Saturday, May 10, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

Bhagvadgita : वस्तुनिष्ठ आदर्श भगवदगीता

Bhagvadgita : वस्तुनिष्ठ आदर्श भगवदगीता

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


परमेश्वर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे व परमेश्वराबद्दलचे अज्ञान जे लोकांमध्ये आहे, मग आस्तिक असो की नास्तिक असो, हे अज्ञान सर्व धर्मियांमध्ये आहे, सर्व पंथांमध्ये आहे. हेच अज्ञान वाढत गेल्यामुळे द्वैत वाढत गेले. त्यातून श्रेष्ठ, कनिष्ठ ही भूमिका निर्माण झाली, कॉम्प्लेक्स निर्माण झाला, इनफेरिअटी/ सुपअरिअटी कॉम्प्लेक्स निर्माण झाले.



मी श्रेष्ठ दुसरे कनिष्ठ, माझा धर्म श्रेष्ठ व इतरांचा धर्म कनिष्ठ, माझा देव खरा तर दुसऱ्यांचा देव खोटा, माझा संप्रदाय बरोबर व दुसऱ्यांचा संप्रदाय चूक, असे निरनिराळे कॉम्प्लेक्स निर्माण झाले. ह्यांत आज माणूस अडकला आहे.



“गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुझे गुणे.” अर्जुन हा गुंतला होता तो अर्जुनपणांत. ह्या सर्व कल्पना आहेत. अर्जुनपणांत गुंतल्यामुळे हे माझे मित्र, ते माझे शत्रू; हे माझे नातेवाईक, बाकीचे लोक माझे नाहीत, ह्यांचा वध मी कसा करणार? मी जर युद्ध केले तर माझेच लोक माझ्या हातून मारले जातील. मला पाप लागेल, मी नरकात जाईन. ह्या सगळ्या कल्पना आहेत. भगवंतांनी याचसाठी अर्जुनाला गीता सांगितली. त्यात त्यांनी त्याला सांगितले की, ह्या साऱ्या कल्पना आहेत. तू हे जे काही बोलतो आहेस की तू कोण आहेस, हे कोण आहेत माहीत नाही म्हणून बोलतो आहेस.तुला जर कळेल की तू कोण आहेस, ते कोण आहेत तर तू हे बोलणार नाहीस. अर्जुनाच्या अपेक्षेत तो जो विचार करत होता त्या कल्पनेत गुंतला होता. ह्याचा परिणाम असा झाला की तो लढाईला तयार होईना. अर्जुन हा फक्त निमित्त आहे. भगवंतांनी भगवदगीता ही संपूर्ण जगासाठी सांगितलेली आहे. ह्यातून एक बोध घेतला पाहिजे, तो म्हणजे युद्ध अपरिहार्य का?



जगात जे दुष्ट लोक असतात, त्यांना प्रथम प्रबोधनाद्वारे वळविण्याचा प्रयत्न करायचा, मात्र ते वळतच नसतील तर त्यांना मारण्याशिवाय पर्याय नसतो. सांगूनसुद्धा जे सुधारत नाहीत, त्यांना बडवलेच पाहिजे. भगवदगीता हा आदर्श ग्रंथ का झाला? त्याने प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो, ते म्हणजेच वस्तुस्थिती स्वीकारून त्याला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न केला. भगवदगीता ही वस्तुनिष्ठ आहे. ती वास्तवाला धरून आहे. उगीच आदर्शवादाच्या मागे न लागता वस्तुस्थितीला धरून भगवंताने सगळ्या गोष्टी केल्या.

Comments
Add Comment