पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात सुमारे एक लाख २५ हजार कोटी रुपये किमतीच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली. यात गुजरात येथील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्र येथे सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा, आसाममधील मोरीगाव येथे बाह्यस्त्रोत सेमीकंडक्टर जोडणी आणि चाचणी सुविधा तसेच गुजरातमधील साणंद आऊटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेम्ब्ली आणि टेस्ट सुविधा या सुविधांचा समावेश आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि आधुनिकीकरणाकडे नेण्यात स्वदेशी उत्पादन म्हणजेच मेड इन इंडिया आणि डिझाइन इन इंडिया चिप्स हे प्रमुख भूमिका बजावतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर अभियानाची घोषणा केली होती आणि काही महिन्यांतच यासाठीचे सामंजस्य करार झाले आणि आता तीन प्रकल्पांची पायाभरणी झाली, ही निश्चितच गतिमान कामगिरी मानायला हरकत नाही.
सेमीकंडक्टर रचना, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासासाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थापित करून देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मूळ ध्येयदृष्टी होती. त्याचाच भाग म्हणून गुजरातच्या धोलेरा, आसाम आणि गुजरातमधील साणंद येथील या तीन प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट होतील आणि तिचा भारतातही पाया भक्कम होणार आहे. या युनिट्समुळे सेमीकंडक्टर उद्योगातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे, तसेच इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम इत्यादी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आज जगातील मोजकीच राष्ट्रे सेमीकंडक्टर्सची निर्मिती करत आहेत.
कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या व्यत्ययानंतर विश्वासार्ह पुरवठा साखळीच्या गरजेवर केंद्र सरकारने भर दिला आहे. देशाच्या तंत्रज्ञान अवकाश, आण्विक आणि डिजिटल सामर्थ्यावर प्रकाश टाकला, तर जगात भारताचे नाव सन्मानाने घेतले जात आहे. मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर उत्पादनासाठी आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर तयार करण्यासाठी पीएलआय योजना, तसेच इलेक्ट्रॉनिक कार्यक्षेत्राच्या वृद्धीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर उत्पादन क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यातून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाइल उत्पादक देश असल्याचा गौरव केला जात आहे.
आजच्या तरुणांना त्यांच्यासाठी निर्माण होत असलेल्या संधींची चांगलीच जाणीव आहे, मग ते अंतराळ क्षेत्र असो किंवा मॅपिंग क्षेत्र असो, तरुणांसाठी ही क्षेत्रे खुली आहेत. सेमीकंडक्टर हा केवळ एक उद्योग नसून, तो अमर्याद क्षमता असलेल्या क्षेत्राची कवाडे खुली करत आहे. सेमीकंडक्टर संशोधनाचा तरुणांना सर्वाधिक फायदा होणार आहे. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था बनण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळालेले अभूतपूर्व पाठबळ आणि प्रोत्साहन यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात स्टार्टअपसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. आजच्या प्रकल्पांमुळे तरुणांना अनेक प्रगत तंत्रज्ञानाच्या नोकऱ्या मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक सेकंदाचा सदुपयोग करण्याच्या गरजेवर भर देण्याचा सल्ला पंतप्रधान मोदी देतात. कमी अवधीत ‘चिप्स फॉर विकसित भारत’ ही संकल्पना राबवित केंद्र सरकार किती वेगाने काम करत आहे याचे उदाहरण भारतीय जनतेला दिसून आले आहे.
भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राबाबतच्या स्वप्नांची कल्पना पहिल्यांदा १९६० च्या दशकात करण्यात आली होती; परंतु तत्कालीन केंद्र सरकारकडे इच्छाशक्तीचा आणि संकल्पांना सिद्धीमध्ये नेण्याचा अभाव असल्याने त्यावर कृती होऊ शकली नव्हती. देशाची क्षमता, प्राधान्यक्रम आणि भविष्यातील गरजा समजून घेण्यात पूर्वीच्या सरकारांच्या असमर्थतेबद्दलही आता बोलून काय फायदा?; परंतु ते काम सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दूरदर्शी आणि भविष्यवेधी दृष्टिकोनामुळे साकार होताना दिसत आहे. विकसित देशांशी स्पर्धा करण्याच्या महत्त्वाकांक्षेसह सेमीकंडक्टर उत्पादनाचा वेग वाढविणे यावर मोदी सरकारने भर दिलेला दिसतो.
भारताच्या गगनयानच्या तयारीला वेग आला आहे आणि नुकतेच भारतातील पहिल्या मेड इन इंडिया फास्ट ब्रीडर अणुभट्टीचे उद्घाटन झाले आहे. “हे सर्व प्रयत्न, हे सर्व प्रकल्प, भारताला विकासाच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहेत आणि निश्चितच आजच्या या तीन प्रकल्पांचाही यात मोठा वाटा असेल”, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे. आत्मविश्वास असलेली तरुणाई देशाचे भाग्य बदलते. भारताची झपाट्याने होत असलेली प्रगती आपल्या युवाशक्तीचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. भारतातील तरुणाई सक्षम आहे आणि त्यांना संधी हवी आहे. सेमीकंडक्टर उपक्रमाने ती संधी आज भारतात आणली आहे. त्यामुळे हे चिप उत्पादन भारताला आत्मनिर्भरतेकडे, आधुनिकतेकडे घेऊन जाईल, यात शंका नाही.