Saturday, July 6, 2024

Space : खगोल

  • कथा : प्रा. देवबा पाटील

‘ख’ म्हणजे आकाश व गोल म्हणजे वस्तू. आकाशात ज्या काही वस्तू आहेत, त्या सर्वांना खगोल म्हणतात. हे विश्व मूळ हायड्रोजन या वायूपासून बनलेले आहे. या विश्वाच्या विस्ताराचा खरा अंदाज करणे अतिशय कठीण आहे. पण या एवढ्या अफाट विश्वातील सारे तारे, त्यांचे ग्रह, उपग्रह हे सगळे काही बेशिस्त आणि अस्ताव्यस्त नसून अगदी शिस्तीने व ठरावीक नियमांनी बांधलेले आहेत.

आनंदरावांची मुलगी यशश्री ही आठव्या वर्गात शिकत होती. आजी-आजोबांच्या तर गळ्यातील ती ताईतच बनली होती. त्यांच्यासोबत खेळताना ती त्यांना सतत काही ना काही प्रश्न विचारून त्यांना भंडावून सोडायची. तेही लाडक्या नातीचे त्यांच्यापरीने समाधान करायचे. ती अतिशय जिज्ञासू होती. त्यामुळे आनंदरावांनी तिला बालपणापासूनच तशी ज्ञानवर्धक, बौद्धिक खेळणी आणली. आजी व आजोबा तिला वारंवार एकेक खेळणे आळी-पाळीने दाखवायचे. त्याच्या गुणवैशिष्ट्यांसह समजावून सांगायचे. त्या खेळण्यांसोबत ती खेळायचीही, रमायची. आजी-आजोबांच्या सांगण्यामुळे तिला खेळण्यासोबत त्यांची माहितीही व्हायची. बरे तिच्या बुद्धीची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती व स्मरणशक्ती इतकी उत्तम होती की, ती कोणतीही गोष्ट पटकन समजून घ्यायची, लक्षातही ठेवायची व नंतर केव्हाही जशीच्या तशी सांगायचीसुद्धा.

असेच एका दिवशी रात्री गच्चीवर ते दोघे बापलेक बसले असताना तिने आपल्या बाबांना आपले प्रश्न विचारणे सुरू केले.

“बाबा रात्री आकाशात आपणास एक पांढराशुभ्र ताऱ्यांचा पट्टा दिसतो तो काय असतो?” यशश्रीने विचारले.

“रात्रीला आकाशात या असंख्य ताऱ्यांचा जो एक धूसर लांबलचक पांढरा चमचमणारा पट्टा दिसतो त्यालाच आकाशगंगा म्हणतात. आकाशगंगा हा ताऱ्यांचा असा समूह आहे ज्यातील तारे गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांशी बांधून ठेवलेले आहेत नि हा संपूर्ण समूह आकाशगंगेच्याच दूरच्या केंद्रबिंदूभोवती फिरत आहे.”

“आकाशगंगेला दुग्धगंगा का म्हणतात बाबा?” यशश्रीने प्रश्न केला.

बाबा म्हणाले, “या अगणित तेज:पूंज ताऱ्यांच्या समूहाच्या तेजस्वी प्रकाशाने आकाशगंगा दुधासारखी पांढऱ्याशुभ्र रंगाची दिसते म्हणून तिला दुग्धगंगा असेही म्हणतात.”

“बाबा, जसे आपण आपल्या ताऱ्याला सूर्य म्हणतो, तसे आपल्या आकाशगंगेला काही नाव आहे का?” यशश्रीने पुन्हा प्रश्न केला.

“हो. आपल्या आकाशगंगेचे नाव मंदाकिनी आहे. आपल्या शेजारच्या आकाशगंगेचे नाव देवयानी आहे.”

“या आकाशाचे आपल्या पृथ्वीपासून किती अंतर आहे बाबा?” यशश्रीने विचारले.

“पृथ्वीच्या सभोवती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे १००० कि.मी. पर्यंत वातावरण म्हणजे हवा असते. त्यापेक्षा जास्त उंच अंतरावर हवाच नसते. फक्त निर्वात पोकळी असते. या अंतरापर्यंतच्या भागाला म्हणजेच पोकळीला आकाश म्हणतात, तर त्यावरील म्हणजे त्याही पलीकडच्या निर्वात पोकळीला अवकाश म्हणतात. या अवकाशाची सुरुवात कोठून होते व शेवट कोठे होतो हे मुळीच कळत नाही. तशी आकाशाची मर्यादा ही पृथ्वीपासून १००० कि.मी.पर्यंत मानतात.” बाबांनी सविस्तर सांगितले.

“आकाशगंगांमध्ये ताऱ्यांपेक्षा आणखी काय काय आहे बाबा? यशश्रीने प्रश्न केला. बाबा म्हणाले, “प्रत्येक आकाशगंगेत धुमकेतू, तेजोमेघ, कृष्णविवरे, धूळ व वायूचे मेघ आहेत; परंतु त्यांत त्यापेक्षा अगणित अशा तेजस्वी ताऱ्यांच्या असंख्य तारकामाला आहेत.”

“खगोल कशाला म्हणतात बाबा?” यशश्रीने प्रश्न केला.

“ख म्हणजे आकाश व गोल म्हणजे वस्तू. आकाशात ज्या काही वस्तू आहेत त्या सर्वांना खगोल म्हणतात.” बाबांनी उत्तर दिले.

“बाबा, जशी आपल्या पृथ्वीवर सजीवांची वस्ती आहे तशी या विश्वात इतर कोठे तरी आहे काहो? आणि आपण जे विश्व विश्व म्हणतो ते विश्व म्हणजे नक्की आहे तरी काय बाबा?” तिने विचारले.

“बाळा, आकाशातील असंख्य आकाशगंगांचा, प्रत्येक आकाशगंगेतील अब्जावधी ताऱ्यांचा, त्या ताऱ्यांच्या अगणित ग्रह-उपग्रहांचा, त्यांच्यामधील रिकाम्या अफाट पोकळीचा, त्या पोकळीतील असंख्य लघुग्रहांचा, धुमकेतूंचा, आकाशगंगेतील अनेक कृष्णविवरांचा, कित्येक तेजोमेघांचा, बऱ्याचशा कृष्णमेघांचा मिळून बनलेला जो अफाट पसारा आहे तो म्हणजे ब्रम्हांड किंवा विश्व. हे विश्व मूळ हायड्रोजन या वायूपासून बनलेले आहे. या विश्वाच्या विस्ताराचा खरा अंदाज करणे अतिशय कठीण आहे. पण या एवढ्या अफाट विश्वातील सारे तारे, त्यांचे ग्रह, उपग्रह हे सगळे काही बेशिस्त आणि अस्ताव्यस्त नसून अगदी शिस्तीने व ठरावीक नियमांनी बांधलेले आहेत.”

“बेटा आता मला आपल्या गावच्या सरपंचांनी ग्रामपंचायतमध्ये एक सभा आयोजित केली आहे. त्यासाठी मला ग्रामपंचायतमध्ये जायचे आहे. तरी आपण या विषयावर उद्या चर्चा करू या. चालेल ना?” आनंदरावांनी तिला विचारले.

“हो बाबा.” यशश्रीने दुजोरा दिला व त्या दिवशीची त्यांची चर्चा संपली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -