”

साधू महाराजांना चौकशीअंती समजलं की, ती बाई विधवा होती. पाच वर्षांपूर्वीच तिचा नवरा असाच अचानक झाडावरून पडून मेला होता. नवऱ्याच्या मृत्यूचं दुःख तिनं मुलाकडे पाहून पचवलं होतं आणि आता हा एकुलता एक मुलागा तो देखील…

साधू महाराज पुढं झाले आणि धीर गंभीर स्वरात म्हणाले, “माई थांब, रडू नकोस. जन्माला आलेला प्रत्येक जीवाला मृत्यू हा ठरलेलाच असतो. कुणी आज तर कुणी उद्या, पण प्रत्येकाला जावंच लागतं. तुझ्या मुलाचं आयुष्य संपलं. तो गेला. त्याला कुणीही रोखू शकत नाही. साधू महाराज गंभीर स्वरात सांगत होते. ती बाई रडणं थांबवून ऐकू लागली. महाराज पुढं म्हणाले, “माणूस मरतो तेव्हा मरतं ते त्याचं शरीर. तुझा मुलगा केवळ शरीरानं मेला. पण त्याचा आत्मा… आत्मा तर अमर आहे. त्याला कोण मारणार?”

महाराजांनी मृत्यूची अपरिहार्यता आणि आत्म्याचं अविनाशित्व त्या माऊलीला समजावून सांगितलं. तिच्या दुःखाचा आवेग ओसरला. मोठ्या जड अंतःकरणानं तिनं मुलाचं कलेवर दूर सारलं आणि महाराजांच्या चरणावर दंडवत घातलं. बाहेर तयारी करून खोळंबलेल्या लोकांचा मार्ग मोकळा झाला.

ती स्त्री त्या साधू महाराजांची शिष्या बनली. गावाबाहेर नदीकिनारी त्यांचा आश्रम होता. वेळ मिळेल तेव्हा ती तिथं जाऊन बसे. महाराजांची रसाळ प्रवचनं देहभान विसरायला लावत. आश्रमातील छोटी-मोठी कामं देखील ती आनंदाने करायची. अशीच एके दिवशी ती सकाळी आश्रमात गेली असता स्वामीजी नदीकिनारी जोरजोरात छाती पिटून आक्रोश करीत होते. आजूबाजूला स्वामींचे शिष्य आणि काही गावकरी मंडळी जमली होती.

“काय झालं महाराज?” तिनं विचारलं.

कुणीतरी सांगितलं, सकाळी नदीवर पाणी प्यायला गेलेल्या स्वामीजींच्या बकरीला मगरीनं ओढून नेली होती आणि त्या मेलेल्या बकरीसाठी स्वामीजी जोरजोरात छाती पिटून शोक करीत होते. ती बाई धीर करून स्वामीजींजवळ गेली आणि विचारलं, “हे काय स्वामीजी, गेल्याच महिन्यांत माझा मुलगा गेला, त्यावेळी आपण मला “आत्मा अविनाशी आहे, जन्माला आलेला प्रत्येक जीव कधी ना कधी तरी मरणार…” वगैरे तत्त्वज्ञान सांगून धीर दिला होता आणि आता आपण स्वतः…?”

स्वामीजी एकदम उसळून म्हणाले, “मागच्या महिन्यात मेलेला मुलगा तुझा होता. आज मेलेली बकरी माझी आहे…”

***

किती तथ्य आहे नाही या गोष्टीत? जगात सर्वात सोपी गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे दुसऱ्याला “तू असा वाग.” म्हणून उपदेश करणं.

“मी तुमच्या जागी असतो तर…” असं फुशारकीनं बोलणारी भली भली माणसं त्यांच्यावर तशा प्रकारचा प्रसंग ओढावला असताना मात्र आपण काय बोललो होतो ते विसरून नेमकं विरुद्ध वागताना आढळतात.

लोकांना “ब्रह्मज्ञान शिकवणारे” हे असले “कोरडे पाषाण” आपण अनेकदा पाहातो. राजकारणात तर अगदी मुबलक प्रमाणात. मोठी-मोठी भाषणं करण्यात पटाईत असणारी ही नेते मंडळी प्रत्यक्ष कृतीच्या वेळी मात्र डळमळतात. उक्ती आणि कृती यात एकतानता असणारा, आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणारा, कोणत्याही प्रसंगात मअटलफ नेता राजकारणात अभावानंच आढळतो आणि म्हणूनच राजकारणी मंडळीवरचा जनसामान्यांचा विश्वास दिवसेंदिवस उडत चाललाय.

भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्याची घोषणा देणारे नेते स्वतः कोणत्या तरी घोटाळ्यात गुंतलेले दिसतात. “दारू सोडा.” असा उपदेश करणारा माणूस स्वतः मात्र दारूत सोडा मिसळून पिताना आढळतो. राजकारणांतच कशाला… अगदी अध्यात्माच्या प्रांतातही अशा प्रकारची माणसं अलीकडे दिसतात.

भगवी शाल पांघरून दूरदर्शनवर भगवदगीतेच्या श्लोकांवर विवेचन करणारा माणूस रेकॉर्डिंग स्टुडियोच्या बाहेर पडतांच सिगारेट शिलगावताना दिसतो. वास्तविक आध्यात्माच्या क्षेत्रात “आधी केले, मग सांगितले” असं असायला हवं, पण त्याच्या नेमकं विपरित म्हणजे “नाहीची केले, फक्त सांगितले.” असा विचित्र प्रकार पाहायला मिळतो.

स्वातंत्र्यानंतर पन्नास वर्षांच्या कालखंडात राजकारणी लोकांनी घातलेला धुडगूस पाहिला आणि सामान्य माणसांचा खादीवरचा विश्वासच उडाला. आता आध्यात्मिक जगातली ही सोफेस्टिकेटड बुवाबाजी पाहून भगव्या रंगावरील विश्वासालाही तडा जाईल की काय? अशी भीती वाटते.

‘उक्ती’ आणि ‘कृती’ यांत एकतानता असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच समर्थ रामदासस्वामी म्हणतात, “क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.” यावरून एक कथा आठवली ती थोडक्यात सांगतो.

ब्रह्मचैतन्य श्री गोंदावलेकर महाराजांकडे एक स्त्री तिच्या पाच-सहा वर्षांच्या मुलाला घेऊन आली होती. गोंदावलेकर महाराजांना ती म्हणाली, “महाराज, या मुलाला जंताचा त्रास आहे. डॉक्टरांनी गोड खाऊ नको असं सांगितलंय. पण हा कुणाचंच ऐकतच नाही. आम्ही नाही दिलं तर हट्ट करून बसतो. आता तुम्ही सांगितलं तर तुमचं नक्की ऐकेल असा विश्वास वाटला म्हणून तुमच्याजवळ आलो. आपणच याला आता समजावून सांगा.”

महाराजांनी त्या स्त्रीकडे पाहिलं नी म्हणाले, “माई, एक आठवड्यानं या नंतर सांगतो. ती स्त्री आठवड्यानंतर मुलाला घेऊन पुन्हा आली. महाराजांनी त्या मुलाला जवळ घेतलं त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला, त्याचा चेहरा कुरवाळला आणि त्याच्या डोळ्यांत डेळे मिसळून म्हणाले, “बाळ फार गोड खाऊ नये. प्रकृती बिघडते. आजपासून गोड खाऊ नकोस हं.”

त्या मुलानं होकारार्थी मान डोलावली. एक आठवड्यानंतर ती स्त्री त्या मुलाला घेऊन पुन्हा आली आणि म्हणाली, “महाराज, आपल्या शब्दांनी जादूच केली. इथून गेल्यापासून यानं गोड खायचं अजिबात सोडलं. त्याचा जंताचा त्रासदेखील एकदम बंद झाला. पण महाराज…”

“पण काय?”

“पण महाराज पहिल्यांदा आम्ही आलो असता त्याच वेळी तुम्ही त्याला गोड खाऊ नकोस असं कां नाही सांगितलंत? एक आठवड्यानंतर का बोलावलंत?”

महाराज हसले नि म्हणाले, “कारण त्यावेळी मी देखील खूप गोड खायचो. तुम्ही पहिल्यांदा आल्या दिवसापासून मी स्वतः गोड खाणं बंद केलं आणि त्यानंतर आठ दिवसांनी या बाळाला गोड खाऊ नकोस असं सांगण्याचा अधिकार मला प्राप्त झाला.” स्वतः आचरल्याशिवाय बोललं, तर ते शब्द पोकळ ठरतात.

“गेल्या महिन्यात मेलेला मुलगा तुझा होता आणि आज मेलेली बकरी माझी आहे.” असं म्हणणाऱ्या तथाकथित साधूंकडे पाहून समर्थांचे शब्द आठवतात,

फुकाचे मुखी बोलता काय वेचे।
दिसंदीस अभ्यंतरी गर्व साचे।।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।
विचारे तुझा तूच शोधूनी पाहे…।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -