Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : मेरे प्रिय परिवारजन... आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांचं देशवासियांना पत्र!

PM Narendra Modi : मेरे प्रिय परिवारजन… आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांचं देशवासियांना पत्र!

काय म्हटलं आहे पत्रात?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तारखा आज जाहीर होणार असून आचारसंहिता (Code of conduct) लागू होणार आहे. तत्पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांसाठी एक पत्र (Letter) लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. ‘मेरे प्रिय परिवारजन’ असं म्हणत मोदींनी पत्रामध्ये विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी लोकांकडून मतं मागवली आहेत.

पत्रामध्ये मोदी म्हणतात, माझ्या आणि तुमच्या नात्याला एक दशक पूर्ण झालं आहे. तुमचं सहकार्य आम्हाला कायम मिळणार, असा मला विश्वास आहे. देशातल्या १४० कोटी कुटुंबियांचा विश्वास, समर्थन यामुळे निर्माण झालेलं नातं विशेष आहे. या नात्याला शब्दामध्ये व्यक्त करणं अवघड आहे.

मोदी पत्रामध्ये लिहितात, राष्ट्र निर्माणासाठी आम्ही सातत्याने कष्ट घेत आहोत, ही मोदींची गॅरंटी आहे. देशातील कुटुंबियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणं, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. शेतकरी, गरीब, युवक आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आमच्या सरकारने इमानदारीने काम केलं आहे. त्याचे परिणाम आज देशाला दिसून येत आहेत.

त्यांनी पत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारतच्या माध्यमातून दिलेल्या सोयीसुविधा, मातृवंदना योजना, जीएसटी, कलम ३७०, तीन तलाख, महिलांसाठीचं नारी शक्ती वंदन विधेयक याविषयी माहिती दिली. याशिवाय आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी लोकांकडून समर्थन आणि सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

भाजप आणि मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीत ४०० जागा जिंगण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारचा विकासाचा अजेंडा आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचा दावा हा भाजपचा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा आहे. यावरुनच पंतप्रधानांनी थेट लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.

पंतप्रधानांनी पत्रामध्ये शेवटी म्हटलंय की, लोकशाहीचं सौंदर्य हे लोकसहभागात आहे. देशहितासाठी मोठे निर्णय घेणं, मोठ्या योजना बनवणं आणि त्या लागू करणं लोकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मला तुमच्या सहकार्याची आणि सूचनांची नितांत गरज आहे. मला विश्वास आहे की, तुमची साथ मला मिळणारच आहे, अशा भावना पंतप्रधानांनी या पत्रातून व्यक्त केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -