
निवडणूक आयोगाची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद
नवी दिल्ली : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहत आहेत. ही निवडणूक नेमकी कधी असणार याबाबत राजकीय पक्षांसह (Political Parties) जनताही उत्सुक आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता सर्वांचीच प्रतिक्षा संपली असून उद्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यासंबंधी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission of India) उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
लोकसभेच्या निवडणुका यावेळी ६ ते ७ टप्प्यात घेतल्या जातील असा अंदाज आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिताही (Code of Conduct) लागू होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 'दोन दिवसात आचारसंहिता लागू शकते' असं वक्तव्य केलं होतं, ते खरं ठरणार आहे. उद्या दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि काही विधानसभा यांची घोषणा १६ मार्चला केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर निवडणुकीच्या राजकीय लढाईचे टप्पे जाहीर होतील. उद्या निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे देशाचं लक्ष असणार आहे.
सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार
२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. गेल्या वेळी निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान झाले. २३ मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात ९१ कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी ६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे ९७ कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.