Monday, December 2, 2024
Homeसाप्ताहिककोलाजरायगड किल्ल्यावरील श्री जगदीश्वर मंदिर

रायगड किल्ल्यावरील श्री जगदीश्वर मंदिर

कोकणी बाणा: सतीश पाटणकर

किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या राजदरबारात उभे राहिल्यानंतर ईशान्यकडे नजर वळवली की ठळकपणे उठून दिसते ते दिमाखात उभे असलेले रायगडावरील श्री जगदीश्वराचे मंदिर. रायगडावरील स्थापत्यशास्त्राच्या अप्रतिम नमुना म्हणजे श्री जगदीश्वराचे मंदिर. रायगडची अनेक स्थित्यंतरे पाहत हे मंदिर आजही दिमाखात उभे आहे. हिरोजी इंदुलकरांची एक उत्कृष्ट निर्मिती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेले हे देवालय.

रायगडावर जाणारे हजारो शिवप्रेमी या देवालयी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाहीत. जगदीश्वराचे मंदिर आयताकृती असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिशांना तीन दरवाजे आहेत, तर जगदीश्वराच्या परकोटाला दोन दरवाजे आहेत. यापैकी रायगडच्या नगारखान्याची प्रतिकृती असलेला मुख्य दरवाजा पूर्वेकडे आहे. पूर्वेचा दरवाजा अत्यंत सुबक असून त्यावर कोरीव नक्षीकाम दिसून येते. मंदिरासमोर एक सुंदर दगडी नक्षीकाम केलेला नंदी आहे. मंदिराचा परिसर १४ हजार चौरस फूट इतका आहे. छत्रपती शिवरायांची निस्सिम भक्ती असल्याने मंदिराची स्थापत्य कला लक्षवेधी आहे. शिवमंदिराच्या गाभाऱ्यात जाताना पायरीवर असलेले यक्षमुख जगदीश्वराच्या पूर्व दरवाजावर स्पष्टपणे दिसून येते. अशी दोन यक्षमुखे दरवाजाच्या वरील बाजूस कोरली आहेत. दारातून आत प्रवेश केला की फरसबंदी परकोटात बांधलेल्या ओव्या नजरेस पडतात. मंदिराचा गाभारा प्रशस्त आणि भव्य असा आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसारच मंदिराची उभारणी करण्यात आली होती. त्यामुळे शिवाजी महाराज या मंदिराच्या दर्शनासाठी दररोज येत असल्याची माहिती देखील दस्तऐवजांमध्ये मिळते. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेच्या दरवाजा पायरीवर एक शिलालेख कोरलेला आहे. ‘सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर’ असा या शिलालेखाचा अर्थ आहे, तर दुसरा शिलालेख पूर्वेला दरवाजा बाहेर दक्षिण भिंतीवर संस्कृत भाषेत आहे. आकाशामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य तळपत आहे, तोपर्यंत जगदीश्वराचा प्रासाद असाच वैभवाने तळपत राहो, अशा आशयाचा हा शिलालेख आहे. आजही या आशयाप्रमाणेच जगदीश्वराचे मंदिर मोठ्या दिमाखांमध्ये रायगड किल्ल्यावर आजही उभे आहे.

बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. दगडी नक्षीकाम केलेला मंदिरासमोरील नंदी मात्र अनेक वर्षे भग्नस्थितीत होता. गुरुवारी कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत नंदीला तांब्याचे मुख बसवण्यात आले. यावेळी शिवप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा होता. मंदिरात प्रवेश केला की, भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -