
सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला निर्देश
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme court) आज निवडणूक रोख्यांसंबंधी (Electoral bonds) सुनावणी सुरू आहे. यावेळी सरन्यायाधीशांनी एसबीआयला (State Bank of India) इलेक्टोरल बाँड्सचे नंबरही उघड करण्याबाबत निर्देश दिले आहेत. SBI ने आतापर्यंत बाँड्सची खरेदी कोणी केली, आणि कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली याची माहिती दिली आहे. मात्र कोणी कोणत्या पक्षाला रक्कम दिली हे आतापर्यंत समोर आलं नव्हतं. बाँड्सचे नंबर उघड केल्यानंतर ही माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे.
स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे ३० जूनपर्यंतची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला (SBI) दणका दिला. शिवाय १२ मार्चला निवडणूक रोख्यांची माहिती निवडणूक आयोगाला (Election Commission) देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला दिले होते.
दरम्यान, निवडणूक आयोगालाही ही माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यासाठी १५ मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. यासंबंधी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु असून निवडणूक रोख्यांचे नंबर उघड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.