कविता : एकनाथ आव्हाड
भाषेची गोडी आपली
वाढवतात या म्हणी
म्हणींमध्ये लपलेली
असते एक कहाणी
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
म्हणतात बरं सारे
खाण तशी माती
शंभर टक्के खरे
शितावरून भाताची
होत असते परीक्षा
चोर सोडून सन्याशाला
देऊ नये शिक्षा
दगडापेक्षा वीट ही
नेहमीच असते मऊ
वड्याचं तेल वांग्यावर
काढत नका जाऊ
राजाला दिवाळी कधी
माहीत असते काय?
अडला नारायण
धरी गाढवाचे पाय
अंगापेक्षा बोंगा मोठ्ठा
कशाला बरं हवा?
अति तेथे माती हा
विचार जपून ठेवा
माकडाच्या हाती कोलीत
देऊ नये कधी
प्रयत्नांती परमेश्वर हे
लक्षात ठेवा आधी
भाषेला फुलवतात या
नव्या-जुन्या म्हणी
भाषेची गोडी वाढवतात
या अनुभवांच्या खाणी
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) अमरावती जिल्ह्यातील
सातपुडा पर्वतरांगेत
थंड हवेच्या या ठिकाण
वेळ जाई मजेत
याच्या दक्षिणेला आहे
बहामनी किल्ला
विदर्भातील या ठिकाणाचे
नाव लवकर बोला?
२) राजापुरी लेणी,
कमलगड किल्ला
सिडनी पॉइंट, धाम धरण
पाहायला जाऊ चला
सह्याद्रीच्या पाच
डोंगरांनी वेढले आहे ते
सातारा जिल्ह्यातील हे
थंड हवेचे ठिकाण कोणते?
३) नंदुरबार जिल्ह्यातील
अक्राणी तालुक्यात
थंड हवेचे हे ठिकाण
वसले अतिदुर्गम भागात
सीताखाई पॉइंट
यशवंत तलाव येथे
मच्छिंद्रनाथांची गुहा
सांगा बरं कोठे?