- ओंजळ : पल्लवी अष्टेकर
काही व्यक्ती जगात लौकिकार्थाने कितीही मोठी झाली तरी, त्यांचे पाय जमिनीवर असतात, काही हवेत असतात. खरे तर माणसाने स्वत:चा अहंकार कुरवाळण्यात वेळ घालवू नये, तर कृती करावी. आलेल्या अनुभवातून, घडलेल्या प्रसंगातून या व्यक्ती अहंकारापासून दूर जातात. त्यांच्यातील मानवी मूल्यांची जडण-घडण त्यांच्या लहानपणीच होत असते.
कवियित्री शांता शेळके यांच्या आयुष्यातील एक प्रसंग. त्यावेळी शांताबाई इंग्रजी पहिलीत शिकत होत्या. त्या एका मुलांच्या शाळेत शिकत होत्या व त्यांच्या वर्गात त्या एकटीच मुलगी होत्या. शांताबाईंचा मराठी हा विषय चांगला असल्यामुळे बहुतांशी शिक्षक त्यांचे कौतुक करीत. सहसा शांताबाईंना शिक्षकांकडून मार खावा लागत नसे. त्यामुळे त्यांच्या मनात ‘आपण इतरांपेक्षा विशेष कुणीतरी आहोत’ असा अहंकार जोपासला गेला होता. एकदा त्यांच्या वर्गावर एक इन्स्पेक्टर आले. त्यावेळी मराठीचा तास सुरू होता. शांताबाईंचा मराठी विषय चांगला असल्यामुळे शिक्षकांनी भरपूर प्रश्नं शांताबाईंना विचारले व त्यांनी त्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब व मराठीचे शिक्षक खूश झाले. यातून शांताबाईंचा अहंकार आणखीनच वाढला व त्यादिवशी वर्गात त्या इतरांशी बोलायला तयार होईनात. मधल्या सुट्टीनंतरचा तास गणिताचा होता. तेव्हा त्यांना जे शिक्षक मराठी शिकवायचे, तेच गणितही शिकवायचे. त्यादिवशी वर्गात येताना त्यांनी आठवड्याच्या परीक्षेचे गणिताचे पेपर्स तपासून आणले होते. शांताबाई काहीशा सावरून बसल्या. गणित हा विषय त्यांचा अतिशय कच्चा होता. तरीही त्यांना आशा होती की, आपल्याला पास होण्यापुरते गुण नक्की मिळतील. मास्तरांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर व गुणांचा आकडा वाचीत एकेक पेपर द्यायला सुरुवात केली. ‘शांता शेळके, मार्क शून्य’ असे सांगताच शांताबाईंना खूप वाईट वाटले. रडू फुटले. छातीत धडधडू लागले. त्यादिवशी इतर नापास झालेल्या मुलांप्रमाणे त्यांच्याही हातावर छड्या बसल्या.
या घटनेपासून शांताबाई म्हणतात, “अजूनही कोणी माझे कशावरून तरी कौतुक केले किंवा मला स्वत:ला माझ्याविषयी कौतुक वाटू लागले, तर मला लगेचच गणिताच्या पेपरची आठवण होते व मी तत्काळ भानावर येते.” त्यामुळे व्यक्तीने स्वत:चा अहंकार कुरवाळण्यात वेळ घालवू नये, तर कृती करावी असे एक सुंदर मानवी मूल्य आपण यातून शिकतो.
मी इयत्ता सहावीत असतानाचा प्रसंग. माझ्या आईचे एक ऑपरेशन होते, म्हणून ती तिच्या माहेरी कोल्हापूर येथे मुक्कामाला होती. तेव्हा मी व माझे वडील सांगलीमध्ये होतो. माझे वडील बँकेत अधिकारी असल्यामुळे त्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या होत. त्यामुळे आई नसताना, मी व बाबा राहायचो. माझ्या वडिलांनी मला काॅफी बनविणे, चहा करणे असे जुजबी पदार्थ शिकविले होते. मलाही ते शिकताना आत्मविश्वास वाटत असे. एकदा सकाळी वरण-भात शिजवून मला खायला सांगून बाबा लवकर बँकेत निघून गेले. मी घरी एकटीच होते. माझी शाळेला जायची वेळ जवळ येत चालली होती. मी कशीबशी वाॅटरबॅग भरून घेतली. घरात कोरडा खाऊ भरपूर होता; परंतु मला आईची खूप आठवण येऊ लागली व रडू कोसळले.
शाळेला जाताना डबा भरून घेण्याची मला इच्छाच होईना. पाठीवर दप्तर, हातात वाॅटरबॅग व डोळ्यांत पाणी अशा अवस्थेत शाळेत जाण्यासाठी मी फ्लॅटचा दरवाजा बंद करू लागले. तेव्हा आमच्या फ्लॅटच्या समोरच्या फ्लॅटमध्ये खाडे काकू रहायच्या. त्यांचे पतीही बँकेत अधिकारी होते. त्यांना तीन मुले होती. तेव्हा त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. खाडे काकूसुद्धा बाहेर निघाल्या होत्या. पण मला पाहून त्या थांबल्या. माझ्या डोळ्यांतील पाणी पुसून त्यांनी मला प्रेमाने जवळ घेतले व “काय झाले?” म्हणून विचारले. मी त्यांना सर्व काही सांगितले. मग खाडे काकूंनी माझा टिफिन भरून दिला, त्यात त्यांनी दोन पोळ्या व बटाट्याची भाजी घातली होती. “शाळा चुकवू नकोस हं, मधल्या सुट्टीत डबा खा” असे म्हणून त्यांनी प्रेमभराने माझा निरोप घेतला. त्यादिवशी दुपारी तो डबा मला अमृतासमान भासला. त्यांचे प्रेम, माया, मदत करण्यातली तत्परता आठवली की, अजूनही माझे डोळे भरून येतात. नंतर लवकरच त्यांची बदली सोलापूरला झाली, मात्र तो प्रसंग मी अजूनही विसरू शकत नाही. मी अजून त्यांच्या ऋणातच आहे व इतरांवर प्रेम, माया, मदत करायला बांधील आहे.
काही माणसे जगात लौकिकार्थाने कितीही मोठी झाली तरी, त्यांचे पाय जमिनीवर असतात. आलेल्या अनुभवातून, घडलेल्या प्रसंगातून या व्यक्ती अहंकारापासून दूर जातात. त्यांच्यातील मानवी मूल्यांची जडण-घडण त्यांच्या लहानपणीच होत असते. आपले पालक, शिक्षक, नातलग, समाज यातून अशा व्यक्ती घडत असतात.
आपल्या देशाला फार मोठी संत परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत व समाजसुधारक म्हणून गाडगेबाबांची ख्याती आहे. संत गाडगेबाबा पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. लोक त्यांना प्रेमाने गाडगेबाबा असे म्हणत. संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिक रूढी-परंपरा यावर टीका करीत. ते समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता व चारित्र्य यांची शिकवण देत.
माणसांमध्ये देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून ठिकठकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. ते अपंग, अनाथ, दीन-दुबळे अशा लोकांतच जास्त रमत. त्यांचे उपदेश साधे, सोपे असत. चोरी करू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, कर्जबाजारी होऊ नका. आपल्या कीर्तनातून ते समाज प्रबोधन करीत असत. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच प्रश्नं विचारून त्यांच्या अज्ञान, दोष व दुर्गुणांची जाणीव करून देत. अतिशय साधी राहणी, डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच. एका हातात झाडू व दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे. लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत. या कामांची त्यांना खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. ते विवाहित होते. त्यांना मुलेबाळे होती. मात्र संसारात फारसे न रमता ते समाजाचा संसार सुधारण्यासाठी बाहेर पडले. अन्नदान, जलदान, वस्रदान, शिक्षणासाठी मदत, आसरा, औषधोपचार, रोजगार, पशू-पक्ष्यांना अभय, दु:खी, निराश लोकांना हिंमत या मूल्यांना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
साधारण किंवा मोठी माणसे अथवा संत यांच्या अनुभवातून, चांगल्या वागणुकीतून अनेक आठवणी आपल्या मनावर कोरल्या जातात, जतन केल्या जातात. यासाठी फार मोठ्या गोष्टींची गरज नाही, तर आयुष्यातील चांगल्या गोष्टींबाबत आपण कृतज्ञता ठेवूया व या मूल्यांमधून आपले सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करूया.