Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजReading culture : वाचन संस्कृती

Reading culture : वाचन संस्कृती

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

असे अनेक समूह आहेत जे साहित्य-संस्कृती-कला आपापल्या पद्धतीने जोपासत आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. खरी वाचन संस्कृती टिकून आहे ती या वाचणाऱ्यांमुळेच! असे कितीतरी वाचक मनापासून फक्त वाचतात आणि जे वाचले आहे, त्यावर मनन-चिंतन करतात. इतकेच नव्हे, तर आपण जे काही वाचले आहे ते चारचौघांपर्यंत पोहोचवायचाही प्रयत्न करतात.

प्रत्येक लेखकाला वाटते की, आपल्यामुळे वाचन संस्कृती टिकून आहे. ती थोड्याफार प्रमाणात असेलही कदाचित पण खरी वाचन संस्कृती टिकून आहे ती वाचणाऱ्यांमुळेच! असे कितीतरी वाचक देशविदेशांत विविध विषयांवरील पुस्तके वाचत असतात. मनापासून फक्त वाचतात आणि जे वाचले आहे, त्यावर मनन-चिंतन करतात. इतकेच नव्हे, तर आपण जे काही वाचले आहे ते चारचौघांपर्यंत पोहोचवायचाही प्रयत्न करतात. असे वाचक साहित्यक्षेत्रात कदाचित वावरत नसतील, पण त्यांचे अखंड वाचन चालू असते.

अलीकडेच ‘फन ग्रुप’ नावाच्या एका समूहाला भेटायची संधी मिळाली. या समूहात मराठी भाषा बोलणारी समवयस्क आणि सर्वसाधारणपणे मुंबईच्या एकाच भागात राहणारी माणसे. महिन्यातून एकदा भेटणारी. या महिन्याभरात त्यांनी कोणत्या तरी एका पुस्तकाचे परीक्षण करायचे आणि त्यावर सर्वांसमोर भाष्य करायचे ही या समूहाची एकमेव भेटण्यामागची प्रेरणा. त्यासाठी काही पुस्तके विकत घेऊन, काही ग्रंथालयातून पुस्तक आणून ही मंडळी वाचतात. त्यातील ज्यावर आपल्याला बोलता येईल, त्याची काही वेगळी वैशिष्ट्ये सांगता येतील, अशी पुस्तके निवडून त्यावर अभ्यासपूर्ण परीक्षणे लिहितात. ही परीक्षणेसुद्धा त्यांना त्या लेखकांपर्यंत पोहचवायची नसतात किंवा ती कोणत्याही वर्तमानपत्रातून किंवा मासिकातून छापूनही आणायची नसतात, त्याचे व्हीडिओ करून ती प्रसिद्ध करायची नसतात. त्यांना त्या लेखकांना फक्त पुस्तकातूनच भेटायचे असते, त्यांच्याबरोबर फोटो काढायचे नसतात.

यानिमित्ताने महिनाभरात कमीत कमी एक पुस्तक तरी व्यवस्थित वाचून होते, असे या समूहाला वाटते. आपण जे काही वाचले आहे, त्या पुस्तकावर भाष्य करायचे, हे भाष्य त्या समूहातील दहा-पंधरा लोकांपर्यंत पोहोचते. पुस्तक परीक्षण वाचून झाल्यावर इतर सर्व त्यावर चर्चा करतात. या चर्चेतून ज्ञान प्राप्त होतेच; परंतु जो आनंद मिळतो तो जास्त महत्त्वाचा आहे. त्यातल्या प्रत्येकाला ते पुस्तक वाचावेसे वाटते. मग त्या पुस्तकाचे आदान-प्रदान निश्चितपणे होतेच.

ना कोणती वर्गणी काढायची, ना कोणता हॉल ठरवायचा, ना कोणत्याही पाहुण्यांचे मानधन-प्रवास खर्च पाहायचे. आपल्या आपल्या पद्धतीने वाचन संस्कृती वाढवण्यासाठी फक्त आपला वेळ द्यायचा!

इथे या समूहाशी संबंध आल्यामुळे मी या समूहाविषयी लिहू शकले; परंतु असे अनेक समूह आहेत जे साहित्य-संस्कृती-कला आपापल्या पद्धतीने जोपासत आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत.

कधी कधी मोठ्या साहित्यिक कार्यक्रमांपेक्षा मला असे छोटे कार्यक्रमही महत्त्वाचे वाटतात. आपल्याला काय वाटते हे नेमकेपणाने प्रत्येकाला सांगता येते. इथे ‘प्रत्येकाला’ या शब्दावर मला जोर द्यायचा आहे. नाहीतर सर्वसाधारणपणे कार्यक्रमात काही वक्ते असतात आणि बाकीच्यांना व्यक्त व्हायचे असूनही श्रोत्यांच्या भूमिकेत राहावे लागते.

अलीकडे एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात आलेली आहे. शिक्षण वा नोकरीनिमित्त परत कुटुंबाचे विभाजन होतेच आहे. त्यामुळेच खूपदा आपल्याला मोठ्या प्रमाणात माणसे एकेकटी राहताना दिसतात. त्यांना खूप काही बोलायचे असते. पण कोणाशी बोलणार? तर असे छोटे समूह महत्त्वाचे असतात जे फक्त हीच समस्या दूर करत नाहीत, तर इतर अनेक गोष्टींचे ज्ञान एकमेकांबरोबर वाटून घेतात, जगण्याची ऊर्मी देतात, जीवन सुकर करतात.

तर मग स्त्रियांनी नुसतीच ‘किटी पार्टी’ आयोजित करण्यापेक्षा आणि पुरुषांनी ‘ड्रिंक पार्टी आयोजित करण्यापेक्षा साहित्य-संस्कृती-कला-क्रीडा या क्षेत्रांतील आभासी किंवा प्रत्यक्ष कृतीद्वारे काहीतरी करून ज्ञान आणि आनंद मिळवायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? शेवटी चार माणसे एकत्र जमल्यावर खाणे-पिणे होतेच, नाही का?

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -