Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘अमेरिकन अल्बम’ ऐन पंचविशीत...!  

‘अमेरिकन अल्बम’ ऐन पंचविशीत…!  

  • राजरंग : राज चिंचणकर

नात्यांमधल्या भावविश्वाचा ठेवा जतन करणारे ‘अमेरिकन अल्बम’ हे नाटक अल्पावधीतच ऐन पंचविशीत येऊन पोहोचले आहे. मुंबई आणि शिकागो या शहरांचे प्रतिबिंब या नाटकात पडले असून, ते या नाटकाचे वैशिष्ट्य ठरले आहे.  गेल्या तीन-चार दशकांपासून भारतातून अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुले शिक्षणासाठी अमेरिकेत जातात. तिथे शिक्षण घेऊन नोकरी मिळवतात, संसार थाटतात आणि अमेरिकेतच स्थायिक होतात. पण  त्यांची पाळेमुळे मात्र भारतीय असतात. त्यांना सतत भारताची आठवण येत असते. पण अमेरिकेतच जन्मलेली त्यांची मुले मात्र पूर्णतः अमेरिकन असतात. भारतातल्या त्यांच्या नातेवाइकांबद्दल ही मुले फक्त ऐकून असतात. पण त्यांना त्यांच्याबद्दल काहीच संवेदना नसतात; अशा प्रकारच्या कथासूत्रावर  हे नाटक बेतले आहे.

या नाटकासाठी दिग्दर्शन, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना आणि वेशभूषा अशी ‘सबकुछ’ कामगिरी पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांभाळली आहे. भाग्यश्री देसाई यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. ‘रसिक मोहिनी’ आणि ‘एफ.एफ.टी.जी.’ निर्मित या नाटकाचे लेखन राजन मोहाडीकर यांनी केले आहे.  दीपक करंजीकर, आशुतोष नेर्लेकर, मोनिका जोशी, अमृता पटवर्धन व भाग्यश्री देसाई या कलाकारांनी या नाटकात भूमिका रंगवल्या आहेत. आतापर्यंत या नाटकाचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग झाले असून, १७ मार्च रोजी पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग रंगणार आहे.

‘चाळिशीतले चोर’ रंगभूमीवरून पडद्यावर…! 

‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ या गोष्टीने रसिक वाचकांच्या काही पिढ्यांचे मनसोक्त रंजन केले आहे. यातल्याच ‘चाळीस चोर’ या शब्दांना वेगळे वळण देत, मराठी रंगभूमीवर काही वर्षांपूर्वी ‘चाळिशीतले चोर’ अवतरले होते. ‘अलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ या नावाने रंगभूमीवर आलेले हे नाटक बरेच गाजले होते. हेच ‘चाळिशीतले चोर’ आता रूपेरी पडद्यावर येत आहेत.

वयाच्या चाळिशीत असलेली काही मंडळी एक पार्टी साजरी करत असताना अचानक लाईट जातो आणि त्या अंधारात कसला तरी ‘सूचक’आवाज ऐकू येतो. या ‘थीम’ला हाताशी धरत या चाळिशीतल्या चोरांनी नाट्यरसिकांचे मनोरंजन केले होते. हेच ‘चाळिशीतले चोर’ आता चित्रपटात धमाल उडवण्यास सज्ज झाले आहेत. वास्तविक, ‘अलीबाबा आणि चाळिशीतले चोर’ या शीर्षकातच गंमत आहे आणि त्यानुसार यात काही रहस्येही दडलेली आहेत. विवेक बेळे लिखित व आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, अतुल परचुरे अशा आघाडीच्या कलावंतांची फळी  आहे. सध्या तरी चाळिशीतल्या या चोरांचे गूढ वाढले असून, त्याची उकल होण्यासाठी २९ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’

ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट लवकरच रूपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला असून, एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते, असे एक वाक्य आहे. या वाक्यातूनच बाबुजींच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते.

रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून, आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -