Sunday, July 14, 2024
HomeदेशPM Modi : भाजपाच्या बाजूने विकासाचे उपक्रम तर इंडिया आघाडीच्या बाजूने घोटाळे

PM Modi : भाजपाच्या बाजूने विकासाचे उपक्रम तर इंडिया आघाडीच्या बाजूने घोटाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डीएमके-काँग्रेसवर घणाघात

कन्याकुमारी : १९९१ मध्ये मी (PM Modi) कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘एकता यात्रा’ सुरू केली. यावेळी मी काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला. जम्मू-काश्मीरच्या लोकांनी त्या लोकांना नाकारले. ज्यांना भारताचे विभाजन करायचे आहे. मला खात्री आहे की तामिळनाडूचे लोकही असेच करतील. भाजपाच्या बाजूने विकासाचे उपक्रम आहेत, इंडिया आघाडीच्या बाजूने घोटाळे असल्याचे प्रतिपादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी डीएमके-काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या कन्याकुमारीमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. याच दरम्यान मोदी म्हणाले की, तामिळनाडूमध्ये यावेळी भाजपाची कामगिरी डीएमके-काँग्रेस इंडिया आघाडीचा अहंकार मोडून काढेल. भारताच्या दक्षिणेकडील किनारपट्टी असलेल्या कन्याकुमारी येथून आज उठलेली लाट दूरवर पोहोचणार आहे. जनतेला लुटण्यासाठी डीएमके आणि काँग्रेसला सत्तेवर यायचे आहे. २ जी घोटाळ्यात द्रमुकला सर्वाधिक फायदा झाला असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

आम्ही ऑप्टिकल फायबर आणि ५ जी दिले, आमच्या नावावर डिजिटल इंडिया योजना आहे. इंडिया आघाडीच्या नावावर लाखो कोटींचा २ जी घोटाळा झाला आहे आणि त्या लुटीत डीएमके सर्वात मोठा हिस्सेदार होता. उडान योजना आमच्या नावावर आहे, इंडिया आघाडीच्या नावावर हेलिकॉप्टर घोटाळा आहे. आमच्या खेलो इंडिया आणि टॉप्स योजनांमुळे देशाने क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जा मिळवला, पण त्यांच्या नावावर सीडब्ल्यूजी घोटाळा असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले.

द्रमुक आणि काँग्रेस महिलाविरोधी

द्रमुकवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘द्रमुक हा तामिळनाडूच्या भविष्याचा, तिथल्या संस्कृतीचा शत्रू आहे. अयोध्या मंदिराच्या कार्यक्रमाच्या प्रसारणावर ‘बंदी’ घालण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मी येथे आलो होतो. द्रमुकने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहूनही बंदी घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला खडे बोल सुनावले. द्रमुकला देशाचा, तिथल्या संस्कृतीचा आणि वारशाचा तिरस्कार आहे. द्रमुक आणि काँग्रेस महिलाविरोधी आहेत आणि महिलांचा अपमान करत असल्याचा आरोप मोदी यांनी यावेळी केला.

एनडीए सरकारमुळे जल्लीकट्टूचा मार्ग मोकळा

जेव्हा दिल्लीत संसदेची नवीन इमारत बांधली गेली, तेव्हा आम्ही नवीन इमारतीमध्ये तमिळ संस्कृतीचे प्रतीक आणि या भूमीचे वरदान असलेल्या पवित्र सेंगोलची स्थापना केली. पण या लोकांनी यावरही बहिष्कार घातला, त्यांना ते आवडले नाही. जल्लीकट्टूवर बंदी घातली, तेव्हा द्रमुक आणि काँग्रेस गप्प राहिले. या लोकांना तमिळ संस्कृती नष्ट करायची आहे. हे आमचे सरकार आहे, एनडीए सरकारने जल्लीकट्टूचा मार्ग मोकळा केला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -