नवी दिल्ली : देशात लोकसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी देशात आजपासूनच आचारसंहिताही लागू झाल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.
५४३ जागांवर लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्पा २६ एप्रिलला, तिसरा टप्पा ७ मे रोजी, चौथा टप्पा १३ मे रोजी, पाचवा टप्पा २० मे रोजी, सहावा टप्पा २५ मे रोजी तर सातवा आणि अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
पहिला टप्पा : मतदान- १९ एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील एकूण ५ मतदारसंघ)
दुसरा टप्पा : मतदान- २६ एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण ८ मतदारसंघ)
तिसरा टप्पा : मतदान- ७ मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण ११ मतदारसंघ)
चौथा टप्पा : १३ मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण ११ मतदारसंघ)
पाचवा टप्पा : २० मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण १३ मतदारसंघ)
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद झाली. यावेळी राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त एस. एस. सिंह आणि ज्ञानेश कुमारही हजर होते. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित करण्यात आली.
कुठे पैसा वाटप सुरू असेल, कुठे गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील ॲप वर टाका, तुमच्या मोबाईलचे अक्षांश, रेखांश वरून लोकेशन ट्रॅक करून १०० मिनिटात आमची टीम तिथे पोहचतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
आमच्यासमोर निवडणुकीची तयारी करताना एकूण चार आव्हाने होती. यामध्ये मसल पॉवर, मनी पॉवर, अफवा रोखण्याचे सगळ्यात मोठे आव्हान आमच्यासमोर होते. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे. त्याचप्रमाणे नो युवर कँडीडेट या अॅपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. हिंसाचार रोखण्यासाठीही आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे ते म्हणाले.
८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यमातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरु आहे. ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. ८०० जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
१६ जूनला १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती यावेळी राजीव कुमार यांनी दिली.
देशात ९७ कोटी नोंदणीकृत मतदार
देशात सध्याच्या घडीला ९७ कोटी नोंदणीकृत मतदार असल्याचे यावेळी राजीव कुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे देशात साडेदहा लाख मतदार केंद्र असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये ५५ लाखांपेक्षा अधिक ईव्हीएम, १.२ कोटी प्रथम मतदार, ४८ हजार तृतीयपंथी, १०० वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या २ लाख, १.५ कोटी निवडणूक अधिकारी, १८ ते २१ वयोगटातील मतदारांची संख्या २१.५० कोटी, १२ राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
गेल्या वेळी २०१९ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारीख १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. गेल्या वेळी ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी ६७.१ टक्के मतदान झाले होते. तर २३ मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकल्या. तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या. त्याआधी २०१४ मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…