Ravichandran Ashwin : लढवय्या गोलंदाज

Share
  • श्रीशा वागळे

क्रिकेटमध्ये फलंदाजांनी झळकावलेली शतके, संघाच्या विजयातला त्यांचा वाटा याची चर्चा अधिक होते. मात्र संघाच्या विजयात गोलंदाजांचाही मोलाचा वाटा असतो. गोलंदाजही खोऱ्याने बळी मिळवत नवनवे विक्रम रचत असतो. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने नुकतेच नव्या विक्रमांना गवसणी घातली. पैकी अश्विनची कामगिरी खूपच आश्वासक आहे. या विक्रमी गोलंदाजाविषयी…

रविचंद्रन अश्विन… भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये नुकताच पाचशे बळींचा टप्पा ओलांडला. शंभर कसोटी सामन्यांमध्ये त्याने ही कामगिरी करून दाखवली. तिकडे इंग्लंडच्या जेम्स अँडरसननेही कसोटी क्रिकेटमध्ये सातशे बळी मिळवत नवा इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच जलदगती गोलंदाज ठरला. भारत आणि इंग्लंडदरम्यान नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत या दोन गोलंदाजांनी भरीव कामगिरी करत नव्या विक्रमांना गवसणी घातली. क्रिकेटमध्ये सर्वसाधारणपणे फलंदाजांच्या कामगिरीची अधिक चर्चा होत असते. त्यांच्याभोवती एक वेगळंच वलय असतं. मात्र गोलंदाजही संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलत असतात. अनेकदा गोलंदाजच विजयाचे शिल्पकार ठरत असतात. मात्र फलंदाजांच्या तुलनेत त्यांची कामगिरी काहीशी झाकोळली जाते. पण अश्विन आणि अँडरसन यांनी एकाच कसोटी मालिकेत बळींच्या बाबतीत मैलाचा दगड पार केल्यानंतर क्रिकेटविश्वात गोलंदाजांची कामगिरीही चर्चेचा विषय ठरली आहे.

क्रिकेटच्या इतिहासात आजवर एकापेक्षा एक सर्वोत्तम गोलंदाजांची नोंद झाली आहे. फलंदाजांचा कर्दनकाळ अशी बिरूदावली मिळवणारे अनेक गोलंदाज होऊन गेले. अनेक जलदगती आणि फिरकी गोलंदाजांनी क्रिकेटविश्वावर आपला खास ठसा उमटवला. जलदगती गोलंदाजी हे पाश्चिमात्य देशांचे बलस्थान तर आशिया खंडातल्या भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांकडे प्रभावी फिरकी गोलंदाजांचा ताफा. भारताने तर एकापेक्षा एक सरस फिरकी गोलंदाज दिले. बेदी, प्रसन्ना आणि चंद्रशेखर या त्रिकुटाने एक काळ गाजवला. त्यानंतर अनिल कुंबळे भारताचा हुकुमी एक्का बनला. हरभजन सिंगनेही गुणवत्ता दाखवून दिली. आजही अनिल कुंबळे हा सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आहे. मधल्या काळात अनेक फिरकी गोलंदाज भारतीय संघात दाखल झाले. मात्र प्रत्येकालाच संघातले स्थान राखला आले नाही. रविचंद्रन अश्विनने गुणवत्तेला प्रयत्नांची जोड देत भारतीय क्रिकेट संघात स्थान निर्माण केले. अश्विन टप्प्याटप्प्याने यशाच्या पायर्‍या चढत गेला. त्याने भारताच्या कसोटी विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मात्र रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजा आणि अगदी जसप्रीत बुमराह या समकालीन खेळाडूंइतके ‘स्टारडम’ अश्विनला लाभले नाही. तो संघातला ‘लो प्रोफाईल’ खेळाडूच राहिला. त्याला अनेकदा संघाबाहेरही बसावे लागले. मात्र संधीचे सोने करण्याचे कसब अश्विनने आत्मसात केले होते. अश्विनच्या नावे अनेक विक्रम आहेत. पाचशे किंवा त्याहून अधिक बळी मिळवणारा अश्विन हा क्रिकेट इतिहासातला फक्त नववा गोलंदाज आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटींच्या मालिकेत २६ बळी मिळवले. कसोटी मालिकेत सातहून अधिक वेळा २५ पेक्षा अधिक बळी मिळवण्याची कामगिरी करत अश्विनने मुथय्या मुरलीधरनचा विक्रमही मोडला. तसेच धरमशाला कसोटीमध्ये एका डावात छत्तीसाव्या वेळी पाच बळी मिळवत त्याने अनिल कुंबळेचा ३५ वेळा पाच बळी मिळवण्याचा विक्रमही मोडला. तसेच भारतीय भूमीवर सर्वाधिक बळी मिळवण्याचा कुंबळेचा विक्रमही अश्विनने मागे टाकला. आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे आपल्या पहिल्या आणि शंभराव्या कसोटीमध्ये एका डावात पाच बळी टिपणारा अश्विन हा क्रिकेटच्या इतिहासातला पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

२०११ मध्ये कसोटी पदार्पण करणारा रविचंद्रन अश्विन अविरत तेरा वर्षे क्रिकेट खेळतो आहे. तो भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ बनला आहे. अश्विनची आकडेवारीच त्याची महानता सिद्ध करण्यास पुरेशी आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल दहा वेळा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब पटकावला आहे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना प्रत्येकी पाच वेळा हा मान मिळाला असून कपिल देव, अनिल कुंबळे, राहुल द्रविड आणि हरभजन सिंग यांना प्रत्येकी चार वेळा हा किताब मिळाला आहे. विराट कोहलीने तीन वेळा अशी कामगिरी केली असून रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांना एकदाही हा किताब मिळालेला नाही. अश्विन हा सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये ५०, १००, १५०, २००, २५०, ३००, ३५०, ४००, ४५० आणि ५०० बळी मिळवणारा भारतीय गोलंदाज आहे, हे कदाचित कोणाला फारसे माहीतही नसावे. जसप्रीत बुमराहने ३४ कसोटी सामन्यांमध्ये १५० बळी मिळवण्याची कामगिरी केल्यानंतर त्याचे कोण कौतुक झाले. मात्र अश्विनने ही कामगिरी फक्त २९ सामन्यांमध्ये करून दाखवली आहे. भारताला गोलंदाजीच्या बळावर कसोटीत विजय मिळवून द्यायची अश्विनची टक्केवारीही सरस आहे. अश्विनने फिरकीला साथ देणाऱ्या भारतातीलच नाही तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवरही यश मिळवले आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये सध्या अश्विनच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आहे. कुंबळेच्या नावे ६१९ बळी आहेत. अश्विनही कुंबळेचा चाहता आहे. त्यामुळेच की काय, त्याने ६१८ बळी मिळवून निवृत्त होण्याचा मनोदय कधी काळी व्यक्त केला होता.

अश्विन एक उत्तम फलंदाजही आहे. खेळपट्टीवर अश्विन असेल तर भारतीय संघाला फारशी काळजी नसते. त्याने फलंदाजीच्या बळावरही कसोटी जिंकून दिल्या किंवा अनिर्णित राखल्या आहेत. अश्विनच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतके आहेत. कसोटी क्रिकेटमधल्या त्याच्या शतकांची संख्या भारताच्या काही नावाजलेल्या फलंदाजांपेक्षाही अधिक आहे. त्याने शिखर धवन, ऋषभ पंत आणि वसिम जाफर यांच्यापेक्षा अधिक कसोटी अर्धशतके ठोकली आहेत! अश्विन हा विचारी आणि हुशार क्रिकेटपटू आहे. त्याच्यात कर्णधार होण्याची क्षमता आहे. मात्र नशिबाने त्याला नेहमीच हुलकावणी दिली. मात्र अश्विनने त्याचा फारसा विचार न करता आपल्या कर्मालाच सर्वोच्च स्थानी राखले. वलयांकित राहण्यापेक्षा देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याला महत्त्व दिले. म्हणूनच अश्विन या ऐतिहासिक स्थानी पोहोचला.

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

1 hour ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

2 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

2 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

2 hours ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

2 hours ago