- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
सुमारे ५५ वर्षांपूर्वी आलेला ‘कन्यादान’ हा आशा पारेख आणि शशी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला राजेंद्र भाटियांचा सिनेमा. मोहन सहगल यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमात ओम प्रकाश, सईदा खान, आशा सचदेव, लक्ष्मीछाया, टूनटून, इंदिरा बंसल, मधुमती, सबिता चटर्जी इत्यादी कलावंतही होते. सिनेमा चांगलाच यशस्वी झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर ३.२ कोटींचा (आजचे १६५ कोटी) धंदा केला. त्यावर्षी सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या सिनेमांच्या यादीत त्याचा क्रमांक ४था होता. सिनेमाचे कथानक बालविवाहाच्या प्रथेच्या दोषांवर आधारित होते. हॉकीपटू अमर (दिलीप राज) आणि हॉकीपटूच असलेली लता (सईदा खान) एकदा परस्परविरोधी संघातर्फे एक हॉकी सामना खेळतात. लताची टीम जिंकते आणि तिथून त्या दोघांत प्रेमाची सुरुवात होते. अमरचा जवळचा मित्र असतो अमरकुमार (शशी कपूर). तो सईदा खान आणि दिलीप राजच्या लग्नात येऊ शकणारी एकेक अडचण सोडवून त्यांचे लग्न लावून देतो.
पुढे योगायोगाने त्याची भेट रेखा नावाच्या (आशा पारेख) एका ग्रामीण मुलीशी होते. त्या काळच्या हिंदी सिनेमात होते तशी सुरुवातीला त्या दोघांत जुजबी नोकझोक होते. नंतर फिल्म जगतातील रितीप्रमाणे त्यांच्याही भेटीचे रूपांतर प्रेमात होते! त्यानंतर जेव्हा शशी कपूर रेखाशी लग्नाचा प्रस्ताव घेऊन तिच्या आईकडे जातो, तेव्हा त्याला आईकडून कळते की, लहानपणीच रेखाचे लग्न कथेतील पहिल्या अमरशी झालेले आहे!
आता परिस्थितीची गुंतागूत अशी झाली आहे की, एकीकडे या दोघांचे उत्कट प्रेम आहे, तर दुसरीकडे मुळात देवभोळी ग्रामीण मुलगी असलेली रेखा रूढी-परंपरांचा मान ठेवण्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे ती शशी कपूरशी लग्नाला नकार देते. या गुंतागुंतीतून खास फिल्मी अशा अनेक घटना घडत जातात. शेवटी सर्व गुंता सुटून दुसऱ्याही जोडीचे प्रेम यशस्वी होते आणि कथा सुखांतिका बनते. या एकंदर कथेतून दिग्दर्शकांचा बालविवाहाचे दोष दाखवण्याचा प्रयत्न होता. सिनेमातील गाणी लिहिली होती हिंदी साहित्यातील प्रसिद्ध कवी पद्मभूषण गोपालदास सक्सेना तथा ‘नीरज’ आणि हसरत जयपुरी यांनी. नीरजजींना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले आहेत.
शंकर-जयकिशन या सदाबहार जोडीचे संगीत असल्याने ‘कन्यादान’ची सगळीच गाणी लोकप्रिय ठरली. त्यात ‘मिल गये, मिल गये, आज मेरे सनम, आज मेरे जमींपर नही हैं कदम’, ‘पराई हुं पराई,’ मेरी जिंदगीमे आते, तो कुछ और बात होती’ अशी एकापेक्षा एक गाणी होती.
त्यात कविवर्य नीरज यांचे एक अत्यंत रोमँटिक गाणे होते. रफीसाहेबांनी तबियतमध्ये गायलेल्या या गाण्यात नीरजजींनी एकापेक्षा एक रम्य कल्पना गुंफलेल्या होत्या. शशी कपूर आणि आशा पारेखवर चित्रित झालेल्या या गाण्यात अतिशय बुद्धिमान अभिनेत्री असलेल्या आशाने एका भोळ्याभाबड्या ग्रामीण युवतीचा मनोहारी अभिनय केला. हीच आशा पारेख फक्त ३ वर्षांनंतर ‘कटी पतंग’(१९७१) मध्ये एका वेगळ्याच रूपात भेटते तेव्हा ‘हीच का ती?’ असा प्रश्न आपल्याला पडतो, इतक्या दोन्ही भूमिका तिने समरसतेने केल्या होत्या.
