Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजतदेव लग्नम्...

तदेव लग्नम्…

नक्षत्रांचे देणे: डॉ. विजया वाड

विठ्ठलराव आणि सरोजिनीबाई मध्यभागी विवाहवेदीपाशी बसले होते. “आई, तुम्ही आजी-आजोबांचं पुन्हा का लग्न लावताय पण?” शुभा आश्चर्यानं विचारीत होती. ह्यांना पहिलं लग्न विसरायला झालं की काय?
“अगं तेवढीच मजा!” आई म्हणाली.
“ही काय मजाय?”

“अगं शुभा, लग्नाला पन्नास वर्षं होईपर्यंत पती आणि पत्नी दोघं जिवंत असणं हे अहोभाग्याचं लक्षण आहे. तुझे आजी-आजोबा अजूनही तब्येत सांभाळून आहेत. त्यांना उठता-बसता येतंय. केवढी आनंदाची गोष्ट आहे ही. तुझी आजी सत्तर नि आजोबा पंचाहत्तर वर्षांचे झाले, पण बघ कसे तेजस्वी दिसताहेत विवाहवेदीपाशी. दक्षिणेत अशी पद्धत आहे पन्नास वर्षांनंतर परत लग्न लावायची. मी तुझ्या बाबांना म्हटलं, आपण का उचलू नये ही चांगली पद्धत? तिकडचा इडली, डोसा, उतप्पा नाही का आपण आपला म्हटला?”

शुभाला आईचं म्हणणं अगदी मनापासून पटलं. खरंच की! पंजाबचे छोले नि भटूरे आपण आवडीने खातो. दक्षिणेचे सारे पदार्थ आपलेच आहेत की काय असं वाटतं… आणि हो, आपल्यात घालतात तसं विवाहितेचं मंगळसूत्र कॅथरिना या आपल्या ख्रिश्चन मैत्रिणीची आईही घालते! आवडतं म्हणून…

शुभा आता दहावीत गेली होती. तिला वाटलं, आपण उगीचच लाजत होतो. आजी-आजोबांचं लग्न आहे हे सांगायला. खरंच! मैत्रिणींना बोलावलं असतं, तर त्यांनी किती मौज अनुभवली असती. शुभाची विद्या आत्या खास न्यूझिलंडहून सपरिवार या सोहळ्याला उपस्थित होती. विद्या आत्या, शुभंकरकाका नि पिनाकिन् हा आत्ते भाऊ.
“तदेव लग्नम् सुदिनम् तदेव
ताराबलम् चंद्रबलम् तदेव…”

भटजींचं सुरू झालं नि अंतरपाट दूर झाला. विठ्ठल आजोबांनी आजीच्याकडे बघितलं. “अगो घालतेस ना माळ?”
“आधी तुम्ही घाला. घाला बघू.”
आजी ठसक्यात म्हणाली.
“अगो पण मी नवरा आहे.
बायकोने आधी हार घालायचा.”
“पन्नास वर्षं तुमचं ऐकत आले. विठ्ठलवाक्यम् प्रमाणम्! आता या नव्या खेळात तुम्ही माझं ऐकायचं.” सरोजिनी बाईच्या हट्टापुढे विठ्ठलरावांनी अखेर मान तुकवली. त्यांनी नाक फुगवत पत्नीच्या गळ्यात हार घालायला हात पुढे केले इतक्यात शुभाच्या बाबांनी आणि आतोबांनी आजीला उंच उचलून धरले.

“हा काय चावटपणाय?”
विठ्ठलरावांचं नाक आणखीच फुगलं.
“आता उरलेलं आयुष्य ही अशीच वरचढ राहणार. आमची आई!”
“अरे अवी, शुभू… उतरवा मला खाली. त्यांच्याच्यानं उडी नाही मारवणार आता या वयात. नुसत्या तोंडाच्या उड्या.” आईनं असं म्हटलं तेव्हा दोघांनी तिला खाली उतरवली.

