पोलिसांची कठोर भूमिका
बीड : मराठा आंदोलनाचे (Maratha Protest) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) बाबतीत जितके आक्रमक होत आहेत तितक्याच त्यांच्या अडचणी अधिकाधिक वाढत आहेत. त्यांच्याविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. यावेळी दोन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभा, बैठका उशिरापर्यंत होत असतात. या सभांवर पोलीस करडी नजर ठेवून आहेत. जरांगे पाटील यांच्या सभा किंवा बैठका झाल्या त्याठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याविरोधात याआधी चार गुन्हे दाखल झाले होते. आता दोन दिवसात आणखी पाच गुन्हे दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव, अंबाजोगाई अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले केले होते. महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केले होते. ठिकठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यांच्या आंदोलनाला यश देखील आलं. कुणबी नोंदी असलेल्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू लागलं. तसेच मराठ्यांच्या वेगळं आरक्षण देणारा कायदा देखील सरकारने आणला आहे.
मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या कायद्यापेक्षा मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची मागणी लावून धरली आहे. यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते. पण, यावेळी सरकारकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद कमी झाला होता. माध्यमांसमोर बोलताना जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली, तसेच गंभीर आरोप केले. तेव्हापासून त्यांच्या आंदोलनाची धार कमी झाली आहे. पोलीसही त्यांच्या विरोधात कठोर भूमिका घेताना दिसत आहेत.