शशी कपूर प्रेमाच्या अनावर अवस्थेत आशासमोर आपल्या प्रेमाची उत्कटता प्रकट करतो आहे असे दृश्य होते. तो म्हणतो, ‘मी तुला कितीतरी प्रेमपत्रे लिहिली.’ आशा म्हणते, ‘पण मला तर एकही मिळाले नाही!’ त्यावर रोमँटिक मूडमध्ये असलेल्या शशी कपूरचे उत्तर असते, ‘तुझ्या अनुपस्थितीत मी मनात सतत तुझ्याशी बोलतच असतो. प्रिये, ती माझी तुला लिहिलेली प्रेमपत्रेच असतात ना.’ मग त्याच्यातून कितीतरी सुंदर दृश्ये माझ्या मनात तरळत राहतात. ‘सकाळ झाली की त्यांची नाजूक फुले बनतात आणि रात्री जेव्हा मी आकाशात टक लावून पाहत तुझी कल्पना करतो तेव्हा त्यांच्या चांदण्या बनलेल्या असतात!’
लिखे जो ख़त तुझे,
वो तेरी यादमें,
हज़ारों रंगके, नज़ारे बन गए…
सवेरा जब हुआ, तो फूल बन गए,
जो रात आई तो, सितारे बन गए…
कुठून एखादा सूर जरी ऐकू आला तरी मला वाटते ही तुझीच चाहूल आहे. एखादी कळी उमलली, तर तू लाजत आहेस, असा भास होतो. कुठे सुवासाचा दरवळ जाणवला, तर वाटते तूच केस मोकळे सोडले असशील म्हणून हा सुंगध येतोय.
कोई नगमा कहीं गूँजा, कहा दिलने ये तू आई,
कहीं चटकी कली कोई,
मैं ये समझा तू शरमाई…
कोई खुश्बू कहीं बिख़री,
लगा ये ज़ुल्फ़ लहराई,
लिखे जो खत तुझे…
आता तूच सांग हे असे मस्त वातावरण त्यात तुझे लोभस हावभाव, हे तुझे गोड लाजणे, त्यात हा एकांत आणि मग त्या सर्वांतून तुझे अचानक गायब होऊन जाणे! तूच सांग, तुझी ही जादू कुणालाही वेड लावणार नाही का?
फ़िज़ा रंगीं अदा रंगीं, ये इठलाना, ये शरमाना,
ये अंगड़ाई, ये तन्हाई,
ये तरसाकर चले जाना…
बना देगा नहीं किसको, जवां जादू ये दीवाना,
लिखे जो खत तुझे…
प्रिये, जिथे तू असतेस तिथे मी आपोआपच खेचला जातो. तू जणू माझ्या हृदयाची धडधड बनली आहेस. मी प्रवासी असेन, तर तूच माझ्या प्रेमयात्रेचे अंतिम ध्येय आहेस. मी तहानलेला आहे आणि तू जणू वरून धो धो कोसळणारा पाऊस! खरे तर तुझे डोळे हेच आता माझे विश्व झाले आहे. माझ्या मनाला तुझा पदर स्वर्ग वाटू लागला आहे.
जहाँ तू है, वहाँ मैं हूँ,
मेरे दिलकी तू धड़कन है…
मुसाफ़िर मैं, तू मंज़िल है,
मैं प्यासा हूँ, तू सावन है…
मेरी दुनिया, ये नज़रें हैं,
मेरी जन्नत ये दामन हैं…
लिखे जो खत तुझे…
आज पत्र लिहायला आणि कुणी लिहिले तरी ते वाचायला वेळ आहे कुणाकडे? एखादी भावना शांतपणे व्यक्त करण्याइतकी, समजावून घेण्याइतकी फुरसतच कुणाकडे नाही. अगदी तारुण्यातली तरल प्रेमभावनासुद्धा मनाच्या पातळीवर कमी आणि शरीराच्या पातळीवर जास्त पोहोचली आहे. प्रेमाची दुनिया दिवसेंदिवस उजाड होते आहे. मग नव्या ‘प्रॅक्टिकल जगात’ अशा नाजूक भावनांना, हळव्या गीतांना कितीसे महत्त्व राहणार?
पण ज्यांनी हे ‘आतल्या जगण्याचे’ वैभव पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांना अशी गाणी एक नवा उत्साह देतच राहणार आणि न लिहिलेली कितीतरी पत्रे त्यांच्या मनात घोळतच राहणार!