आजोबांनी आजीला माळ घातली नि आजीनं आजोबांना. टाळ्यांच्या गजरात शुभा नि पिनाकिन् मनापासून सामील झाले.
नाव घेण्याचा हृद्य सोहळा पार पडला. आजीनं उखाणा घेतला. आजोबा मात्र नुसतंच सरोजिनी म्हणाले.
“पन्नास वर्षांची साथसोबत हे विठ्ठलराव
पुढे मी मागे,
तरीही विणले संसाराचे सुंदर दुरंगी धागे…
असे वाटते नव्याने पुन्हा एकदा जगावे
मी पुढे नि विठ्ठलराव मागे माझ्या असावे…”

शुभा आजीच्या उखाण्यावर बेहद्द खूश होती. आपली आजी- आजोबांचं सगळं मुकाट ऐकते… पण आज कशी बोल्ड अँड ब्युटिफुल झालीय असंसुद्धा वाटलं तिला.
नंतरच्या पंक्तीत आजीला आजोबांनी घास भरवला होता. सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. पिनाकिन् शुभाला म्हणाला,
“आपले आजोबा मला नुसता चिडका बिब्बा वाटायचे… पण बरेच रोमँटिक आहेत गं शुभी!”

जेवणानंतर एखादी हृद्य आठवण सांगायचा लकडा सगळ्यांनी लावला तेव्हा आजी म्हणाली, “मी या घरी आले ती खूप स्वप्नं मनात घेऊन. पण नशीब बघा! मी सासरघरी पाऊल ठेवलं आणि ह्यांची नोकरी गेली. चालत्या गाड्याला खीळ पडली. माझ्या सासऱ्यांनी मला बोल लावला. सासूबाई मला पांढऱ्या पायाची असं म्हणाल्या. अपशकुनी म्हणून घरादारानं माझ्या कपाळी टिळा लावला, तेव्हा शुभीचे आजोबा एकदम उसळले. मला माझं सामान भरायला सांगितलं. आपलेही दोन कपडे माझ्या बॅगेत टाकले. सगळ्या कुटुंबीयांसमोर उभे राह्यले नि म्हणाले, “चाललो मी. हिला घेऊन. आता नोकरी लागेल तेव्हाच तोंड दाखवीन. आम्ही गणपती मंदिरात राहू. चुरमुरे खाऊ. वाटेल ते करू. पण हिला कुणी अपशकुनी आणि पांढऱ्या पायाची म्हटलेलं मी खपवून घेणार नाही. अरे! नवी कोरी बायको माझी… नवी स्वप्नं घेऊन घरात आली आणि ती पुरवायला मीच असमर्थ ठरलो.

अवलक्षणी असेन तर मीच! ही नव्हे. चल गं.” असे हे माझा हात धरून सर्वांसमक्ष बाहेर पडले. महिनाभर आम्ही पूर्णपात्रे ह्या त्यांच्या मित्राकडे राहिलो. यांना नोकरी लागली. घरी बोलवायला त्यांची आई आली. पण खरंच सांगते पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी माझी जी बूज राखली ना त्याचा आदर करीत मी आमच्या संसाराच्या सीसॉत त्यांचा सीसॉ वर राहील अशी काळजी घेतली. मी आपली खाली. का? ते आज सांगितलं. मी शुभीच्या आजोबांची आजन्म ऋणी आहे. जन्मोजन्मी हाच चिडका बिब्बा मला हवा. माझा आत्मसन्मान जपणारा.” आजी आजोबांकडे बघून गोड हसली.
“आपले आजोबा गुड आहेत गं.” पिनाकिन् शुभीला म्हणाला.

“अरे पिनाकिन्… आजीनं तिचं पन्नास वर्षांपूर्वीचं पुस्तक उघडलं ते फार छान झालं. एरवी आपले
आजोबा इतके कलरफुल आहेत हे कसं कळलं असतं?” शुभी म्हणाली.
आजोबा आजीकडे बघून गोड गोड हसत होते. तो एक दुर्मीळ आनंदक्षण होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -